मुक्ता चैतन्य, मुक्त पत्रकार
मुलांच्या मनात आपण कितीतरी प्रकारची भीती कळत नकळत पेरत असतो. एका शाळेने मात्र त्याबद्दल बोलायचं ठरवलं, त्या अनुभवाबद्दल!
आपल्या मनात ज्या मूलभूत भावना असतात, त्यात भीतीची भावना तीव्र असते. कुणाला कशाची भीती वाटेल, याचा नेम नसला तरी भीतीच्या भावनेतून कुणाचीही सुटका नाही हेही तितकंच खरं! म्हणूनच असेल कदाचित, पण भीती आणि हिंसा हे आपल्यासाठी गुप्त राखण्याचे विषय आहेत. या भावनांबद्दल आपण ना कधी बोलतो ना आपल्या मनात काय चालू आहे हे कुणाला सांगतो. एखाद्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्याला कमकुवत समजण्याकडे आपले संस्कार वळतात. पण, भीतीच्या भावनेबद्दल बोलल्याखेरीज त्या भावनेतून सुटका होऊ शकत नाही, हे लक्षात घेतलं जात नाही.
मुलांच्या मनात तर आपण मोठे किती प्रकारची भीती कळत नकळत पेरत असतो. मूल ऐकत नाही म्हणून बागुलबुवाची भीती घालण्यापासून ‘अरे किती घाबरट’ असं म्हणून भीतीबद्दल बोलण्याच्या सगळ्या शक्यता आपण मुलांच्या आयुष्यातून काढून टाकतो. मुलांना धीट बनवण्याच्या नादात मुलांच्या मनात कायमस्वरूपी भीतीचं घर करून टाकतो.
पण एका शाळेने मात्र भीतीबद्दल बोलायचं ठरवलं. मुलांची तोंडं गप्प न करता मुलांना पाहिजे त्या पद्धतीने भीतीबद्दल बोलू द्यायचं ठरवलं. ही शाळा म्हणजे प्रगत शिक्षण संस्थेचं कमला निंबकर बालभवन. फलटणच्या या शाळेच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक प्रकल्प प्रदर्शन आयोजित केलं होतं, प्रदर्शनाचा विषय होता भीती.
संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. मंजिरी निंबकर यांनी हा विषय सुचवल्यावर शिक्षकांनी आपापसात चर्चा करून भीती हा विषय कसा मांडता येईल, मुलांना कसा समजावून सांगता येईल, यावर विचार केला. भीती कशाची, तिचं स्वरूप काय, समाजातील कुठल्या घटकांची भीती वाटते, भीतीचे अनुभव, भीतीवर मात... अशा अनेक गोष्टी एक एक करत पुढे आल्या. जवळपास दोन महिने झटून शिक्षक आणि मुलांनी उभं केलेलं प्रदर्शन अफलातून होतं. आपल्याला कशाकशाची भीती वाटते, याविषयी मुलांनी लिहिलं होतं. एक भीतीचं वृत्तपत्र तयार केलं होतं, ज्यात सगळ्या भीतीदायक बातम्या होत्या. भुतांपासून, भीतीच्या जागांपर्यंत अनेक गोष्टी मुलांनी यात लिहिल्या होत्या. भूत बंगले बनवले होते, अक्राळविक्राळ मुखवटे तयार केले होते, ते घालून स्वतःला आरशात बघण्याची सोय होती. भुताला पत्र लिहिलं होतं. भीतीचे अनुभव लिहिले होते. भीतीदायक अनुभवांवर मात कशी केली, घरच्यांसमोर कोणत्या विषयावर बोलायची भीती वाटते, पोलिसांची भीती का वाटते हे लिहिलं होतं. अगदी एका भूतनीबरोबर सेल्फी पॉइंटदेखील होता. अंधश्रद्धा का जोपासायच्या नाहीत हेही लिहिलं होतं.
भीतीसारख्या अमूर्त भावनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी शब्द, चित्र, शिल्प, छायाचित्र.. या सगळ्याचा अतिशय प्रभावी वापर केला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं मुलांशी बोलून, मुलांना बरोबर घेऊन. त्यानिमित्ताने मुलं भीतीबद्दल काय विचार करतात, मुलांना कशाची भीती वाटते हे सारंच मोठ्यांच्या जगाला समजू शकलं. शिक्षक सांगतात, भीतीबद्दल बोलताना काही मुलं गहिवरून आली, काही रडली, काही मुलांनी स्वतःचे अनुभव शेअर केले, भीतीच्या गोष्टी सांगितल्या... एका अर्थाने प्रकल्प साकार होता होता मुलंही मोकळी होत गेली.
भीती आणि हिंसेची भावना माणसांच्या जिवंत राहण्याच्या आक्रंदनाशी जोडलेली आहे. या भावनांबद्दल न बोलून आपण अनेकदा आपलंच नुकसान करत असतो. प्रदर्शनात एका पहिलीतल्या मुलीने लिहिलं होतं, मला एका माणसाची भीती वाटते. ते छोटं वाक्य मला इतकं महत्त्वाचं वाटलं, पहिलीतल्या त्या चिमुकलीला आपली भीती मोकळेपणाने सांगता आली! नाहीतर कितीतरी मुलं मनातली भीती तशीच दाबून मोठी होतात.
मुलांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते आहे. या सुट्टीत काय करावं, असा प्रश्न पडलेल्या पालकांना थोडी दिशा मिळावी म्हणून या प्रदर्शनाबद्दल आत्ता सांगावंसं वाटलं!
मुक्ता चैतन्य (muktaachaitanya@gmail.com)