गौरी पटवर्धन, लेखक, मुक्त पत्रकार
महाराष्ट्रात २०१९ साली महाराष्ट्र वाहन कायद्यामध्ये सुधारणा करून चार वर्षे वयाच्या वरच्या मुलांसाठी हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं होतं. परिवहन मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२२ रोजी एक परिपत्रक काढून ४ वर्षे वयाच्या खालील मुलाला दुचाकी वाहनावरून न्यायचं असेल तर त्याला हेल्मेट तसेच सेफ्टी हार्नेस वापरणं बंधनकारक केलं आहे. ते न करता जर कोणी ४ वर्षांच्या आतील मुलाला दुचाकीवरून नेलं तर त्यासाठी हे करणाऱ्या व्यक्तीला दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: ही घोषणा केली.
२०१९ सालानंतर महाराष्ट्रात ४ वर्षांवरील मुलं हेल्मेट घालून फिरताना कधीही दिसली नाहीत. तशीच फेब्रुवारी २०२२ नंतरही ४ वर्षांच्या खालील मुलं हेल्मेट आणि सेफ्टी हार्नेस घालून कुठेही दिसणार नाहीत यात काही शंका नसावी. मुळात आपल्याला आपल्या मुलांच्या जीवाची काडीइतकीही किंमत नाही हेच सत्य आहे. नाही तर मोठी माणसं स्वतः हेल्मेट घालून असताना त्याच दुचाकीवर लहान मुलं मात्र उघड्या डोक्याने बसतात हे दृश्य मुळात आपल्याला दिसलंच नसतं. मोठी माणसं हेल्मेट कशासाठी घालतात? तर दुर्दैवाने कुठे अपघात झालाच तर निदान डोक्याला मार लागू नये आणि तो अपघात जीवघेणा ठरू नये म्हणून! मग हेच त्या लहान मुलांच्या बाबतीत लागू होत नाही का? ते बिचारं दोन - तीन - पाच - आठ - दहा वर्षांचं लेकरू आई - वडिलांच्या, काका - मावशीच्या, आजी-आजोबांच्या जीवावर निर्धास्त बसलेलं असतं आणि त्याचं डोकं उघडं ठेवून मोठी माणसं मात्र स्वतःचा जीव वाचवत असतात.
अर्थात, मोठी माणसं इतका विचार करून हेल्मेट घालत असतील ही एका अर्थी कविकल्पनाच आहे. कारण बहुतेक सगळे लोक हेल्मेट घालतात ते ‘पोलिसांनी पकडू नये’ म्हणून! रस्त्याच्या कडेला १०० रुपयात मिळणारं हेल्मेट घ्यायचं, ते पोलिसाला दाखवण्यापुरतं! वेळप्रसंगी ते फुटून त्यातलं डोकं फुटलं तरी चालेल! मुलांचं हेल्मेट हा तर लांबचाच विषय! दुचाकीवर बसवताना मुलांना साधा गॉगलसुद्धा आपण लावत नाही. मोठ्यांना उन्हाचा त्रास होतो, तर तो लहान मुलांना होत नसेल का?
शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी हजारो आई-वडील आपापल्या मुलांची दुचाक्यांवर ने-आण करत असतात. हे लोक सकाळी सात वाजता कोण बघतंय म्हणून खुशाल मैलोनमैल राँग साईडने जातात. सिग्नलकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. इंडिकेटर देणं वगैरे फालतू गोष्टींवर त्यांचा मुळात विश्वासच नसतो. मुलांना दुचाकीवर खुशाल उलट्या बाजूला तोंड करून बसवलेलं असतं. अगदी लहान चुळबूळ करणाऱ्या मुलाला घेऊन त्याची आई बाईकवर सुळसुळीत साडी नेसून एका बाजूला दोन्ही पाय ठेवून बसलेली असते आणि मग, आपले आई-वडील करतात त्याअर्थी ते बरोबरच आहे असं समजून मुलं तेच संस्कार घेऊन मोठी होतात. आठ-दहा वर्षांत स्वतः दुचाक्या चालवायला लागतात. मग तेही सिग्नल पाळत नाहीत, राँग साईडने जाणं हा त्यांना अधिकार वाटतो आणि हेल्मेट हा निव्वळ अत्याचार!
कारण वाहतुकीचे नियम आपल्यासाठी असतात, ते पाळले तर आपण सुरक्षित राहतो हे या मुलांना कोणी सांगितलेलंच नसतं. त्यातूनच अत्यंत असंबद्ध युक्तिवाद येतात. हेल्मेट न घातल्यास दंड केला जाईल असं जाहीर झालं की दरवेळी कोणीतरी फार भारी मुद्दा मांडल्याच्या थाटात म्हणतं, “आधी रस्त्यांचा दर्जा सुधारा, सगळे खड्डे बुजवा, मग हेल्मेटसक्ती करा.” या दोन्हीचा आपापसात काय संबंध? रस्त्यातल्या खड्ड्यांचा जाब विचारलाच पाहिजे. पण त्याचा आपलं स्वतःचं डोकं सुरक्षित ठेवण्याशी काय संबंध?
नवीन नियमातील लहान मुलांचं हेल्मेट हे निदान ऐकून- पाहून तरी माहिती असतं. पण सेफ्टी हार्नेस हा काय प्रकार आहे हे आपल्याकडे फारसं माहिती नाही. चार वर्षांच्या आतल्या स्वभावत: चंचल मुलाला चालकाच्या अंगाशी बांधून ठेवणारा एखाद्या दप्तरासारखा पट्टा म्हणजे सेफ्टी हार्नेस. लहान मुलाने स्कूटरवर पुढे उभं राहून नसते उद्योग करू नयेत यासाठी शहाण्या आया त्यांना ओढणीने स्वतःशी बांधून ठेवतात त्याचं हे जास्त सुरक्षित रूप आहे. मग हे हेल्मेट असो, वा हार्नेस; आपला आणि मुलांचा जीव वाचवण्यासाठी आहेत, दंड टाळण्यासाठी नव्हे!