अनंत गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
भारत व पाकिस्तान हे दोन्ही देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. गेल्या ७५ वर्षात भारतात संसदीय लोकशाही कायम राहिली, तर पाकिस्तानात लोकशाही व हुकूमशाही यांचा आलटून - पालटून लपंडाव चालू आहे. दोन्ही देशांतील विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत आक्रोश एकच आहे, फरक फक्त पद्धतीचा. भारतात विरोधकांवर ईडी - सीबीआयची धाड, तर पाकिस्तानात विरोधकांवर लष्करी गिधाड. राजकीय विरोधकांपासून ते विरोधी मताच्या पत्रकारांपर्यंत सर्वांचेच या गिधाडांनी पार लचके तोडल्याची असंख्य उदाहरणे पाकिस्तानात आहेत.
पाक लष्कर व आय. एस. आय.ला अंतर्गत आव्हान देणाऱ्याची पार विल्हेवाट लावली जाते. पाकमधील दोन नामांकित पत्रकार, आमिर मीर व इमरान शफकत यांनी खासगी चर्चेत पाकिस्तानची न्यायव्यवस्था, लष्कर व आय. एस. आय. यांच्या विरुद्ध केलेले वक्तव्य सोशल मीडियावर टाकले. एवढेच निमित्त सत्ताधाऱ्यांना पुरे होते. दोघांनाही त्वरित अटक करण्यात आली. याहून अमानूष वागणुकीचे दुसरे भयानक उदाहरण - सईद सलीम शहजाद - नामांकित पाकिस्तानी पत्रकार. विरोधी आवाज उठविणाऱ्याचे पाकिस्तानात कसे हाल केले जातात, यावर त्यांनी एक लेखमालाच लिहिली. याच विषयावर एका वृत्त वाहिनीवर चर्चा करण्यासाठी ते निघाले खरे पण कार्यक्रम संपला तरीही ते टीव्ही स्टुडिओत पोहोचले नाहीत. दोन दिवसांनी झेलम कालव्यामधे त्यांचा मृतदेह तरंगताना सापडला.
न्यूयॉर्क मासिकाचे शोधपत्रकार डेक्सटर फिल्किन यांनी या प्रकरणाचा शोध सुरु केला. ७-८ वर्षांपूर्वी कराचीजवळच्या पाकिस्तानी हवाई दलाच्या एका तळावर हल्लेखोरांनी पाकची दोन विमाने उद्ध्वस्त केली होती. त्यानंतर तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल अशफाक कयानी व आय. एस. आय. प्रमुख अहमद पाशा यांच्यावर टीकेची झोड़ उठली होती. हल्ल्याची इत्यंभूत माहिती शहजाद यांनी मिळविल्याचा आयएसआयला संशय होता. त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, छळ करण्यात आला. पण, अखेरपर्यंत त्यांनी माहिती देण्यास नकार दिल्याने त्यांची हत्या केली गेली.
पाकिस्तानातल्या गरीब शेतकऱ्यांचीही या दडपशाहीतून सुटका नाही. ओकारा येथे एक लष्कराच्या भूखंडावर गेली अनेक वर्षे शेतकरी वास्तव्य करीत होते. स्थलांतराला नकार देताच, लष्कराने गावाला वेढा घातला, शेतकऱ्यांना अटक करीत इतके हाल केले, की त्यात काही मृत्युमुखी पडले. पाकमधील एकाही वर्तमानपत्रास याचा सुगावाही लागू दिला गेला नाही. मात्र, अमेरिकेच्या ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने हे प्रकरण अखेरीस चव्हाट्यावर आणले.
एकीकडे अंतर्गत दडपशाही चालू असताना, दुसरीकडे भारतविरोधी कारवाया करण्यासाठी दहशतवाद्यांचे पीक पोसणारे शेत म्हणजेच पाकिस्तान. पाकच्या भूमीवरच प्रशिक्षण घेतल्याचा संशय असलेल्या आणि अल-कायदाशी संलग्न असलेल्या उज्बेकिस्तान देशातील आयएमयु या संघटनेने आपल्या मासिकाचे नाव ‘गझबा - ए - हिन्द’ ठेवले आहे. उद्देश हा, की प्रत्येकाच्या मनात ‘हिंदुस्तानशी संघर्ष’ ही भावना घुमत राहिली पाहिजे. या संघटनेच्या विचारसरणीतील एक विचित्र धोकादायक बाब म्हणजे, दहशतीच्या जोरावर ‘हिन्द प्रांत’ काबिज केला पाहिजे. हिन्द प्रांत म्हणजे काय ?- तर भारत, श्रीलंका, म्यानमार अणि बांगला देश.
इंडस करारानुसार तीन प्रमुख नद्यांबाबत भारतावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण आहे. तरीही भारतातून येणारे नदीचे पाणी जाणीवपूर्वक गढूळ करीत, पाकमधील सुपीक जमिनीचा भारत वाळवंट करत आहे, अशी भाषणे करत, लष्करे - तैयबाचा प्रमुख हाफिज सय्यद आणि २०१७ साली ज्या सय्येद सलाबुद्दीनला “जागतिक दहशतवादी” म्हणून घोषित करण्यात आले होते तो, हे दोघेही सीमेवरील गावांतील तरुणांची माथी भडकवण्याचे काम आज करीत आहेत. दुसरीकडे, अल-जवाहिरीच्या नेतृत्त्वाखालील सध्याच्या अल - कायदामधून काही अरब दहशतवादी अबू-बकर - अल - बगदादीच्या अधिपत्याखालील आयसीसकड़े आता वळू लागले आहेत. यामुळे पाक मुक्कामी अतिरेक्यांमध्ये अंतर्गत संशयाचे वातावरण इतके वाढत चालले आहे की, न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकार सब्रीना तावरनीस यांनी लिहिल्याप्रमाणे या सर्वांना आयएसआयचे जरी पाठबळ असले तरीही पाकचे लष्करी गुप्तचर खाते, आयबी व आयएसआय आपल्यावरही गुप्त पाळत ठेवत आहेत, अशी भावना या दहशतवादी संघटनांमध्येच वाढत चालली आहे. थोडक्यात, राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक पाकिस्तानी राज्यकर्त्याने नाकाला मिरच्या झोंबत असल्याप्रमाणे उठसूट भारतविरोधी आग ओकत राहण्याचे न थांबविल्यास, आपली अर्थव्यवस्था न सुधारल्यास आणि दहशतवाद्यांना दूर ठेवत जगाशी समरस न झाल्यास, स्वतःच निर्माण केलेल्या दहशतवादाच्या भोवऱ्यात पाकिस्तान बुडाल्याशिवाय राहणार नाही.anantvsgadgil@gmail.com