अमोल उदगीरकर, चित्रपट समीक्षक
'ओम शांती ओम' सिनेमातला एक प्रसंग. एका प्रायोगिक दिग्दर्शकाच्या (सतीश शाह) चित्रपटाच्या सेटवर चित्रपटाचा निर्माता (अर्जुन रामपाल) येतो. रुबाबदार निर्मात्याच्या मागे दिग्दर्शक धावपळ करत असतो. दिग्दर्शक सांगत असतो, 'मैने सीन के शूट में एक ऋत्विक घटक अँगल लगाया है और एक सत्यजित रे अँगल.' निर्माता एकदम झटकन मागे वळतो आणि दिग्दर्शकाला आज्ञावजा सूचना करतो, 'एक मनमोहन देसाई अँगल भी लगाना दादा. आखिरमें वोही काम आयेगा.' भारतात 'मास मसाला' चित्रपट आणि प्रायोगिक सिनेमा यांच्यात एक छोटंसं शीतयुद्ध गेली अनेक वर्षे चालू आहे. त्यावर दिग्दर्शक फराह खानने केलेलं हे मार्मिक भाष्य. भारतीय प्रेक्षकांनी आपल्या आवडीचं वजन नेहमी मास मसाला चित्रपटांच्या पारड्यात टाकलं आहे. त्यात पण मारधाड असणाऱ्या अॅक्शन चित्रपटांवर प्रेक्षकांचं विशेष प्रेम. हे प्रेम फिल्म फेस्टिव्हलला जाणाऱ्या, युरोपियन सिनेमांवर प्रेम करणाऱ्या 'एलिटिस्ट' वर्गाला समजत नाही. ह्या शीतयुद्धाला सिनेमा ही कला आहे की धंदा आहे या मतभेदाची पण एक किनार आहे. 'ढाई किलोका हाथ' असलेल्या सनी पाजीचा 'गदर २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धो-धो चालत असताना या वर्गाला खूप आश्चर्य वाटतंय. एखादा सिनेमा आवडणं किंवा न आवडणं हे खूपच सापेक्ष असतं, पण बॉक्स ऑफिसचे आकडे नाकारता येत नाहीत. 'गदर-२' चं दणदणीत बॉक्स ऑफिस यश पण नाकारता येणार नाही.
'पुष्पा'मधला 'झुकेगा नही साला' म्हणणारा नायक असेल, 'केजीएफ'मधला राकट दणकट रॉकी भाई असेल, 'गदर' मधला तारा सिंग असेल किंवा कुठलेही पडदा व्यापून दशांगुळे उरणारे मास अॅक्शन नायक असतील; त्यांच्या मूळ प्रेरणा आहेत सत्तरच्या दशकातल्या अमिताभ बच्चनने साकारलेल्या अँग्री यंग मॅनमध्ये.. बच्चनपूर्व युगात हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता नायक प्रेमगीत गाणारे, नायिकेच्या विरहात व्याकूळ, आदर्श मुलगा प्रियकर, कवी वृत्तीचे असत. बच्चनच्या नायकाने हे सगळे प्रस्थापित साचे तोडून मोडून फेकून दिले. बच्चनचा नायक हा अचाट आणि अतार्किक कारनामे करणारा, एकाच वेळेस अनेक गुंडांना लोळवणारा, प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा आणि पडद्यावरच्या वैयक्तिक आयुष्यात मुळीच परफेक्ट नसणारा असा होता, बच्चनचे त्या काळात गाजलेले सिनेमे रजनीकांतने रिमेक केले आणि हे मास मसाला फिल्मचं लोण दक्षिणेत पण पोहोचलं. त्यातून रजनीकांत, चिरंजीवी, मामुटी यांनी स्वतःचा असा मास मसाला नायक उभा केला. सत्तर आणि ऐंशीचं दशक अनिर्बंधपणे बच्चनने गाजवलं. त्यात धर्मेंद्र, दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक करणार जितेंद्र, विनोद खन्ना, मिथुन चक्रवर्ती यांनी पण अॅक्शन चित्रपट करायला सुरुवात केली. जॅकी श्रॉफ, संजय दत्त, अनिल कपूर आणि सनी देओल यांनाही मुख्यत्वे अॅक्शन सिनेमाचाच आधार होता. नव्वदच्या दशकात पण रोमँटिक आणि अॅक्शन सिनेमे हातात हात घालून चालत.
यात मोठ्या प्रमाणात बदल झाला तो २००१ नंतर. २००१ नंतर 'अर्बन रॉम कॉम'चा काळ सुरू झाला. शहरीकरणाच्या प्रक्रियेने चांगलाच जोर धरल्यानंतरच्या भारतात जागतिक सिनेमांशी, मालिकांशी ओळख झालेला मध्यमवर्ग उदयाला आला. त्याचा खिसाही गरम होता. या वर्गाला केंद्रस्थानी ठेवून 'मल्टिप्लेक्स संस्कृती उदयाला आली. परदेशस्थ भारतीय आणि मालदार देशी मध्यमवर्गाला आकर्षित करण्याचे प्रयत्न बॉलीवूडने जोरात सुरू केले. एखादा 'गजनी', एखादा 'सिंघम' आणि एखादा 'दबंग' मध्येच यायचा; पण मासी अॅक्शन हीरोज आणि सिनेमे मागे पडायला लागले होते.
या दरम्यान ग्रामीण-निमशहरी भागातला एकनिष्ठ प्रेक्षक, सिंगल स्क्रीनमध्ये सिनेमे बघणारा श्रमिक यांच्याकडे बॉलीवूडचं दुर्लक्ष झालं. मसाला फिल्म्सवर प्रेम असणाऱ्या या वर्गाला बॉलीवूडने पूर्ण वाऱ्यावर सोडलं. या प्रेक्षकांना पुन्हा थिएटरात आणण्याचं काम केलं 'बाहुबली', 'पुष्पा', 'केजीएफ', 'कांतारा' या दक्षिणेकडच्या सिनेमांनी! या दाक्षिणात्य सिनेमांच्या डब व्हर्जन्सला तुफान गर्दी होऊ लागली, कारण दाक्षिणात्य सिनेमा आणि त्यातल्या नायकांनी पिटातल्या, ग्रामीण-निमशहरी भागातल्या प्रेक्षकांशी असणारी आपली नाळ तुटू दिली नाही.
कोरोना काळातल्या अस्थिर आणि असुरक्षित दिवसांनंतर प्रेक्षकांमध्ये मनोरंजक सिनेमांबद्दल जे आकर्षण पुन्हा निर्माण झालं आहे त्याचं द्योतक म्हणजे शाहरुख खानचा 'पठाण' आणि आता सनी देओलचा 'गदर-२" यांना बॉक्स ऑफिसवर मिळणारा धो-धो प्रतिसाद ! बच्चनचा 'अँग्री यंग मॅन' उदयाला आला तेव्हा स्वातंत्र्यानंतरचा भ्रमनिरास देशभरात पसरलेला होता. या कोंडमाऱ्याला सलीम जावेद यांनी अमिताभ बच्चनच्या माध्यमातून वाचा फोडली.
सध्याचं देशातलं वातावरण प्रचंड ध्रुवीकरणाने भारलेले आहे. विरुद्ध राजकीय भूमिका असणाऱ्याला शत्रू समजण्याची पद्धत रूढ झाली आहे. या तगमगीतून दोन अडीच तासांची सुटका देणारा, तर्क खुंटीवर टांगणारा मास अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांना आपलं गोंधळलेलं एकटेपण सिनेमागृहातल्या अंधारात विरघळवून टाकण्यात मदत करत असावा 'गदर-२' इतका चालण्यामागचं हे आणखी एक कारण.
amoludgirkar@gmail.com