- प्रभू चावला(ज्येष्ठ पत्रकार)
‘राजकीय बळी’ नावाचा हुकुमाचा पत्ता वापरणे हा विजयाकडे नेणारा जवळचा रस्ता होऊन बसला आहे. हा पत्ता खेळला की लोकांची सहानुभूती सहज मिळवता येते. हुतात्म्याला गर्दी नेहमीच डोक्यावर घेत असते. अन्याय, गैरकारभार याविषयीच्या वावड्या यातूनच उठत असतात. आता सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष ‘राजकीय बळी’ हा पत्ता फेकून सत्ता जुगाराच्या मैदानात उतरला आहे.. देशाचा तारणहार म्हणून ‘राजकीय पुनर्जन्मा’च्या मार्गावर असलेल्या या नेत्यासाठी सहानुभूती मिळवण्याचा हेतू त्यामागे आहे. गेल्याच आठवड्यात निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याची छाननी केली. नरेंद्र मोदी यांच्याविषयी बदनामीकारक, व्यक्तिगत अवमानकारक शेरेबाजी केल्याबद्दल राहुल यांच्याकडे खुलासा मागणारी नोटीस आयोगाने पाठवली.
भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. ‘एखाद्या व्यक्तीला ‘खिसेकापू’ म्हणणे हा केवळ विखारी शब्द नसून व्यक्तिगत हल्ला आहे. ज्याच्याबद्दल हा शब्द वापरला जात आहे त्याच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचवणे, चारित्र्यहनन आणि लोकांची दिशाभूल करण्याचा हेतू त्यामागे आहे’, असे तक्रारीत म्हटले होते. ‘राहुल गांधी यांनी नव्याने आत्मसात केलेली वक्तृत्व कौशल्ये आणि निवडणुकीचे डावपेच हाणून पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या मदतीने हा कट आखला गेला’ असे काँग्रेसने अपेक्षेबरहुकूम म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्याकडे खुलासा मागितला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मोदी आडनावावरून बदनामीकारक शेरेबाजी केल्यामुळे गमवावी लागलेली खासदारकी न्यायालयीन लढाईत पुन्हा मिळाली, तरीही पंतप्रधान आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आणखी हल्ले चढवणे त्यांनी थांबवले नाही. नरेंद्र मोदी यांना थेट शिंगावर घेऊन राहुल गांधींना मोठ्या प्रमाणावर स्वीकृती मिळेल आणि मोदी यांच्या गर्दी खेचण्याच्या जादूगिरीला प्रतिआव्हान म्हणून त्याचा उपयोग होईल असे राहुल यांच्या सल्लागारांना वाटते. देशाच्या राजकीय इतिहासात इतके कडवट शेरे-ताशेरे ओढले जाण्याची ही लढाई प्रथमच इतका दीर्घकाळ चाललेली दिसते. या जोरदार दुष्मनीतून संसद सभागृह, निवडणूक प्रचारसभेतील अनेक वक्तव्ये चांगलीच डागाळली गेली.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आटोपून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या रणभेरी फुंकल्या जात असताना राष्ट्रीय पक्षांच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर हल्ले करण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. प्रादेशिक पक्षांनी सर्वसाधारणपणे ही लढाई विचारधारांच्या मर्यादेत ठेवली असली, तरी दोन्ही राष्ट्रीय पक्ष मात्र एकमेकांवर तुटून पडले आहेत.
प्रत्येक मंचावरून सातत्याने मोदींवर हल्ला केला तर निवडणुकीत मतांचा पाऊस पडेल असे राहुल गांधी यांना वाटते. राजस्थानमधील एका प्रचारसभेत त्यांनी मोदींसाठी ‘पनवती’ हा शब्द वापरला. त्याआधीच्या एका सभेत त्यांनी मोदी यांच्या विकासाच्या मुद्द्याची खिल्ली उडवली. ते लोकांना म्हणाले, ‘तुमचे मोबाइल, शर्ट्स, बूट त्यावर काय लिहिलेले असते? - मेड इन चायना! तुमचा कॅमेरा किंवा शर्टवर कधी ‘मेड इन मध्यप्रदेश’ लिहिलेले असते का?’- मग नरेंद्र मोदीही अशा विधानांचा समाचार घेतात. परवा एका सभेत ते म्हणाले, ‘एक शहाणा काँग्रेसवाला म्हणतो आहे की भारतातील लोक केवळ ‘मेड इन चायना’ मोबाइल फोन वापरतात. अरे मूर्खांच्या सरदारा, कुठल्या जगात राहतो आहेस तू?.. तो कुठल्या प्रकारचा चष्मा वापरतो मला माहीत नाही पण भारताने केलेली प्रगती त्याला दिसत नाही. भारत आता मोबाइल फोनच्या उत्पादनातला जगातला दुसरा मोठा देश झाला आहे!’- ही अशी फटकेबाजी केवळ बोलण्यापुरती मर्यादित राहात नाही. पोस्टर्स आणि मीम्स यांच्यातही युद्ध चाललेले आहेच.
गेलेले वैभव पुन्हा प्राप्त करून घेण्याच्या खटपटीत असलेल्या काँग्रेससारख्या पक्षासाठी सत्तारूढ पक्षाने राहुल गांधी यांना दिलेले महत्त्व एक प्रकारे वरदानच ठरले आहे. पंतप्रधान किंवा त्यांचे निकटचे सहकारी जेव्हा त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांचा अतिशयोक्तीपूर्ण उल्लेख सहजपणे करतात, तेव्हा खरे तर कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांना आनंद होतो. इतके दिवस राहुल यांना लिंबूटिंबू समजले जात होते; परंतु आता त्यांनी डाव उलटवला आहे असे त्यांना वाटते. सूडबुद्धीने वागणाऱ्या सत्तारुढांनी राहुल गांधी यांा बळीचा बकरा ठरविले असले, तरीही त्यांची लोकप्रियता कशी वाढत गेली हे दाखवण्यासाठी काँग्रेस पक्षही आता समाजमाध्यमांवर पोस्ट टाकू लागला आहे. लोकांमध्ये राहुल यांचे आकर्षण वाढत असल्यामुळे त्यांच्यात उत्साह संचारला आहे. टीव्ही वाहिन्या राहुल यांना त्यांच्या योग्यतेनुसार वेळ देत नाहीत म्हणून समाजमाध्यमांवर त्यांची विराट अशी प्रतिमा निर्माण करता येईल याची खात्री पक्षाला वाटते आहे. राहुल प्रसिद्धीच्या झोतात राहतील यासाठी पक्षाची धडपड चालू आहे. त्यासाठी आकडेवारीचा पुरावा सादर केला जातो आहे. संसदेच्या मागच्या अधिवेशनात राहुल यांचे भाषण पंतप्रधानांच्या तुलनेत जास्त लोकांनी पाहिले, असा दावा काँग्रेसने केला. संसद टीव्हीवर मोदींचे भाषण २.३ लाख लोकांनी पाहिले तर राहुल यांचे ३.५ लाखांनी. यूट्यूबवर राहुल यांच्या भाषणाला २६ लाख व्ह्यूज मिळाले तर पंतप्रधानांना ६.५ लाख... हे सारे काँग्रेसने सांगितले!
एकूणातच गेल्या दोन दशकात भारतीय राजकारणामध्ये मुद्द्यांऐवजी व्यक्तींना महत्व आले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांनी भविष्यातील नेता होण्यासाठी मोदी यांच्याशी थेट दोन हात करायचे ठरवले आहे. राजकीय डावपेचांच्या पुस्तकात मात्र काही नव्या शिव्यांची भर पडत आहे. राजकीय संवादाची पातळी त्यामुळे खालावत चालली आहे.