इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस अधिक उग्र रूप घेऊ लागलं आहे. हे युद्ध थांबणं तर दूर, त्या आगीत आणखी तेलच ओतलं जात आहे. इतर देशही यात आता स्वेच्छेने किंवा अनिच्छेने ओढले जाताहेत. त्याचे दुष्परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागणार आहेत. त्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अधिकाधिक आक्रमक भूमिका घेताना दिसताहेत. त्यांच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे ते आणखी बिथरले आहेत. काही दिवसांपूर्वीच हिजबुल्लाहने नेतन्याहू यांच्या होमटाऊनवर म्हणजेच सिसेरियावर ड्रोन हल्ला केला.
त्यांच्यावर हल्ला तर झाला, पण त्यावेळी नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा दोन्हीही घरी नव्हते. निश्चितच अतिरक्यांचा इरादा त्यांना टिपण्याचा होता. त्यांना व्यक्तिगत निशाणा करण्याचा त्यांचा डाव होता. ड्रोन सिसेरिया येथील एका इमारतीवर पडलं. अर्थात यात कोणतीही हानी झाली नाही, पण नेतन्याहू यांच्या ‘आत्मसन्मानाला’ मात्र पुन्हा एकदा जोरदार ठेच पोहोचली.
चिडलेले नेतन्याहू म्हणाले, मला आणि माझ्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न झाला. हिजबुल्लाहची ही आतापर्यंतची आणखी एक मोठी चूक आहे. ते चुकांवर चुका करताहेत. त्यांचे शंभर घडे कधीच भरले आहेत आणि त्यांच्या प्रत्येक कृतीचा जाब त्यांना द्यावा लागेल. किंबहुना त्याचा जाब देण्याची वेळच त्यांच्यावर येणार नाही. कारण त्याआधीच ते संपलेले असतील! इस्रायलच्या नागरिकांना लक्ष्य करण्याचे सारे प्रयत्न तातडीनं विफल तर केले जातीलच, पण असं कृत्य करणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवली जाईल.
अतिरेक्यांना सुधारण्याची आतापर्यंत अनेकदा संधी दिली गेली. आम्ही शांत राहिलो. संयमानं वागलो, वागतोय, पण तरीही त्यांच्या खोड्या सुरुच आहेत. त्यांच्या या खोड्या म्हणजे स्वत:च्याच जिवाशी खेळ आहेत. त्यांचा हा खेळ लवकरच संपुष्टात येईल. इस्त्रायली डिफेन्स फोर्स ‘आयडीएफ’नं याला दुजोरा देताना म्हटलं, गेल्याच आठवड्यात आमच्यावर तीन ड्रोन डागले गेले. अर्थात अशा कोल्हेकुईला आम्ही घाबरत नाही. त्यातले दोन ड्रोन तर आम्ही तत्काळ निकामी केले, त्यांच्यात आमच्याशी लढण्याची ताकदच नाही. त्यामुळे कुठे तरी थातूरमातूर कारवाया करून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो, पण हे असं ते किती काळ करणार? त्यांच्या प्रत्येक कृतीचा आता बदला घेतला जाईल. आम्ही प्राणांचं अभय देऊ शकतो, तर प्राण घेऊही शकतो..
गेल्या काही दिवसांत लेबनॉन येथून इस्रायलच्या उत्तर भागावर शंभरपेक्षा जास्त रॉकेट हल्ले करण्यात आले. त्यातले बरेचसे हल्ले रोखण्यात आले, तर काही रॉकेट्स मोकळ्या, खुल्या जागी पडले. त्यात कोणतीही प्राणहानी झाली नाही, पण काही लोक मात्र त्यात जखमी झाले. इस्रायलचं म्हणणं आहे, आमच्या प्रत्येक नागरिकाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला जाईल.
दुसरीकडे हमासच्या मते इस्रायलच्या या पोकळ धमक्या आहेत. त्यांच्या या धमक्यांना आम्ही बिलकुल भीक घालत नाही आणि त्यांच्या बडबडीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही. इस्रायललाही आपल्या प्रत्येक कृतीचा जाब द्यावा लागेल आणि आपण केलेल्या प्रत्येक कृतीचा त्यांना पश्चाताप होईल. त्यांनी अजूनही सुधारावं, निरपराध नागरिकांना मारणं थांबवावं, नाहीतर आम्ही इस्रायलचे इतके तुकडे करू की त्यांनाही ते माेजता येणार नाही.
हमासचे चीफ याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात नुकतेच मारले गेले. हमासला हा अतिशय मोठा धक्का होता. त्यांच्या मृत्यूनंतर इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई यांचंही पहिलंच वक्तव्य नुकतंच समोर आलं आहे. खामनेई यांचं म्हणणं आहे, एक याह्या सिनवार मारला गेला, म्हणून त्यात उड्या मारण्यासारखं काहीच नाही. सिनवारच्या मृत्यूचं दु:ख आम्हाला जरूर आहे, त्याच्या मृत्यूचा निश्चितच बदला घेतला जाईल, पण असे असंख्य सिनवार आमच्याकडे घराघरात आहेत. इस्रायल बोळ्यानं दूध पिते आहे. एक सिनवार मृत्यूमुखी पडला म्हणजे हमास संपली असं त्यांना वाटतंय, पण सिनवारच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून एक नवा सिनवार जन्म घेईल. आणि आमच्याकडे आधीच घराघरांत सिनवार आहेत..
आमचे सैनिक जळी-स्थळी दिसतील!
हमासचं म्हणणं आहे, प्राणावर उदार होऊन लढणाऱ्या सैनिकांची आमच्याकडे कमी नाही. अहमद यासीन, अब्देल अजीज रंतीसी, इस्माइल हानियेह, याह्या सिनवार.. यांच्यासारखे आमच्या काही योद्धे रणांगणावर धारातीर्थी पडले, त्यांच्या मृत्यूचं दु:ख आम्हाला नक्कीच आहे, ते कायमच आमच्या स्मरणात राहतील, पण एवढं नक्की, की इस्रायललाही ते त्यांच्या मृत्यूनंतरही आठवत राहतील. जळी, स्थळी, काष्ठी, पाताळी.. त्यांना आमचे हे सैनिक दिसत राहतील, याची ग्वाही आम्ही देतो...