- चिन्मय गवाणकर (माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञ)
६ मार्च २०२५ रोजी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘AI कोश’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अनावरण केले. ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत १०,३७० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा भाग असलेला हा प्रकल्प, भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विकासाला चालना देण्यासाठी आणि या क्षेत्रातील नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. AI कोश हे सुरक्षित व्यासपीठ ‘भारतीय’ माहिती संच, AI प्रारूपे आणि संगणक साधने उपलब्ध करून देते. या नव्या प्रयत्नामुळे भारतीय AI संशोधनाला नवीन दिशा मिळण्याची सुरुवात झाली आहे.
AI कोश भारतीय AI अभ्यासकांना ३००हून अधिक माहिती संच आणि ८०हून अधिक AI प्रारूपे पुरवते. या माहिती संचामध्ये जनगणना माहिती, हवामानाची माहिती आणि कृषी, खाण आणि जलशक्ती मंत्रालयांसारख्या विविध क्षेत्रांतील माहितीचा समावेश आहे. तेलंगणा सरकारच्या ‘ओपन डेटा तेलंगणा’सारख्या राज्यस्तरीय उपक्रमांमधूनही माहिती उपलब्ध आहे. या व्यासपीठावर AI सँडबॉक्स क्षमतादेखील आहे (सॅन्ड बॉक्स म्हणजे नवीन गोष्टी करून बघण्यासाठी अल्पदरात/कधी कधी फुकट मिळालेली संगणन क्षमता.. म्हणजे लहान मुले पटापट वाळूत किल्ले बनवतात आणि आपल्या संकल्पनांना मूर्त रूप देतात काहीसे तसे) हे AI कोश व्यासपीठ भारतासाठी ‘गेम-चेंजर’ ठरू शकते. AI प्रारूपांना शिकायला खूप माहिती (डेटा) लागते. आधीच्या माहितीवर ‘शिकून’ ही प्रारूपे पुढे काय होईल याचे भाकीत करू शकतात. म्हणजे जर AI ला मराठी कसे बोलायचे हे शिकवायचे असेल तर लाखो मराठी पुस्तके /ब्लॉग्स/वेबसाइट्स शोधून किंवा मराठी बोलणाऱ्या माणसाचे ऑडिओ रेकॉर्डिंग शोधून AI ला शिकवावे लागते. त्यात कुणाच्याही बौद्धिक संपदा हक्कांचा अथवा खासगीपणाचा भंग होऊ नये याची नैतिक काळजीही घ्यावी लागते. हे सगळे करणे सामान्य शास्त्रज्ञ अथवा विद्यापीठातील विद्यार्थी, छोटे स्टार्ट अप्स यांना शक्य होईलच असे नाही. माहितीची मुबलक उपलब्धता हा एक मोठा अडसर असतो. आता सरकारनेच अशी माहिती संशोधनासाठी फुकट उपलब्ध करून दिल्यामुळे तो प्रश्न सुटेल.
ग्राहकांची माहिती गोळा करणारी बहुतांश ॲप्सची मालकी सध्या तरी मोठ्या बहुराष्ट्रीय आणि विशेषतः अमेरिकन कंपन्यांकडे असल्याने सध्या ‘माहिती संचा’च्या जगात त्यांची मक्तेदारी आहे. अनेक AI प्रारूपे शिकण्यासाठी सध्या परदेशी माहितीवर (उदा. गुगलची गुंतवणूक असलेले कॅगल) अवलंबून आहेत, जी भारतीय संदर्भांना योग्य असतीलच असे नाही. शिवाय त्यामुळे प्रारूपाच्या शिक्षणात पूर्वग्रह निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील शेतीमध्ये किती पीक येईल याचे भाकीत करायला आपण अमेरिकन शेतीच्या माहितीवर शिकलेले प्रारूप वापरले तर उत्तर चुकीचेच येणार ! कारण अमेरिकेत असलेली हजारो एकर पसरलेली शेते. तिकडचे हवामान, सदैव उपलब्ध असलेले सिंचन आदी गोष्टी आपल्याकडच्या बहुतांश अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतीच्या वास्तवाच्या अगदी विरुद्ध आहेत. AI कोश विविध क्षेत्रातील भारतातील विशिष्ट माहिती संच उपलब्ध करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भविष्यात आपण देशात निर्माण केलेली AI ॲप्लिकेशन्स अधिक अचूक आणि भारतीय वापरकर्त्यांसाठी प्रभावी ठरतील. परदेशी माहितीवरील आपले अवलंबित्वही कमी होईल.
AI कोशामुळे स्थानिक नवसंशोधकांना भारतीय समस्यांसाठी उपाय तयार करणे शक्य होईल. उदा : स्थानिक हवामान केंद्रांकडून मिळणाऱ्या माहितीवरून पिकांचे अंदाज, भारतीय रुग्णांची आरोग्यविषयक माहिती वापरून साथ रोगांच्या उद्रेकाचा अंदाज, भारतीय भाषेतील शिक्षण साधने विकसित करून सर्वदूर पोहोचविणे, स्थानिक भाषेत संभाषण करून सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देणारे चॅटबॉट्स बनविणे वगैरे!
भारत सरकारने आपल्या मंत्रालयाकडे असलेले माहिती संच उपलब्ध करून दिले आहेतच; पण खासगी कंपन्या आणि स्टार्टअप्सना निनावी, ग्राहकांची वैयक्तिक माहिती नसलेले माहिती संच या AI कोशात दान करण्याचे आवाहन केले आहे. शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था, स्टार्टअप्स, सामाजिक संस्था यामध्ये सहभागी होऊ शकतात. गुगल, उबर, फोनपे, सर्वम एआय, ओला कृत्रिम यांसारख्या कंपन्यांनी आधीच यात आपला सहभाग नक्की केला आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण माहितीचा एक समृद्ध स्रोत आपल्या देशातच निर्माण होईल. भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. chinmaygavankar@gmail.com