- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
‘इंडिया’चे नाव बदलून आता केवळ ‘भारत’ केले जाईल का? - सध्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे. वास्तविक आपल्या राज्यघटनेमध्ये म्हटले आहे ‘इंडिया दॅट इज भारत’.. इंडिया म्हणजे भारत! पण सध्या या चर्चेला दोन फाटे फुटले आहेत : एक विरोधाचा आणि दुसरा समर्थनाचा!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे कठोर टीकाकार म्हणतात, ‘इंडियन नॅशनल डेवलपमेंट इनक्ल्यूसिव्ह अलायन्स’ तथा ‘इंडिया’ असे नाव विरोधकांच्या आघाडीने घेतल्यापासून भाजपची चिडचिड झाली आहे. या त्रासामुळेच देशाचे नाव बदलले जात आहे. राष्ट्रपतींच्या आमंत्रण पत्रात ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असा उल्लेख, जी २० संमेलनात पंतप्रधानांच्या समोरच्या नामपट्टीवर ‘भारत’ ही याची सुरुवात आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीने इंडिया हे नाव घेतल्यामुळे घाबरून देशाचे नाव बदलले जात आहे हे म्हणणे मला बिलकुल मान्य नाही. भारत नावाचा उपयोग करण्यामागे ऐतिहासिक वारसा दाखवण्याची भूमिका आहे. देशाला इंग्रजीत जर कोणी ‘इंडिया’ म्हणत असेल तर काही हरकत नाही. अनेक लोक आपल्या देशाला हिंदुस्थान असेही संबोधतात. वास्तविक ज्याप्रकारे आपण राष्ट्रभाषा, राजभाषा आणि लोकभाषेचा वापर करतो, त्याचप्रमाणे याकडे पाहिले पाहिजे.
प्राचीन काळापासून पृथ्वीच्या या भूभागाला भारत म्हणून ओळखले गेले. आर्यावर्त, जम्बूद्वीप अशा नावांनीही या देशाला कधीकाळी संबोधले जात होते. भारत हे नाव दीर्घकाळ वापरले गेले आहे. इतिहासातून फेरफटका मारल्यावर लक्षात येईल की भारत हा उल्लेख प्राचीन काळापासूनचा आहे. इंडियाचा जन्म तर खूप नंतर झाला.
जैन धर्माचे प्रवर्तक ऋषभदेवजी यांचे मोठे पुत्र महायोगी भरत यांच्या नावावर या देशाचे नामकरण झाले अशी एक धारणा आहे. ऋषभदेवजी यांनी धर्माचे अनुसरण करण्यासाठी राजगादी सोडली आणि आदिनाथ भगवान असे नाव घेतले. त्यांचे पुत्र भरत चक्रवर्ती राजा झाले. त्यांचे साम्राज्य चारी दिशांनी पसरलेले होते. म्हणून या भूभागाला ‘भारतवर्ष’ असे नाव दिले गेले. हळूहळू त्याचे ‘भारत’ झाले. एक संदर्भ प्राचीन भारताचे चक्रवर्ती राजा दुष्यंत आणि त्यांची राणी शकुंतला यांचा पुत्र भरत याचाही दिला जातो. भगवान राम यांचे बंधू भरत यांचाही संदर्भ दिला जातो.
इंडिया हा शब्द आपल्याकडे कधीपासून वापरला जाऊ लागला? त्याहीआधी हिंदुस्थान या शब्दाचा प्रवेश कसा झाला? - मध्ययुगातील इतिहासात जेव्हा इराणी आणि तुर्क लोकांनी सिंधु नदीच्या खोऱ्यात प्रवेश केला तेव्हा त्याला हिंदूघाटी म्हटले. त्याचे कारण ते लोक ‘स’ या अक्षराचा उच्चार ‘ह’ असा करत. सिंधु नदीला हिंदू नदी म्हटले गेले आणि या भागाला हिंदुस्थान म्हणणे सुरू झाले.
शब्दांचा प्रवास कसा विस्मयकारक असतो... सिंधू नदीच्या किनाऱ्यावर सिंधु संस्कृती विकसित झाली आणि तिची कीर्ती युनानपर्यंत पोहोचली. सिंधु नदीचे नाव इंडिया असेही होते म्हणून युनानीनी त्याला इंडस म्हटले. हा इंडस शब्द युनानी भाषेतून लॅटिनमध्ये जाता जाता इंडिया झाला. लॅटिन ही रोमन साम्राज्याची अधिकृत भाषा होती. इंग्रजांनी आपल्यावर कब्जा केला तेव्हा इंडिया हा शब्द आपल्यावर स्वार झाला. सामान्य माणसासाठी मात्र हा देश भारत आणि हिंदुस्थान राहिला.
स्वातंत्र्यानंतर देशाचे नाव काय असावे, यावर घटनासभेतल्या धुरंधर आणि विद्वान लोकांनी प्रदीर्घ चर्चा केली. काही सदस्य भारत तर काही भारतवर्ष किंवा हिंदुस्थान असे नाव ठेवू इच्छित होते. शेवटी असा विचार केला गेला की भारताला जगभर इंडिया म्हणून ओळखले जाते; म्हणून त्याचे नाव इंडिया राहू द्यावे. राज्यघटनेमध्ये उल्लेख करताना मात्र ‘इंडिया दॅट इज भारत’ इंडिया म्हणजेच भारत... असे लिहिले गेले. अशा प्रकारे इंडिया आणि भारत दोन्ही शब्द समाविष्ट झाले.
कोणताही देश दुसऱ्या देशावर कब्जा करतो तेव्हा सगळ्यात आधी भाषा, वेशभूषा आणि राष्ट्रीयता यावर हल्ला करतो! इंग्रजांनी तिन्ही पातळ्यांवर हेच केले. आपली वेशभूषा त्यांनी बदलली कारण कापड गिरण्या संपवून या देशाची आर्थिक ताकद त्यांना तोडायची होती. जो देश जगातील सर्वात उत्तम मलमल तयार करायचा तो कापड आयात करू लागला. इंग्रजांना कारकून निर्माण करायचे होते. त्यासाठी त्यांनी आपली शिक्षण पद्धती बदलली. त्यातून बाहेर येताच आज आपण बौद्धिक जगतात अग्रभागी आहोत. आपल्या संस्कृतीला घातक असलेले प्रत्येक बंधन आपण विचारपूर्वक तोडले पाहिजे.
शब्दांच्या बाबतीत काथ्याकूट करण्यापेक्षा आपण आपले सगळे लक्ष देशाचा सामान्य माणूस शांततेत आणि सौहार्दात कसा राहील, विकासपथावर कसा पुढे जाईल, विद्वेष कसा नष्ट होईल, याकडे द्यावे. गंगा, समुद्र आणि हिमालयाची पूजा आपण जरूर करावी; परंतु, त्यांचे संरक्षण कसे करणार, हा खरा प्रश्न आहे. पश्चिमी जग आपल्याला आता इंडियन म्हणते, उद्या भारतीय म्हणू लागेल; परंतु, मूळ प्रश्न हा आहे की आपण आपली संस्कृती कशी सांभाळणार? कशी विकसित करणार?
खासदार या नात्याने राष्ट्रपतींना पत्र लिहिताना मी अनेकदा विनंती केली की ‘महामहिम’ या शब्दाचा वापर थांबवला पाहिजे. शेवटी प्रणव मुखर्जी यांनी हा शब्द वापरातून काढला.
उपराष्ट्रपती या नात्याने व्यंकय्या नायडू यांनी खासदारांना सांगितले होते, संसदेमध्ये आपण ‘आय बेग टू यू’ असे म्हणू नये; पण काय झाले? आजही ‘माय लॉर्ड’ कानावर पडतेच. आपल्या विमानांवर व्हिक्टोरिया टेरिटरी (व्हीटी) लिहिलेले असते. ते अजूनही आपण काढू शकलेलो नाही.. अशा किती गोष्टी सांगू?