शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

‘गहनमती’च्या डोक्यात काय शिजते आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 6:05 AM

यंत्रबुद्धीचा एक उच्च आणि गहन आविष्कार म्हणजे डीप लर्निंग. हे प्रकरण विकसित होऊन मानवी बुद्धीलाच आव्हान देऊ शकेल का, ही भीती आहे!

विश्राम ढोले,माध्यम, तंत्रज्ञान, संस्कृती या विषयांचे अभ्यासक

एखाद्या विषयावर तुमच्यासमोर निमिषार्धात माहितीची यादी देताना गुगलने नेमकी कोणती महत्त्वाची बौद्धिक कृती केलेली असते? फिडमध्ये तुमच्या गरजांशी सुसंगत जाहिरात दाखविताना फेसबुकने नेमकी कोणती कळीची बौद्धिक कृती केलेली असते? तुम्हाला कोण किंवा काय आवडू शकते याचे पर्याय सुचवताना डेटिंग ॲप किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी नेमकी कोणती लक्षणीय बौद्धिक कृती केलेली असते? आजूबाजूच्या गोंगाटातही तुमचे बोलणे नीट ओळखून त्याप्रमाणेमाहिती पुरवताना अलेक्सा किंवा सिरीने नेमकी कोणती विशेष बौद्धिक कृती केलेली असते?- खरे तर आपल्या डिजिटल जगण्यातले हे चार अगदी सर्वसामान्य अनुभव. पण त्यासाठी या अल्गोरिदमने मानवी बुद्धीतील काही महत्त्वाच्या कृतीचे अनुकरण केलेले असते. गुगलने यादी सादर करताना प्राधान्यक्रम हे महत्त्वाचे बौद्धिक सूत्र वापरलेले असते. जिथे अनेक पर्यायांमधून निवड करायची असते तिथे काहीतरी निकष लावून पर्यायांचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. गुगल मॅपवर दिसणारा फास्टेस्ट रुट हा असाच पर्यायांच्या यादीतून वेगाच्या निकषावर पहिला आलेला मार्ग असतो.तुमच्या गरजांशी सुसंगत जाहिरात दाखविताना फेसबुकने वर्गीकरण हे कळीचे बौद्धिक सूत्र वापरलेले असते. त्याआधी फेसबुकला  तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात, हे ठरवावे लागते. त्यासाठी वय, लिंग, शिक्षण किंवा अशाच काही निकषांच्या आधारे वर्ग करावे लागतात. निकष ठरवा आणि त्यानुसार वर्गीकरण करा ही अगदी दैनंदिन जगण्यातली कृती त्याच्या मुळाशी असते.तुम्हाला कोण किंवा काय आवडू शकते हे ठरविण्यासाठी डेटिंग ॲप्स किंवा ओटीटी प्लॅटफार्म वापरतात ते असते सहसंबंध शोधण्याचे लक्षणीय बौद्धिक सूत्र. कोणत्या गोष्टी एकमेकांचा हात धरून- पण एकमेकांमुळे नाही- घडतात ते पाहणे म्हणजे सहसंबंध शोधणे. अर्थात असे करताना सहसंबंध आणि कार्यकारणभाव यातील धूसर सीमारेषा मात्र ओळखता आली पाहिजे. आपण कपड्यांच्या रंगांचा मेळ घालतो म्हणजे एका अर्थाने सौंदर्याच्या काही निकषावर त्यांच्यात सहसंबंध प्रस्थापित करतो.गोंगाटातही सिरी किंवा अलेक्सा तुमचे बोलणे नीट ऐकतात तेव्हा  येणाऱ्या ध्वनींपैकी कुठला गाळायचा आणि कुठला ठेवायचा ही विशेष बौद्धिक कृती त्यांनी केलेली असते. निवडक लक्ष आणि बाकीकडे दुर्लक्ष हे दैनंदिन जगण्यातले सूत्रच तिथे वापरलेले असते. काय सतत येते आणि काय नवीन असते हे अनुभवातून ताडायचे, सतत येणाऱ्या किंवा अपेक्षित असलेल्याला गृहित धरायचे आणि नवीन गोष्टींकडे, अनपेक्षित बाबींकडे लक्ष पुरवायचे हे सूत्र खऱ्या जगाप्रमाणे डिजिटल जगातही जागोजागी लागू पडते.एका अर्थाने अनुक्रम किंवा प्राधान्यक्रम (सॉर्टिंग किंवा प्रायोरिटी), वर्गीकरण (क्लासिफिकेशन), सहसंबंध (को-रिलेशन) आणि चाळणी (फिल्टरिंग) ही चार महत्त्वाची बौद्धिक सूत्रे या अल्गोरिदमचा आधार आहेत. खरं तर, यंत्रांचे स्वयंशिक्षण किंवा डीप लर्निंग करणारे अल्गोरिदम अनेक आहेत. प्रत्येकाच्या अंतर्गत रचना आणि शैलीही वेगवेगळ्या आहेत. पण हाना फ्राय या गणितज्ज्ञ विदुषीच्या मते अंतिमतः हे अल्गोरिदम मुख्यत्वे कोणती मानवी बौद्धिक सूत्रे वापरतात हा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर या चार सूत्रांमध्ये शोधता येते. या चार सूत्रांवर आधारित गणितीय किंवा सांख्यिकीय आज्ञावलींच्या साह्याने अल्गोरिदम कृती करतात. अर्थात बहुतेक अल्गोरिदम फक्त एकच नाही तर दोन, तीन किंवा चारही सूत्रांचा कमी अधिक वापर करून उत्तर शोधतात.यंत्रबुद्धी या बौद्धिक सूत्रांचा वापर  नेमका कसा करते?यंत्रबुद्धीचेही दोन प्रकार असतात : एक असते ती सांगकाम्या बुद्धी. इथे सगळ्या सूचना अगदी एकेक करून विस्कटून सांगाव्या लागतात. एकदा हे सांगितले की मग या बुद्धीला कितीही मोठे किंवा कष्टाचे किंवा कंटाळवाणे काम द्या. ती ते अचूक आणि न थकता करणार. ही बुद्धी जिज्ञासा आणि औत्सुक्याने नाही तर फक्त नियमानुसार काम करते. अल्गोरिदमचा दुसरा प्रकार असतो स्वशिक्षणाचा. ही हरकाम्या बुद्धी. इथे आत्ता काय परिस्थिती आहे आणि शेवटी काय अपेक्षित आहे हे सांगायचे, ही सूत्रे शिकवायची आणि मग सध्याच्या माहितीवरून अपेक्षित उत्तर शोधण्याचा मार्ग या बुद्धीला स्वतःचा स्वतः शोधू द्यायचा. टक्केटोणपे खात, चुकतमाकत ही बुद्धी शिकत जाते, उत्क्रांत होत जाते.एकदा शिकली की मग तिला सूचना देत बसावे लागत नाही. ही बुद्धी कठीण आणि गुंतागुंतीच्या समस्यांवरही स्वतःच उत्तरे शोधते. हे मशीन लर्निंग किंवा यंत्राचे स्वशिक्षण. सध्याची सर्वात यशस्वी बुद्धी. आणि या स्वसंवेद्य बुद्धीचा एक उच्च आणि गहन आविष्कार म्हणजे डिप लर्निंग. अर्थात गहनमती पण, यंत्राच्या आत ही गहनमती नेमकी कशी विकसित होते, विकसित झालेल्या बुद्धीची विचार करण्याची प्रतिमाने (मॉडेल्स) काय असतात हे मात्र भल्याभल्या तज्ज्ञांनाही सांगता येणार नाही. त्याबाबत ही गहनमती गूढमतीदेखील आहे. 

तिथल्या विचारवृत्तींचा मानवी बुद्धीला काही थांग लागत नाही. जोपर्यंत दिलेले अंतिम उत्तर प्रत्यक्षात बरोबर येतेय तोवर ती गूढता कळली नाही तरी व्यावहारिक पातळीवर फरक पडत नाही हे खरे. पण दिलेले उत्तर प्रत्यक्षात बरोबर आहे की नाही किंवा भविष्यात बरोबर येईल की नाही हेच कळायला मार्ग नसेल तर या गहनमतीवर कितपत विश्वास ठेवायचा हे ठरवायला एकच मार्ग असतो. तिची विचार पद्धती निर्दोष आहे की नाही ते तपासणे. पण गहनमती ते करू देत नाही. गहनमतीच्या डोक्यात नेमके काय शिजते हे शोधणे हे या क्षेत्रातील सध्याचे मोठे आव्हान तर आहेच आणि त्यासोबतच या गहनमतीच्या डोक्यात मानवी बुद्धीलाही आव्हान देण्याचे तर काही शिजत नाही  ना, ही भीतीही आहे. या आव्हानांची आणि भीतीची चर्चा पुढील लेखांमध्ये. एकेका क्षेत्राच्या संदर्भात..vishramdhole@gmail.com