- डॉ. विजय दर्डा(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
झपाट्याने प्रगती करत असलेल्या बांगलादेशात गेल्या महिन्यात अचानक ‘इंडिया आउट’च्या घोषणा कानावर आल्या, ते व्हा सर्वांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू त्याच सुमारास तोच राग आळवत होते. हा राग बांगलादेशात कसा आणि का सुरू झाला? हे केवळ बांगलादेशातील विरोधी पक्षांचे आंदोलन आहे की चीनची नवी चाल?
-चीनवर लक्ष ठेवून असलेल्या जाणकारांचे म्हणणे असे की या पूर्ण घटनेमागे चीनचा हात आहे. चीनची ही कुटिल नीती सफल होताना दिसत नाही; कारण नातीगोती सांभाळण्याची भारताची संस्कृती ! चीनच्या लोभस चालीत फसणारे आपले शेजारीही जाणतात की खरा भरवशाचा मित्र भारतच !भारत अवामी लीगचे समर्थन करतो हे बांगलादेशचा प्रमुख विरोधीपक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टी (बीएनपी)चे दुखणे ! अवामी लीगच्या सर्वोच्च नेत्या आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याबरोबर भारताचे संबंध अत्यंत मजबूत आहेत. त्यांनी बांगलादेशाला प्रगतीच्या मार्गावर वेगाने नेले. तेथे कट्टरपंथीयांच्या विरोधात ‘झीरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबून इस्लामिक स्टेट आणि अल कायदाची सहयोगी संघटना हिज्ब-ऊत-तहरीर, जमात उल मुजाहिदीन ए बांगलादेश आणि अनसारउल्लाह, बांगला टीम अशा समूहांच्या दहशतवाद्यांना फासावरही लटकावले आहे.
बांगलादेशातील विरोधीपक्ष आणि या दहशतवादी संघटना चीनला आजवर मदत करत आल्या. त्यांच्याच माध्यमातून बांगलादेशात ‘इंडिया आउट’चे अभियान सुरू झाले, ते प्रामुख्याने समाज माध्यमांवर ! त्यात भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे हाकारे आहेत. शेख हसीना यांच्या सरकारचे म्हणणे, या आवाहनामागे बांगलादेशातील बाजारपेठ अस्थिर करण्याचा हेतू आहे. बांगलादेशची बाजारपेठ अस्थिर झाली तर त्याचा फायदा निश्चितपणे चीन उठवील आणि तो बांगलादेशला आपल्या जाळ्यात फसवील. पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदीवबाबत चीनने नेमका हाच डाव टाकला होता. नेपाळ आणि भारताच्या संबंधांतील माधुर्यही या देशाने आधीच कडवट करून टाकले आहे. म्यानमार आणि भूतानलाही चीनने भारतापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु भारतावर या देशांचा विश्वास असल्यामुळे चीन जास्त सफल होऊ शकला नाही. आता तो बांगलादेशला भारतापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
नकाशा डोळ्यासमोर आणा. चीनच्या कब्जातील तिबेट आणि बांगलादेश यांच्यात आपली ईशान्येकडील राज्ये येतात. या राज्यात दहशतवादी संघटनांना हत्यारे आणि अमली पदार्थ देऊन चीनने भारताचे डोके उठवलेले आहेच. आता कसेही करून बांगलादेशाशी भारताचे नाते बिघडावे आणि बांगलादेश आपला अंकित व्हावा यासाठी चीनचा प्रयत्न आहे. अर्थात, ही चालबाजी शेख हसिना जाणून आहेत ! चीनने कोणतीही चाल खेळली तरी त्या डगमगलेल्या नाहीत. परवा तर त्या म्हणाल्या, “ विरोधी पक्षाचे नेते त्यांच्या पत्नीकडच्या भारतीय साड्या जाळतील तेव्हाच हे सिद्ध होईल की त्यांना खरोखरच भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकायचा आहे!’
बांगलादेशातील विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) कायमच भारताच्या विरोधी असतो. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी ढाक्याला गेले असता झालेल्या हिंसक निदर्शनात हा पक्ष सामील होता. या पक्षाच्या नेत्या खालिदा जिया दुटप्पी भूमिका घेताना दिसतात. बीएनपी एकीकडे भारताला विरोध करत असतो, तर दुसरीकडे या पक्षाचा एक गट भारताशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत असे म्हणतो. परंतु हल्ली कट्टरपंथीयांचे वजन जास्त पडते असे दिसते आहे. या चालीमागे खलिदा झिया यांचेच डोके आहे.
खालिदा झिया आणि चीन यांच्यात काही समझोता झाला आहे काय?- हा खरा प्रश्न आहे. अशी शंका घ्यायला जागा आहे. मागच्या निवडणुकीत चीनने त्यांना सहकार्य केले नाही, कारण त्यांच्या समर्थनासाठी अमेरिका उभी होती. शेख हसीना आता आपल्या छावणीत येतील, अशी आशा चीनला वाटत असावी.भारताला सैन्याच्या बळावर वाकवता येणार नाही ही गोष्ट चीनच्या लक्षात आलेली आहे, याकडेही लक्ष द्यावे लागेल. गलवानमध्ये भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिल्यापासून भारताच्या ताकदीचा चीनला अंदाज आलेला आहे. चीन भारताला कोणत्याही परिस्थितीत कमकुवत करू पाहतो आहे. कारण नजीकच्या भविष्यात भारत चीनपेक्षा मोठी आर्थिक ताकद म्हणून उभा राहील, ही भीती ! १९७८ मध्ये बाहेरच्या जगासाठी अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडून दिल्यानंतर चीनची अर्थव्यवस्था नऊ टक्क्यांच्या वेगवान गतीने वाढली. परंतु कोविडने तिला २.२ टक्क्यांवर आणून सोडले. पुन्हा चीन आठ टक्क्यांपर्यंत आला खरा, परंतु २०२३ मध्ये ५.५२ टक्के इतकाच वेग चीनच्या अर्थव्यवस्थेला घेता आला. त्याचवेळी भारताची अर्थव्यवस्था मात्र ७.२ टक्क्यांच्या गतीने वाढली. भारताच्या या वेगाने चीनला चिंतेत टाकले आहे.
एक जुनी म्हण आहे, ‘स्वतःची रेषा मोठी काढता येत नसेल तर दुसऱ्याची रेषा पुसून टाका’. चीन नेमके तेच करण्याच्या धडपडीत आहे. भारताला चीन इतका खिळखिळा करू पाहतो की आपल्या विकासाचा वेग मंदावेल. परंतु हेही तितकेच खरे, की भारत या चाली नेमक्या ओळखून आहे. भारताची प्रगती आता कोणीही रोखू शकत नाही. आणि महत्त्वाचे हे की भारत प्रतिहल्ला करणेही जाणतो.