सारांश लेख: अजितदादा पक्ष घेऊन गेले होतेच; पण काकांनी मोडता घातला त्याचे काय?

By अतुल कुलकर्णी | Published: August 11, 2024 07:24 AM2024-08-11T07:24:38+5:302024-08-11T07:25:15+5:30

कॉम्रेड एकमेकांना भेटले की, लाल सलाम म्हणतात... आपल्या पक्षात एकमेकांना भेटले की, आता गुलाबी सलाम म्हणायचे आदेश निघाल्याचे वृत्त आहे.

Special Article Ajit Pawar had taken the party But what about the Sharad Pawar who broke it? | सारांश लेख: अजितदादा पक्ष घेऊन गेले होतेच; पण काकांनी मोडता घातला त्याचे काय?

सारांश लेख: अजितदादा पक्ष घेऊन गेले होतेच; पण काकांनी मोडता घातला त्याचे काय?

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

अजितदादा, गुलाबी सलाम..!

गावाकडे एकमेकांना भेटले की, लोक रामराम म्हणतात... कॉम्रेड एकमेकांना भेटले की, लाल सलाम म्हणतात... आपल्या पक्षात एकमेकांना भेटले की, आता गुलाबी सलाम म्हणायचे आदेश निघाल्याचे वृत्त आहे... हे खरे की खोटे त्या पीआर एजन्सीला विचारून सांगितले तर बरे होईल... म्हणजे आम्ही पण तुम्हाला गुलाबी सलाम म्हणत जाऊ... नाहीतरी तुम्ही जी यात्रा काढली आहे, त्यासाठीची बस गुलाबी रंगाची आहे..! तुमचे जाकीटही गुलाबी रंगाचे आहे... (याआधीदेखील गुलाबी गँगबद्दलची माहिती मी आपल्याला पत्राने कळवली होतीच) अशा गुलाबी गुलाबी वातावरणात आपली यात्रा सुरू आहे; पण अजूनही आपले काही नेते गुलाबी जाकीट वापरत नाहीत. त्यांना जरा योग्य ती समज तुम्ही द्यालच... असो. मुद्दा तो नाही. 

परवा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यात आपण जी फटकेबाजी केली, त्यावरून सर्वत्र चर्चा रंगली आहे. “मला मुख्यमंत्री करणार असे सांगितले असते, तर मी अख्खा पक्ष घेऊन आलो असतो...” असे आपण त्या कार्यक्रमात सांगितले; पण त्यामुळे प्रश्नांचा गुंता अजूनच वाढला आहे. आपण जेव्हा भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी आपल्या सोबत सगळा पक्ष नव्हता का..? पक्षाच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिल्याचे पत्र आपल्या सोबतच होते. तेच पत्र आपण तत्कालीन राज्यपालांना दिले होते. त्याच्या आधारेच आपल्याला उपमुख्यमंत्रिपद देऊ केले होते. मग त्याचवेळी आपण मुख्यमंत्रिपद का मागितले नाही? ते तुम्हाला दिले गेले नसते..? की देणारच नव्हते..? की आपल्या यादीतले आमदार प्रत्यक्षात सोबत येतील की नाही, याची भाजपला खात्री नव्हती..? हे सगळे प्रश्न पुन्हा नव्याने निर्माण झाले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आपण शपथ घेतली आणि काही तासांत काकांनी अशी काही खेळी केली की, आपण व्हिलन झालात. काकांनी आपले कथित बंड तोडूनमोडून टाकले.

एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत तसे झाले नाही. ते एकदा बाहेर पडले ते मागे वळून बघणार नाही या जिद्दीने..! त्याचा त्यांना फायदाही झाला. आपणही अशीच टोकदार भूमिका घेतली असती तर, आपल्यालाही त्याचा फायदा झाला नसता का..? ‘मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो,’ या विधानावर त्या दिवशी ठाण्यातल्या सभागृहात हशा पिकला... टाळ्या वाजल्या... मात्र त्या आपल्या विधानावर होत्या की, आपल्या फसलेल्या बंडासाठी होत्या? याचीही नंतर चर्चा रंगली होती. हे आपल्याला माहिती असावे म्हणून सांगून ठेवतो... त्याच कार्यक्रमात आपण ज्येष्ठतेचा मुद्दा उपस्थित केला. आपण १९९० च्या बॅचचे, तर फडणवीस १९९९ च्या बॅचचे...  एकनाथ शिंदे २००४ च्या बॅचचे... असे आपण सांगितले. ज्येष्ठता यादी बाजूला सारून शिंदे मुख्यमंत्री झाले आणि आपण त्यांच्याच सरकारमध्ये तिसऱ्या नंबरवर आलात... खरे तर आपण हे बोलायला हवे होते का? त्यावरूनही आपल्याच पक्षात उलटसुलट चर्चा सुरू आहे. असे सांगून आपण आपली अगतिकता, हतबलता तर व्यक्त केली नाही ना...

तरी आपले परममित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू सांभाळून धरली. “अजित पवार आमच्यापेक्षा ज्येष्ठ असले तरी, त्यांचा आणि माझा विक्रम कोणीच मोडू शकणार नाही. मी एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री, अशी तिन्ही पदे भूषवली. अजित पवार यांनी एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री अशी पदे भूषविली,” असे सांगून त्यांनी वातावरण बदलण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असली तरी आपल्याला सहयोगी संपादक करा असा सल्ला फडणवीस यांनी का दिला, याचे उत्तर मिळाले नाही. याचा अर्थ यापुढेही आपण कायम सहयोगी, उप... अशीच पदे भूषवणार असे तर त्यांना सांगायचे नसेल..? मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र “हे पुस्तक म्हणजे आपल्या आयुष्याचा केवळ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है..” असा सिक्सर मारला..! तोही तुम्हा दोघांच्या समोर..!! यातून काय ते समजून घ्यायला हवे, असे आपल्या पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांना वाटत आहे...

सध्या आपला दौरा सुरू आहे. परवा आपण कांद्याच्या प्रश्नावरून माफी मागितली. माफी मागतानाचा आपला टोन नम्रतेचा नव्हता, तर त्यात एक ठसका होता. अशी कुठे माफी असते का? असेही काही शेतकरी तिथे भाकरी, ठेचा, कांदा खाताना बोलत होते. 

जाता जाता : आपल्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते तिथे खासगीत सांगत होते. ते आपल्याला माहिती असावे म्हणून सांगून ठेवतो... पीआर एजन्सीच्या सल्ल्याने सत्ता मिळाली असती तर आतापर्यंत अशा एजन्सीजनी त्यांना हवे त्या व्यक्तीला मुख्यमंत्री केले असते... आणि पैशाने सत्ता मिळाली असती तर बडे उद्योगपती कधीच मुख्यमंत्री झाले असते. आपल्याएवढी ग्रामीण महाराष्ट्राची नस माहिती असलेला नेता दुसरा नाही. ती नस आपण बरोबर ओळखा आणि काम सुरू करा... मग बघा, यश हात जोडून तुमच्या पुढे येईल. हे मनापासून सांगतोय...

- तुमचाच बाबूराव

Web Title: Special Article Ajit Pawar had taken the party But what about the Sharad Pawar who broke it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.