इंदुमती गणेशवरिष्ठ बातमीदार, लोकमत कोल्हापूर
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांचे नाव घेतले जात असले तरी राजर्षी शाहू महाराजांच्या वरदहस्ताने कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, पहिला कलात्मक चित्रपट, पहिले पोस्टर पेंटिंग बनवले ते कोल्हापुरात. पहिले सुपरस्टार मा. विठ्ठल हे याच मातीतले. प्रभात फिल्म कंपनीची मुहूर्तमेढ याच शहरातली. पृथ्वीराज कपूर भालजी पेंढारकरांकडे काम करायचे. राज कपूर यांनी तर पहिल्यांदा मेकअप केला तो जयप्रभा स्टुडिओत. सिनेसृष्टीत घडलेल्या पहिल्यावहिल्या अशा अनेक गोष्टी या शहराच्या साक्षीनेच तर घडल्या!
बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडल्यावर व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनी सुरू केली. प्रभात कंपनी पुण्याला गेल्यानंतर कोल्हापुरातील चित्रपट व्यावसायिक जगला पाहिजेे या उद्देशाने छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळातील आधुनिक साधनसामग्रीने सुसज्ज स्टुडिओ निर्माण केला; त्याचेच नाव ‘कोल्हापूर सिनेटोन’ अर्थात ‘जयप्रभा स्टुडिओ’. भावाचा आदर्श घेत श्रीमंत आक्कासाहेब महाराजांनी तोडीस तोड दुसरा स्टुडिओ उभारला तो शालिनी स्टुडिओ. त्या काळी इथे एकदा चित्रीकरण सुरू झाले, की चित्रपट पूर्ण तयार होऊनच बाहेर पडायचा. राजाराम महाराजांनी जयप्रभा स्टुडिओसाठी साडे तेरा एकर जमीन हस्तांतरित करताना या जागेचा वापर फक्त चित्रपटनिर्मितीसाठीच केला जावा, अशी अट घातली होती. या स्टुडिओत भालजींनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. पण, महात्मा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत स्टुडिओ जाळला गेला आणि हे नुकसान सोसणे आवाक्याबाहेर असलेले भालजी कर्जबाजारी झाले.
लिलावात हा स्टुडिओ अन्य कुणाच्या हातात जाऊ नये यासाठी त्यांनी याच मातीत घडलेल्या लता मंगेशकर यांना “हा स्टुडिओ तू खरेदी कर, माझ्याकडे पैसे आले की तुझ्याकडून स्टुडिओ परत घेईन,” असे सांगितल्याचे हे शहर जाणून आहे. बाबांचा शब्द म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लता मंगेशकर यांनी स्टुडिओ खरेदी केला. पुढे भालजींचे निधन झाले आणि बदलत्या काळानुसार अत्याधुनिक यंत्रणा, सोयीसुविधा न पुरविल्याने स्टुडिओ बंद पडला.
लता मंगेशकर यांनी २००४-०५ च्या दरम्यान स्टुडिओच्या वास्तू असलेली तीन एकर जागा सोडून १० एकर मोकळी जागा विकली. त्यानंतर अगदी स्टुडिओच्या भिंतींना लागून येथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. दरम्यान, जागेचा वापर चित्रीकरणासाठी केला जावा, ही अटही संबंधितांनी रद्द करून घेतली. पुढे २०१२ साली या वास्तूंसह परिसराची विक्री झाल्याचे कळताच कोल्हापूरकरांनी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने लतादीदींच्या विरोधात जोरदार लढा दिला. परिणामी, कोल्हापूर महापालिकेने या वास्तूचा हेरिटेज ‘क’ दर्जाच्या इमारतींमध्ये समावेश केला. त्याविरोधात मंगेशकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. पण, न्यायालयाने हेरिटेजचा निर्णय कायम ठेवला. खरेदीदार बिल्डरला व्यवहार रद्द करण्यास भाग पाडले. त्यावेळी वास्तू वाचली. ही वास्तू आता खासगी मालकीची आहे. लता मंगेशकर राहात असत त्या खोलीत त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार धूळखात पडून आहेत. इनडोअर चित्रीकरणाचे मुख्य दोन स्टुडिओ, फ्लोअर, लॅब, मेकअपरूम, चित्रीकरणाच्या साहित्याचे गोडाऊन, भालजींचे दुमजली घर, भोवतीने बांधकाम व मध्यभागी असलेला चौक, प्रवेशद्वारातच वडाचे मोठ्ठे झाड, पिंपळाच्या झाडाखालचे हनुमानाचे मंदिर, असंख्य आठवणी आणि इतिहासाच्या पाऊलखुणा हे जयप्रभा स्टुडिओचे वैभव सध्या धूळखात आहे.
दोन वर्षांपूर्वी महालक्ष्मी स्टुडिओज् एलएलपी या कंपनीला हा स्टुडिओ विकण्यात आला. ज्यांनी २०१२ साली स्टुडिओसाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व केले तेच शिवसेना नेते माजी आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांसह आठ जणांनी भागीदारीत हा स्टुडिओ खरेदी केला असून, सगळे बांधकाम व्यावसायिक आहेत. हे प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर क्षीरसागर यांनी “मुलांच्या व्यवहारांची मला माहिती नाही,” अशी पलटी मारली. त्या दिवसापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मंत्री, लोकप्रतिनिधी, कोल्हापूरचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे “जयप्रभा वाचवा” यासाठी साकडे घातले आहे. “हा व्यवहार कायदेशीर आहे. त्यामुळे शासनाने खरेदीदार कंपनीला पर्यायी जागा द्यावी. ते जयप्रभा स्टुडिओवरचा हक्क सोडायला तयार आहेत,” असे राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. पुढील ३ महिन्यांत मी जयप्रभाचा विषय मार्गी लावेन, असे क्षीरसागर यांना जाहीर करावे लागले.
कोल्हापूरची मरगळलेली सिनेसृष्टी सध्या कात टाकत आहे. ‘कोल्हापूर चित्रनगरी’सारखा भव्यदिव्य स्टुडिओ शासनाने विकसित केल्याने मोठ्या दिमाखात तेथे चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ राज्य शासन अथवा कोल्हापूर महापालिकेने घ्यावा आणि मराठी चित्रपट महामंडळाला चालविण्यासाठी द्यावा; किंवा कोल्हापूर चित्रनगरीला जोडावा, अशी कोल्हापूरकरांची मागणी आहे. येथे छत्रपती राजाराम महाराज, भालजींचे स्मारक व्हावे, वास्तू चित्रीकरणासाठी द्यावी, कोल्हापूरचा वारसा सांगणारे चित्रपट संग्रहालय सुरू करावे, पर्यटन स्थळ म्हणून विकास करावा, असेही तज्ज्ञांचे मत आहे.
पण, स्थानिक स्वराज्य संस्थेला अशी खासगी जागा खरेदी करता येते का, असा प्रश्न आहे. शिवाय मूळ जागा करवीर संस्थानकडून खरेदी झाल्याचा दस्तच नाही; त्यामुळे जागा अजून सरकारच्याच नावे आहे, असेही सामाजिक संस्थांचे म्हणणे आहे. कायद्यातील तरतुदी, महापालिकेची आर्थिक क्षमता असे अनेक अडथळे असलेल्या खडतर मार्गातून हा लढा जाणार आहे. पण, ‘जयप्रभा’साठी आर या पारची लढाई सुरूच ठेवण्याचा कलाकारांचा निर्धार आहे. ही मागणी पूर्ण होते की काही दिवसांसाठी परिस्थिती जैसे थे ठेवून हा प्रश्न परस्पर निपटवला जातो, याकडे कोल्हापूरकरांचे लक्ष आहे.
बिल्डर लाॅबीच्या दबावतंत्रात या आंदोलनाचा श्वास घुसमटतो की कोल्हापूरचा वैभव-वारसा जपला जातो, हे लवकरच स्पष्ट होईल!