अतुल कुलकर्णी,संपादक, मुंबई प्रिय मंगेश पाडगांवकरजी,नमस्कार,
आज तुमची खूप आठवण येत आहे... ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ ही ओळ कोणी लिहिली माहिती नाही... मात्र, ही ओळ आपल्याला तंतोतंत लागू होते बरं का...! आपण ७० ते ८०च्या दशकात एक गाणं काय लिहिलं... ते आज पन्नाशीनंतर खरं ठरत आहे...! हा केवढा विलक्षण योगायोग... त्या गाण्यात आपण काही सवाल केले, तेच सवाल आज उभ्या महाराष्ट्राला छळत आहेत... त्या गाण्यातल्या सगळ्या ओळी जणू काही तुम्ही आजच्या घटनेसाठीच लिहिल्या होत्या, असं वाटावं, इतकं साम्य दाखविणाऱ्या आहेत... सुरुवातच बघा ना आपल्या गाण्याची...लाजून हासणे अन् हासून ते पहाणेमी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
परवा विधानभवनात या ओळींचा याची देही याची डोळा प्रत्यय आला. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेकडे बघून तिथं प्रत्येक जण लाजून लाजून हसत होता... आदित्य देखील मी तुमचे सगळे बहाणे ओळखून आहे, असं त्यांच्याकडे बघत म्हणत होता... ज्या ओळी तुम्ही आदित्यचा जन्म होण्याच्या आधी लिहिल्या, त्या त्याला इतक्या चपखल बसतील, असं तुम्हाला वाटलं तरी कसं...?
विधान भवनात आदित्य बंडखोर आमदारांना म्हणाला, ‘तुम्ही येणार म्हणून जेवण तयार ठेवलं होतं... तुम्ही असे कसे निघून गेलात...’ त्यावेळी बंडखोरांच्या डोळ्यांना त्यांच्याच पापण्यांचा भार असह्य झाला... त्यांनी डोळे मिटून घेतले, पण डोळे मिटताच, त्यांना एका डोळ्यात एकनाथ शिंदे तर दुसऱ्या डोळ्यात उद्धव ठाकरे दिसू लागले. तेव्हा तुमच्या...डोळ्यांस पापण्यांचा का सांग भार व्हावा?मिटताच पापण्या अन् का चंद्रही दिसावा?हे प्रश्न जीवघेणे हरती जिथे शहाणे
या ओळींची सत्यता आम्हाला पटली... त्याही पुढे जाऊन आदित्य, उद्धवजींनी एकनाथरावांना विचारलेले व त्यांनी उद्धवजींसमोर उभे केलेले प्रश्न किती जीवघेणे आहेत... तिथे भलेभले बुचकळ्यात पडले. याचीही प्रचिती आम्हा पामरांना आली...तुमच्या गाण्यातल्या पुढच्या ओळी, जेव्हा मी आजच्या परिस्थितीला किती अचूक लागू होतात हे पाहिलं, तेव्हा तर मी तुमच्या तसबिरीपुढं साष्टांग दंडवत घातलं... किती थेट प्रश्न तुम्ही विचारलात...
हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?हृदयात बाण ज्याच्यात्यालाच दुःख ठावे!
पाडगांवकरजी, खरा प्रश्न तोच आहे... धनुष्य नेमका कुणाच्या हातात...? हा प्रश्न एकदा सुटला की, मग ज्याच्या हाती तो आहे, त्याचं दुःख नेमकं काय, याचा शोध घेता येईल... पण आज तरी ज्याच्या कोणाच्या हातात धनुष्य आहे, त्यांनी नेमका बाण कोणाच्या दिशेने सोडलाय... तो कुणाच्या हृदयी जाऊन विसावला आहे... हे आज तरी कळायला मार्ग नाही...! पण ज्याच्या कुणाच्या हृदयात तो बाण विसावला आहे, त्यालाच खरं दुःख ठाऊक असावं... लवकरच या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला मिळतीलही, पाडगांवकर... पण मुद्दा तो नाहीच...! खरा प्रश्न हा आहे की, तुम्हाला हे सगळं पन्नास वर्षे आधी कळलं कसं...? केवळ एवढे लिहून थांबला नाहीत, पुढे म्हणालात...
तिरपा कटाक्ष भोळा, आम्ही इथे दिवाणे...
आता हा तिरपा कटाक्ष भोळा जरी असला, तरी उभा महाराष्ट्र त्या तिरप्या कटाक्षाचा दिवाना झाला आहे... आता महाराष्ट्राला असा प्रश्न पडला आहे की, हा तिरपा कटाक्ष मातोश्रीच्या दिशेने आला तरी कुठून...? तो आला कसा, याचा शोध घेणं आम्ही सुरू केलं आहे... पाडगांवकरजी, तुम्ही तुमच्या कवितेतून हे विस्तृतपणे मांडलं असतं, तर आज आम्हाला शोध घेण्याची वेळ आली नसती... या तिरप्या कटाक्षाचा शोध सगळे घेत आहेत... काहींना वाटतं की, उद्धवजींचे जिवलग मित्र देवेंद्र यांच्याकडून तर तो आला नाही ना...? तर काहींना असं वाटतं की, देवेंद्रजींपेक्षाही जास्त जवळचे असणारे उद्धवजींचे खासमखास मित्र अमित शहा यांनी तर हा तिरपा कटाक्ष त्यांच्याकडे टाकला नसेल...? तुम्ही याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं... आमच्या डोक्याचं दही झालं नसतं...पण आम्हाला तुमचं एक फार आवडलं, पाडगांवकर... तुम्ही खूप आशावादी होतात..! त्यामुळेच तुम्ही सगळं वास्तव मांडत असताना, आशेचा एक किरणही तुमच्या कवितेतून दाखवून ठेवला होता... जाता समोरूनी तू उगवे टपोर तारादेशातुनी फुलांच्या आणि सुगंध वारा
परवा अगदी असंच झालं... विधान भवनातून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले काही आमदार आदित्यच्या समोरून गेले... आणि आदित्यला टपोरे तारे समोर उगवल्यासारखं झालं... आता शिंदेशाहीतून फुलांचा सुगंधी वारा पुन्हा येईल, असा भाव आदित्यच्या मनात निर्माण झाल्याचं मिलिंद नार्वेकर सगळ्यांना सांगत होता... त्यामुळे त्या रात्रीपुरतं तरी... रात्रीस चांदण्याचे सुचते सुरेल गाणे...
याच ओळीची साथ त्या रात्री आदित्यला होती... रात्री मातोश्रीच्या गच्चीवर उद्धवजी आदित्यला भावी जीवनाचे धडे देत होते... तेव्हा रात्रीच्या सुरेल चांदण्यात एखादं गाणं सुचतं का...? असं त्या दोघांना वाटत होतं... दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी गप्पा मारताना संजय राऊत यांनीच हे सांगितलं... शेवटी उगाच त्यांचं नाव संजय नाही... महाभारतातला संजय युद्धभूमीपासून दूर राहून सगळं काही सांगायचा... हे संजय देखील दूर राहून मातोश्रीच्या गच्चीवर बाप-लेक काय बोलत होते, हे माध्यमांना सांगत होते...
पण पाडगावकर, तुमचं चुकलंच... तुम्ही हे गाणं अर्धवट लिहायला नको होतं... थोडं आणखी खुलवून लिहिलं असतं, तर आज आम्हाला सगळं काही समजलं असतं... जाता-जाता एकच, हल्ली मातोश्रीवर कार्यकर्त्यांचं जाणं-येणं वाढलं आहे... त्यांना बाहेर काय सांगावं, हे कळत नाही. त्यातल्याच एकानं दिलेली माहिती अशी आहे की, आदित्य धनुष्य उलटा धरून प्रत्यंचा ओढतो आणि बाण मागे कुठे गेला हे बघतो...! हा संदर्भ तुमच्या कवितेत आला असता, तर तुमची कविता पूर्ण झाली असती, असं नाही वाटत तुम्हाला, पाडगांवकर...? असो...
- तुमचाच, बाबूराव