अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
प्रिय राहुल नार्वेकरजी,
विधानसभेचे कामकाज ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने सुरू आहे त्याला तोड नाही. कोण काय बोलतो याकडे आपण फार लक्ष देऊ नका. लक्ष दिले तर काम करणे मुश्किल होईल. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या प्रथा, परंपरा आणि कामकाजाचा हवाला देत एकाच दिवशी ३० ते ३५ लक्षवेधी लागल्याबद्दल हे विधानभवन आहे की लक्षवेधी भवन आहे असा सवाल विचारला खरा मात्र, त्यांनी लक्षवेधीच्या निमित्ताने स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता अशी कुजबुज विधिमंडळात होती. सुधीरभाऊ हल्ली आपल्याच सरकारला खडे बोल सुनावतात, हे या अधिवेशनात दिसून आले आहे.
तुमच्या दालनात एकदा सुधीरभाऊ आणि देवेंद्रभाऊ यांना जेवायला बोलवा. सुधीरभाऊंच्या आवडीची रानमेव्याची भाजी मागवा. म्हणजे पुढचे सगळे निवांत पार पडेल. लोकप्रतिनिधी काम करतात, प्रश्न मांडतात, त्यांच्या लक्षवेधीच्या निमित्ताने त्यांच्या विभागातल्या प्रश्नांना न्याय मिळतो. त्यामुळे असे प्रश्न मांडायचे नाहीत का? खरे तर आपण एक दिवस लक्षवेधीचा, एक दिवस प्रश्नोत्तराचा, एक दिवस औचित्याच्या मुद्द्यांचा, तर एक दिवस वादावादीचा अशी विभागणी करायला हरकत नाही. यातून दिवस आणि वेळ उरलाच तर त्यावेळी विधिमंडळाचे कामकाज होईल असे जाहीर केले पाहिजे. शेवटी प्रथा परंपरा आपणच तर निर्माण केल्या पाहिजेत ना...
आपणच मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहोत, असे तरुण तडफदार मंत्री नितेश राणे म्हणाल्याची चर्चा विधानभवनात होती. मुख्यमंत्र्यांनी ‘लाडका मंत्री’ योजना घोषित केली आहे. त्या योजनेचे निकष ते लवकरच सांगणार आहेत. तुम्ही देखील ‘विधिमंडळाचा लाडका सदस्य’ अशी घोषणा करायला हरकत नाही. सरकार कोणाचे आहे, याचा विचार न करता जे सदस्य सडेतोडपणे बोलतील, वेळप्रसंगी सरकारवर टीका करतील, जे मंत्री मंत्रिपदाची शपथ विसरून समाजासाठी वाटेल ते बोलायला मागेपुढे बघणार नाहीत. अशांची आपण सर्वोत्कृष्ट सदस्य म्हणून निवड करू शकतो का? असे निकष ठेवले तर सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे यांची आपण पुरस्कारासाठी निवड करू शकाल..! आम्ही आपलं सुचविण्याचं काम करतो... आपला तेवढाच वेळ वाचावा ही त्या मागची प्रामाणिक भावना... आपल्यालाच सगळे कळते, इतरांना काही कळत नाही, असे अधिकाऱ्यांनी वाटून घेण्याची गरज नाही... आम्हीच चांगले आहोत या मानसिकतेत राहाल तर तुम्ही काही करू शकणार नाहीत, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी तमाम अधिकाऱ्यांना नुकताच दिला आहे. आपणही असाच इशारा सदस्यांना देऊ शकता. जे सदस्य आपल्यालाच जास्त कळते या हिरीरीने सभागृहात बोलतात, त्यांनी तसे वाटून घेण्याची गरज नाही, असे आपण एकदा खडसावून सांगायला हवे...त्याचवेळी सर्वोत्कृष्ट सदस्य निवडीचे निकषही जाहीर केले तर त्याचा फायदा पुढच्या अधिवेशनाला नक्की होईल.
या अधिवेशनात सभागृहात गोंधळ, गदारोळ होता. सभागृहाचे कामकाजच पूर्णवेळ होऊ शकले नाही. मंत्री सभागृहापेक्षा बाहेर व्यस्त होते त्यामुळे सभागृह बंद ठेवण्याचीही आपल्यावर वेळ आली... रोज नवनवे विषय सदस्यांपुढे येत होते. त्यामुळे ते तरी काय करणार..? त्यांच्या भाषणांमुळे सभागृहाच्या कामकाजाची ‘दिशा’ बदलून गेली त्यात त्यांचा दोष नाही... एक मात्र वाईट झाले. या गदारोळ गोंधळामुळे आर्थिक पाहणी अहवालावर चर्चा झाली नाही. राज्याची नेमकी अवस्था काय आहे? शाळा, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शेती याबाबतीत महाराष्ट्र कुठे आहे? याचा शोध घेण्याची संधी बिचाऱ्या सदस्यांना मिळालीच नाही... अनेक सदस्यांची अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण भाषण करण्यासाठी केलेली तयारी वाया गेली...त्यामुळे त्यांना फार वाईट वाटले असेल. अधिवेशन संपताना आपण सगळ्या सदस्यांची समजूत काढा... या विषयांवर तुम्हाला बोलायला मिळाले नाही त्याचे मलाच दुःख वाटले असे सांगा. ज्या सदस्यांना आर्थिक पाहणी अहवाल आणि अर्थसंकल्पावर बोलायचे असेल त्यांना आपण रोज आपल्या दालनात भेटीसाठी बोलवा आणि मनसोक्त बोलायला सांगा... तेवढेच त्यांचे दुःख हलके होईल. आपल्याला कुठेतरी बोलता आले याचे समाधान मिळेल...शेवटी तुम्ही या सगळ्या आमदारांचे पालक आहात. त्यांनी तुमच्याकडे भावना व्यक्त करायच्या नाहीत तर कोणाकडे...काहींनी आम्हाला या भावना सांगितल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचविल्या... बाकी आपण योग्य तो निर्णय घ्याल...
- आपलाच बाबूराव