-कौशल इनामदार (ख्यातनाम संगीतकार)'लाल सलाम' या आगामी तमिळ चित्रपटासाठी ए. आर. रहमान यांनी भक्कियाराज ऊर्फ बंबा बाक्या आणि शाहूल हमीद यांचे आवाज वापरले आहेत. या आधीही हे दोन्ही गायक रहमानसाठी गायले होते; पण 'लाल सलाम'मधल्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी हे दोन्ही गायक हयात नव्हते. रहमानने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) वापर करून या दिवंगत गायकांचे आवाज गाण्यात उतरवले आहेत.
या घटनेने संगीतामध्ये एआयच्या वापराबद्दल अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. कविता कृष्णमूर्तीसारख्या ज्येष्ठ गायिकेने याबाबत व्यक्त केलेली भीती स्वाभाविक आहे हे कुठवर जाणार? याचा गैरवापर तर नाही ना होणार? झाला तर कसा होईल? या सर्वातून उद्भवणाऱ्या नैतिक, कायदेशीर आणि तांत्रिक प्रश्नांचं काय? संगीत क्षेत्रात एआयचा वापर खरे तर गेली अनेक वर्ष होत आहे. 'मेलोडाइन' किंवा 'ऑटोट्यून' नावाच्या आज्ञावली, सुरात न गायलेले गाणे सुरात आणण्याकरिता मदत करतात. ही एआय खरे तर कृत्रिम मेधाच आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संज्ञा न वापरता कृत्रिम मेधा ही संज्ञा का वापरतो आहे, याचा जरा खुलासा करतो. 'बुद्धिमत्ता' म्हणजे एखाद्या धारणेबद्दल निर्णय घ्यायची आणि तो निर्णय राखून ठेवण्याची क्षमता. अधिकाधिक माहिती हे बुद्धीचं खाद्य आहे. 'मेधा' म्हणजे बुद्धीला ज्ञात संकल्पनांवर काहीतरी रचण्याची क्षमता. 'मेधा' या शब्दाशी संबंधित 'मेध' हा जो शब्द आहे, त्याचा एक अर्थ
म्हणजे एखाद्या गोष्टीचं सार किंवा तात्पर्य काढणं, यंत्राच्या आधारे एखाद्या गोष्टीचं विश्लेषण करून निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यावर अधिक काही रचण्याची क्षमता अथवा त्या गोष्टीचं सार किंवा तात्पर्य काढण्याचं काम करणं,
म्हणजेच कृत्रिम मेधा संगीताच्या संदर्भात सध्या मूलतः तीन क्षेत्रांमध्ये तिचा उपयोग केला जातो :
१)संगीतनिर्मिती: 'बुमी'सारखी काही अॅप्स तुम्ही आज्ञा द्याल त्या पद्धतीची संगीतरचना तयार करून देतात. उदा. 'मला नृत्य करण्यासाठी सयुक्तिक असं संगीत हवं आहे,' अशी आज्ञा दिली की, नृत्य करण्यासाठी अनुरूप असे संगीत ते अॅप तयार करते.
२) ध्वनिमिश्रण अथवा मास्टरिंग: 'ओझोन'सारखी अॅप्स गाणं ऐकून कुठल्या वाद्याचं ध्वनिमान काय असायला हवं, ते गाण्यामध्ये कुठल्या वारंवारिता वाढवायला अगर कमी करायला हवी, हे ठरवून त्याप्रमाणे ध्वनिमिश्रण करतात.
३) वाद्य आणि आवाजाची पुनर्निर्मिती: बेसुन्ऱ्या आवाजाला सुरात आणणं हे काम melodyne सारखी काही अॅप्स करतच होती; परंतु एआयमुळे आता एक वाद्य दुसऱ्या वाद्यात किंवा एक आवाज दुसऱ्या आवाजात परिवर्तित होऊ शकतो. गाण्यात बासरी वापरली आहे; पण त्या जागी ट्रम्पेट वापरून पाहायचं असेल तर कृत्रिम मेधेच्या साहाय्याने आता तुम्ही ते करू शकता. रहमानने जे केलं आहे ते याच गटात मोडतं. यामुळे कलेच्या क्षेत्रात काही नैतिक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उदाहरणार्थ, 'मला अमुक अमुक प्रकारचं संगीत ऐकायचं आहे,' असा केवळ आदेश दिल्यावर ज्या संगीताची निर्मिती होते, त्याची बौद्धिक संपदा नेमकी कुणाच्या मालकीची?
ज्याच्या मनात ती संकल्पना आली आणि ज्याने तो आदेश दिला त्याची, की ज्या कंपनीने ती आज्ञावली तयार केल्याने त्या आज्ञावलीला त्या बाबतीतील माहिती गोळा करून आणि त्या माहितीच्या तात्पर्यातून ती रचना करता आली, त्या कंपनीची? की ज्या आधीच्या कलाकृतींमधून या आज्ञावलीने छाननी केली, त्या कलाकृतींच्या निर्मात्यांची?
काही संगीतज्ञांना ही भीती आहे की, एआयनिर्मित संगीतामुळे शैली मरेल, माणूस संगीत करतो तेव्हा तो एखाद्या परंपरेशी जोडला गेला असतो. उदा. भारतीय संगीतकार सनईचा वापर मांगल्य प्रतीत करण्यासाठी करील, परंतु अमेरिकन संगीतकाराच्या मनात सनई आणि मांगल्याचा काहीच अनुबंध नसेल! संगणकामुळे शैली आणि परंपरेमुळे आलेलं वैविध्य संपण्याची शक्यता वाटते; कारण संगणक अनुभवांचं एकत्रीकरण आणि प्रमाणीकरण करून टाकतो. यामुळे एकजिनसीपणा वाढून विविधतेचा ऱ्हास होतो. मशीन किशोरकुमारच्या आवाजात गाऊ लागलं अथवा सुधीर फडके यांच्याप्रमाणे चाली करू लागलं तर नव्या संगीतकारांची, गायकांची गरज उरेल काय? संगणक-निर्मित संगीत हे मानवनिर्मित संगीतापेक्षा वरचढ ठरेल काय? अशा प्रश्नांना माझं एक उत्तर आहे. कुठल्याही कलेत परिपूर्णतेच्या जवळ जाणं हे उद्दिष्ट असलं तरी परिपूर्णता हा कलेचा मृत्यू आहे. तसाच तो संगीतातही आहे. ह्युमन एररमुळे अनेकदा कलेची खुमारी वाढते. लोक बेगम अख्तर यांचं गाणं ऐकायला जायचे तेव्हा ते त्यांचा आवाज चिरकण्याची वाट पाहायचे, कारण तसं होणं त्यांच्या गाण्यातली लज्जत आणि एक्स्प्रेशन वाढवत असे.
भावनेचं कलानिर्मितीमधलं स्थान अनन्यसाधारणThe difference between an artist and a machine is that the artist has a story. ही गोष्ट' यंत्राला नसते, कलेला संदर्भ असला तर ती कला। एकच गाणं अनेक गायक गातात; पण एखाद्या गायकाचं सुरेल गाणंही आपल्याला भावत नाही; तर एखाद्याचं किंचित सुराला हुकलेलं गाणंही आपल्या हृदयाला हात घालतं. असं का होतं? तर दुसरा गायक त्या गाण्याला संदर्भ देण्यात यशस्वी ठरतो. काळाप्रमाणे तंत्रज्ञानाला एकच दिशा ठाऊक आहे - पुढची. त्याला मागे फिरता येत नाही. ते वरदान स्मृतीच्या रूपाने केवळ माणसाला मिळालं आहे.
बुद्धी, मेधा, स्मृती, धृती, प्रज्ञा आणि विवेक यात सर्वांचं संश्लेषण हे केवळ मानवातच आहे. पं. यशवंत देव एकदा म्हणाले होते, 'यंत्राचा वापर करण्यात काहीच गैर नाही; उलट तो केलाच पाहिजे; पण यात माणसाचं यंत्र होत नाही ना, याकडे मात्र डोळसपणे लक्ष दिलं पाहिजे.' इतर कुठल्याही तंत्रज्ञानाप्रमाणेच एआयबद्दलही ते खरं आहे! (ksinamdar@gmail.com)