तेजस्वी सातपुते,पोलीस अधीक्षक, सोलापूर
एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून मोबाईलचा उपयोग केला जातो. सर्वांसाठी अतिशय सवयीच्या अशा या मोबाईलचा वापर करून राज्यात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नांचा हा एक आढावा. सध्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये, गावात असणाऱ्या प्रत्येक घरातील, प्रत्येक मोबाईल नंबर नोंदवून आपत्कालीन परिस्थितीत एकाच वेळेस जवळपास सर्वच क्रमांकावर संपर्क करण्याची यंत्रणा जोडली जात आहे. काेणत्याही कुटुंबातील कोणताही सदस्य संकटात असेल तर त्याला या ग्राम विकास यंत्रणेच्या माध्यमातून तत्काळ मदत मिळणे सोयीचे व्हावे, असे यामागचे नियोजन. त्याबाबतचे विविध जिल्ह्यातले अनुभव समाधानकारक असल्याचे दिसते.
गेल्या ९ वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील ३ हजार ५००हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली. सध्या सोलापूर जिल्ह्यात या यंत्रणेचे काम वेगाने सुरू आहे. ही यंत्रणा १०० टक्के कार्यान्वित करण्यासाठी गावागावात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात शिबिरे, मेळावे, बैठकांच्या माध्यमातून गावांमधील सर्व पोलीसपाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्रित करून संबंधित ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत माहिती देण्यात येते. शिवाय या यंत्रणेचे महत्व पटवून देण्याचे काम पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून सुरू आहे. राज्यातील प्रत्येक गावात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्रात ग्राम सुरक्षा यंत्रणा सातशे गावे सध्या वापरतात. दोनशे गावांमध्ये या यंत्रणेच्या प्रक्रियेचे काम सुरू आहे. तब्बल २० हजारांहून अधिक घटना या यंत्रणेत हाताळल्या असून, यामध्ये चोरीच्या पाचशेहून अधिक घटनांमध्ये चोरट्यांना पकडण्यात यश आले. अपघात झालेल्या व्यक्तिंना या यंत्रणेमुळे मदत मिळाली. २०१९ वर्षीच्या पूरस्थितीत नाशिक जिल्ह्यातील ग्राम सुरक्षा यंत्रणेचा उत्तम प्रकारे वापर झाला. ग्राम सुरक्षा यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात हिवरेबाजार गावाला फायदा झाला असून, गेल्या दोन वर्षांपासून चोरी व नुकसानीचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेतला तर चोरीच्या अनेक घटना मोठ्या प्रमाणात टाळता येणे नक्कीच शक्य होऊ शकेल.
या यंत्रणेला हातभार लावणारी यंत्रणा सध्या सोलापूर जिल्ह्यात वेगाने काम करीत आहे. “आपलं गाव... आपली सुरक्षा” हे या उपक्रमाचे नाव. या उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक मंदिरावर सायरन बसविण्यात येतील. गावात चोरी, दरोडा अशा प्रसंगी संपूर्ण गाव सुरक्षित राहावं, यासाठी या सायरनचा उपयोग केला जाईल. रात्री प्रत्येक तासाला ग्राम सुरक्षा दल, बीट अंमलदार, पोलीसपाटील, तंटामुक्त अध्यक्ष यांच्या मदतीने हे सायरन वाजत असल्यामुळे गावात रात्री घडणाऱ्या चोऱ्या, दरोड्याच्या घटना ९० टक्के कमी झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात ७००हून अधिक गावात सायरन बसविण्यात आले असून, सध्या ५००हून अधिक गावे सायरनचा वापर करतात. लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या चळवळीने वेग घेतलेला दिसतो. सोलापूर ग्रामीण पोलीस दलास याकामी मदत करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांचा सक्रिय सहभाग आहे. जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत स्तरावरून या यंत्रणेला भक्कम करण्याचं नियोजन आकार घेईल.
गावात चोरी झाली, लहान मूल हरवलं, वाहन चोरीला गेलं, अपघात झाला, वन्यप्राण्यांनी हल्ला केला, महापूर आला... अनोळखी व्यक्ती गावात आली... गावात भांडण झालं... दगडफेक झाली अशी एक ना अनेक संकटे, अडचणीच्या काळात कोणत्याही आपत्तीच्या वेळी केवळ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून मदत मागितली असता परिसरातील सगळे लोक एकाच वेळी नागरिकांच्या मदतीला धावून येऊ शकतील. आपत्ती तसेच दुर्घटनेच्या वेळी जवळच्या व्यक्तिंना तातडीने संदेश मिळावा, यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या टोल फ्री नंबरवर फोन केल्यास संबंधिताचा आवाज फोनद्वारे परिसरातील यंत्रणेला, नोंदणी केलेल्या नागरिकांना मोबाईलवर त्वरित ऐकू जाईल. घटना घडत असतानाच परिसरातील नागरिकांना तिची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे आता शक्य होऊ शकेल, हा या व्यवस्थेचा मोठा फायदा.
हल्ली या ना त्या कारणाने प्रत्येकाच्याच मनात असुरक्षित असल्याची भावना असते. चोऱ्या, दरोडे, अत्याचार अशा एका अनेक घटनांनी जो तो सैरभर आहे. दूर कुठंतरी शहरात असणारे पोलीस ठाणे अन् घडणाऱ्या दुर्घटना, त्यामुळे होणारा विलंब यामुळे या यंत्रणेवरचा विश्वासही जणू उडू पाहतोय. अशावेळी ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ हा एक मोठा आधार ठरु शकेल. जीपीआरएस यंत्रणेशी कनेक्ट असणाऱ्या या उपक्रमामुळं दूर कुठंतरी वाडी-वस्तीवरुन आलेला एक कॉल येणारे मोठे संकट टाळू शकेल. गावातून आलेला हा कॉल कोणा एकट्या दुकट्याला नाही तर थेट पोलीस यंत्रणेसह अख्ख्या गावाला ऐकवला जाणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या या ग्राम सुरक्षा यंत्रणेला ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यंत्रणा राज्यभर कार्यान्वित झाल्यास पोलीस दलास मोठी मदत होईल. गावातील चोऱ्या, दरोड्यांसारख्या घटनांना आळा घालणं शक्य होईल. प्रशासन आणि यंत्रणेपासून काहीशी लांब असलेली आडबाजुची गावं, वस्त्या यांच्यासाठी ही मोठीच सोय आहे. भयमुक्त जीवन जगण्याची उमेद या यंत्रणेच्या माध्यमातून जागी होऊ शकेल. सर्वच गावातील नागरिकांनी या यंत्रणेला सहकार्य करावे, ही अपेक्षा.
(शब्दांकन : आप्पासाहेब पाटील, सोलापूर)