यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांसोबतच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार असलेल्या आणि ते मागणी करू शकतात अशा मतदारसंघांमध्येही भाजपचे ‘निवडणूक सुपर वॉरिअर्स’ नेमण्याचे काम प्रदेश भाजपकडून सुरू झाले आहे. केवळ लोकसभाच नाही, तर विधानसभा निवडणुकीतही ते काम करणार असल्याने लोकसभा नसेल; पण विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० सुपर वॉरिअर्स नेमण्याचे काम सध्या भाजपकडून सुरू आहे. एका विधानसभा मतदारसंघात साधारणत: २८० ते ३०० बुथ असतात. प्रत्येक सुपर वॉरिअरला तीन बुथची जबाबदारी दिली जाईल. त्या बुथअंतर्गत येणाऱ्या भागात केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी लोकांना जोडणे, त्यांच्याशी सातत्याने संपर्क, निवडणुकीच्या दृष्टीने करावयाची तयारी, याची जबाबदारी त्यांच्यावर राहील. आतापर्यंत १४० विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १०० सुपर वॉरिअर्स नेमले आहेत. विविध विधानसभा मतदारसंघांमधील पक्षाच्या कोअर कमिटीकडून ही नावे प्रदेशाकडे पाठविलेली होती. २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण १० हजार ८०० जणांची नियुक्ती केली जाईल. दिवाळीनंतर या सर्वांना प्रदेश भाजपकडून विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजप वॉररूम सुरू करत आहे. आतापर्यंत जवळपास १३५ वॉररूम उभारण्याचे काम झाले आहे. तीन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ‘महाविजय २०२४’साठी नियुक्त समितीचे अध्यक्ष आ. श्रीकांत भारतीय यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत या कामाचा आढावा घेण्यात आला. २०१९ मध्ये अबाधित शिवसेनेकडून निवडून गेलेले १८ पैकी १३ खासदार आज शिंदेंसोबत आहेत. राष्ट्रवादीचे केवळ सुनील तटकरे हेच अजित पवार यांच्यासोबत गेले, बाकीचे खासदार शरद पवार यांच्यासोबत आहेत. भाजपने लोकसभेच्या ४५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘शिंदे-अजित पवारांच्या पक्षांशी युती असूनही तुम्ही स्वबळाची तयारी करता आहात, हे कसे?’- असे एक- दोन भाजप नेत्यांना विचारले. ‘मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्हालाच घ्यावी लागेल. फक्त त्यांच्यावर सोडून देता येणार नाही. शेवटी केंद्रात भाजपची सत्ता येणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी सगळेकाही करावेच लागेल. ही कवायत स्वबळासाठी नाही, तर मित्रपक्षांचे बळ वाढविण्यासाठी आहे’, असेे ते नेते सांगत होते. लोकसभा निवडणूक भाजप हा मित्रांसोबत लढेल, हे स्पष्टच आहे; पण उद्या विधानसभा निवडणुकीत काही वेगळे घडले, तर स्वबळाचीही तयारी असावी, असा उद्देश दिसतो, तसे नसते, तर केवळ लोकसभा निवडणुकीपुरतेच सुपर वॉरिअर्स नेमले असते. फडणवीसांचे नियोजन : जनादेश-२देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी जनादेश यात्रा काढली होती आणि त्या यात्रेला मोठा प्रतिसाददेखील मिळाला होता. त्यानंतर भाजप व शिवसेनेला निर्भेळ बहुमतदेखील मिळाले; पण अनपेक्षित घटनाक्रमानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले होते. यावेळी फडणवीस यांच्या जनादेश यात्रा-२ चे आयोजन करण्याची तयारी प्रदेश भाजपने सुरू केली आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही पक्षात झाली आहे. फरक एवढाच की, ही यात्रा यावेळी विधानसभेच्या नाही, तर लोकसभा निवडणुकीच्या आधी असेल. राज्यातील सध्याच्या आंदोलनाचा धुरळा खाली बसण्यावर यात्रा कधी काढायची ते अवलंबून असेल. दिवाळीनंतर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती मिळाली. कदाचित जानेवारीच्या शेवटी यात्रा निघेल, असे म्हटले जाते. अजितदादा अन् आजारमराठा आंदोलन जोरात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आजारी पडले आहेत. त्यांना डेंग्यूची लागण झाली आहे. या आंदोलनावर त्यांनी फारसे भाष्यदेखील केलेले नाही. त्यामुळे माध्यमांना आणि टीकेला सामोरे जाण्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आली आहे. अजितदादा संवेदनशील विषयांवर फारसे बोलत नाहीत, असाही अनुभव आहे. एखाद्या विषयाची माध्यमांसमोर मांडणी करण्याची जबाबदारी ते ज्या पक्षात इतकी वर्षे होते तिथे शरद पवारांवर असायची. त्यामुळे अजितदादांवर बोलण्याची वेळ येत नसे; पण आता तसे नाही. काही दिवसांपूर्वीदेखील ते आजारी पडले होते. तेव्हा पालकमंत्रिपदांचे वाटप होत नसल्याने ते नाराज आहेत, असे बोलले गेले. दरवेळी आजार कामाला येईलच, असे नाही. अजितदादा रोखठोक भूमिका घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पक्ष त्यांच्या नेतृत्वात उभा राहत आहे; त्यांच्या कालच्या आणि आजच्या भूमिकेत फरक आहे. त्यामुळे व्यक्त होण्याची सवय करावी लागेल.जाता जाता : दिवाळीच्या आठ-पंधरा दिवस आधीपासून मंत्रालयात वेगळीच लगबग सुरू असते. कंत्राटदार, पुरवठादार, बिल्डरांकडून गिफ्ट बॉक्सेस मोठ्या प्रमाणात येत असतात. पदानुसार मंत्री कार्यालये, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुंदर भेटी दिल्या जातात. सध्या तेच सुरू आहे. पुढचे आठ दिवस बरेच जण सायंकाळी उशिरापर्यंत मंत्रालयात थांबून ‘गिफ्ट’ची वाट पाहतील. सुरक्षा यंत्रणा कितीही कडक केली तरी ‘गिफ्ट’च्या गाड्या व्यवस्थित ये- जा करतात. ‘गिफ्ट आपल्या दारी’ उपक्रम सध्या तेजीत आहे.