अमोल पालेकर, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
धोका टळलेला नसला तरी कोविड आता सरावाचा झाला. सुरुवातीची अस्वस्थता कशी होती?बाकी काही असो, माझ्यापुरता तरी मी विज्ञाननिष्ठ आणि तार्किक पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला सामोरं जायचा प्रयत्न करतो. त्यामुळे कोविडचं रौद्र स्वरूप काय आहे याची थोडीफार कल्पना मला आधी आली होती. आमची धाकटी लेक लॉकडाऊनपूर्वी परदेशातून इथं आली त्यावेळी ती म्हणालीही,‘‘ जगभरात काय हलकल्लोळ माजलाय याची इथं सुतराम कल्पना दिसत नाही!’’ आम्हाला मात्र उंबरठ्याबाहेरचं कधीही आत येऊ शकतं याची पूर्वकल्पना आल्यामुळे अज्ञात, अनाम भीती वाटली नाही. काळजी होती, अस्वस्थता नक्कीच होती. परंतु आम्ही आवाक नव्हतो झालो.
विलगीकरणाचं फार भय वाटलं माणसांना. तुम्हाला काय वाटलं? मी व संध्या दोघंही त्या अर्थाने गर्दीत मिसळणं, सतत लोकांमध्ये राहाणं, रमणं हे करणारी माणसं नाही. हे माणूसघाणेपण नाही, पण लोकांच्यामध्ये राहिल्यामुळेच माझ्या अस्तित्वाला काही चांगले, सुखाचे क्षण मिळतात असं मला कधीच वाटलेलं नाही. त्यामुळे विलगीकरणाबद्दल अवघडलेपण कधीच नव्हतं. आपापली स्पेस जपत आम्ही स्वत:च्या उद्योगात गर्क होतो. आम्हा दोघांच्या या तोलामुळे तिसऱ्याची गरज भासली नव्हती व नाही. भीती वाटलीच तर एकच करायचं, डोळे मिटून कसलातरी जप न करता, देव पाण्यात ठेवून न बसता, डोळे उघडे ठेवून येणाऱ्या संकटाचा सामना आपण कसा करू शकतो याचा विचार करायचा. माझा पिंड असाच आहे.
मृत्यूचा थेट चटका आणि भीतीचा स्पर्श याने माणसाच्या जगण्यावागण्याचा पोत बदलेल?नक्की! आणि बदलायलाच हवा. आपल्या आसपास आणि त्याहून बाहेरच्या जगात जे घडतंय ते फार मोठं आहे, हे कळलं त्याचा चटका बसलाच ! या काळात आपण व्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये जगायला शिकलो. माझ्यासारख्या पुराणकालीन माणसाला संगणक नि सगळं तंत्र समजून त्यात मिसळून जायला वेळ लागला. पण माहिती करून घेऊया, मैत्रीही करूया आणि कामं सुरू ठेवूया म्हटलं ! याच पद्धतीनं जगायचं असं ठरवलं तर आपण काय काय करू शकतो असा विचार करूनच आपण शिकत राहातो व त्यामुळे जगण्याचा पोत बदलतो.
लोकांना सामाजिक-राजकीय परिस्थितीचं भान नसतं, ती सजग नसतात, तेव्हा विचलित होतं? राग येतो?अनेक गोष्टींचा आपल्याला राग येतच असतो ना? - कोविडसारख्या आपत्तीला सामूहिक पद्धतीनं तोंड देताना आपण काय केलं? थाळ्या व टाळ्या वाजवून कोरोना पळून गेला असं मानलं, गोमूत्र शिंपडून घेतलं, अंगाला शेण फासून सगळ्याचा सामना आम्ही कसा समर्थपणे करतोय असं जगाला ओरडून सांगायचा प्रयत्न केला. - हे सगळं पाहात असताना राग तर निश्चित येतच होता की काय मूर्खपणा चालवलाय? संकटाशी असं भिडतात का? तरीही विज्ञाननिष्ठ मार्गाने वागत , आसपासच्यांना वागायला लावत मी माझा मार्ग चालू शकतो. ते मी केलं.
पाच-सहा वर्षांपूर्वी नाटक, सिनेमा असं आयुष्याचं वर्तुळ पूर्ण करून मी माझ्या चित्रकलेकडे वळलो. चित्रकार म्हणून जगताना माझा सगळा प्रवास अगदी निखळ अंतर्मुखी असतो. मी रोज सकाळी स्टुडिओत कॅनव्हाससमोर उभा राहातो तेव्हा माझा संवाद हा फक्त माझ्याशीच असतो. मी माझ्या स्वत:च्या अंतरंगात किती खोल बुडी मारू शकतो आणि आत जाऊन काय नवीन मला मिळू शकतं या शोधात विलक्षण रमायला होतं. या प्रवासात मला माझीच सोबत असते. आणखी एक गोष्ट अगदी निग्रहाने मी केली. स्वत:चं आयुष्य, काम, निर्णय, चुका यांच्याकडे लेखनाच्या माध्यमातून तटस्थ व दूरस्थपणे बघू शकतो का हे तपासलं. वाचन, लिखाण, चित्रकला हा प्रवास अंतर्मुखीच आहे. नाटक करताना मला प्रेक्षकाचं भान सतत असतं, तो दुसरा, बाहेरचा माणूस असतो ज्याच्याशी संवाद साधायचा मी प्रयत्न करत असतो. सिनेमादेखील अनेक तंत्रं व तंत्रज्ञांची समूह कृती असते. तिच्याबाबतीत पलीकडे वेगळा अनामिक प्रेक्षक असतो ज्याच्याशी आपण बोलू पाहतो. माझ्या चित्रांमधून समकाळाचं चित्रण होतंय हे जाणवलं तेव्हा माझं समाधान वाढलं. राग असा वळवता येतो.
सध्या जगावर कडव्या, उजव्या, एककल्ली हुकूमशाही राजवटीची मोहिनी आहे असं दिसतंय. हे समाजचित्र पुढे कसं घडेल?इतिहासावर नजर टाकली व त्यातून शिकायचं म्हटलं तर असे प्रवाह, अशा त्सुनामी लाटा येतच राहिल्या होत्या हे दिसेल. दर पन्नास ते साठ वर्षांनी अशा पद्धतीचे प्रवाह येतात, ते प्रबळ होताना दिसतात. मात्र पुढे ही लाट ओसरते एवढंच नाही तर या ओसरणाऱ्या लाटेबरोबर काहीतरी दुसरं खूप चांगलं घडतं. पहिल्या महायुद्धानंतर यंत्रयुगाचा उदय झाला. त्यातून आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड गतिमान बदल झाले. इतिहासाकडे बघून काही शिकायचा प्रयत्न केला तर कळतं खूप अस्वस्थ, हताश व्हायची गरज नाही.
शेवटी सुशिक्षित, सुसंस्कृत, सज्जन म्हणवून घ्यायला आपण पात्र आहोत की नाही याचा प्रत्येक माणसानं विचार करायला पाहिजे. आजूबाजूला जो हलकल्लोळ होत राहातो, मुस्कटदाबी केली जाते तिला न घाबरता, न शरण जाता आपण ठामपणे कसं उभं राहायचं हा विचार मुख्य ठेवत मी आयुष्यभर चाललो, वागलो आहे. कुठल्याही तऱ्हेच्या दडपशाहीसमोर मी कधीच मान तुकवली नाही. माझ्या छोट्या वर्तुळात निर्भीड व ठामपणे उभा राहिलोय. माझ्यासारखा छोटा माणूस तसं करत असेल व त्याचं आयुष्य उदध्वस्त होत नसेल तर सगळ्यांना मोठा धीर मिळायला हरकत नाही. मी दुर्दम्य आशावादी माणूस आहे. संकटांच्या नाकाला नाक भिडवून उभं राहाता येतं, हे मी मानतो. विचारपूर्वक कमावलेल्या माझ्या मूल्यांवर व संचितावर निष्ठा ठेवून चालत राहिलो तर आयुष्य व्यापून टाकेल अशा निबिड अंधारातही बारीकसा किरण असेल व असतोच असा माझा ठाम विश्वास आहे. चालत राहिलं तर किरणाचं रूपांतर झोतात व्हायला वेळ लागत नाही.
मुलाखत : सोनाली नवांगुळ