- वंदना अत्रे, शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक, लेखक-अनुवादक
आज, दिनांक ८ एप्रिलपासून ख्यातनाम गायक पंडित कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दीला प्रारंभ होतो आहे, त्यानिमित्ताने...
संगीत म्हणजे नेमके काय? समोर बसलेल्या श्रोत्यांचे मनोरंजन करण्यासाठी आळवलेल्या बंदिशी आणि तराणे? तसे असेल तर, ऐन उन्हाच्या तलखीत झाडावर झगमग करणारी बहाव्याची पिवळी झुंबरे, एखाद्या आडवाटेवरील छोट्याशा मंदिरात तेवणाऱ्या छोट्याशा दिव्याचा इवला प्रकाश किंवा ताऱ्यांनी खच्चून भरलेल्या आकाशाचे निःशब्द करणारे वैभव हे फक्त शब्दातून सांगता येईल? विरह-मिलनासारख्या अनेक कोवळ्या-तीव्र भावनांचा बहुरंगी पट कोणत्या रंगांत रंगवायचा? भोवंडून टाकणारा जीवनाचा वेग आणि झपाटा नेमका कोणत्या चिमटीत पकडून दाखवायचा? असे कितीतरी प्रश्न गाता-गाता एखाद्या कलाकाराला पडू लागतात तेव्हा संगीत कूस पालटत असते ! जगणे आणि गाणे हे एकमेकांपासून कधीच वेगळे नसते. पण हे निखालस सत्य रसिकांना पुन्हा-पुन्हा सांगावे लागते. त्यासाठी निसर्ग जी योजना आखतो त्याचे एक नाव म्हणजे कुमार गंधर्व यांचे गाणे! आज ८ एप्रिलला त्यांच्या जन्मशताब्दीला प्रारंभ होत असताना त्यांच्या विचारांचा धागा पुढे घेऊन जाणाऱ्या आजच्या कलाकाराचे नाव चटकन ओठावर येत नाही, तेव्हा प्रश्न पडतो, हे कुमारजींचे काळाला व्यापून उरणारे मोठेपण की आजच्या व्यवस्थेने निर्माण केलेलं अपरिहार्य खुजेपण? या निमित्ताने हा विचार होणे फार गरजेचे आहे.
स्वरांच्या मदतीने जीवनातील बहुविध सौंदर्याला स्पर्श करण्याच्या आणि ते व्यक्त करण्याच्या मुक्कामापर्यंत झालेला कुमारजींचा प्रवास चकित करणारा आहे, पण तो अप्राप्य नव्हे. वयाच्या दहाव्या वर्षी संगीताखेरीज बाकी कशातही अजिबात रस नसलेला हा कलाकार, ऐन तरुण वयात क्षयासारख्या आजाराने गळ्यातील स्वर ओरबाडून घेतले तेव्हा खुशाल म्हणतो, गाता नाही आले तर कुंचला घेईन मी हातात! - कुठून आली असेल ही संपन्न समज आणि ही ऐट? बहुदा, आयुष्याने वेळोवेळी जी उग्र दुःखे ओंजळीत टाकली त्यातून!
गळ्यात स्वरांची अद्भुत समज घेऊन आपला मुलगा, शिवपुत्र जन्माला आलाय हे सिद्धरामय्या कोमकली यांना समजले तेव्हा त्यांच्या भल्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रडतखडत चालत होता. अशावेळी घरात ग्रामोफोनवर अखंड वाजणारे गाणे या मुलाने मुखोद्गत केले आहे हे त्यांना समजले आणि त्यानंतर कुमारजींच्या भाषेतच सांगायचे तर या ‘गाणाऱ्या अस्वलाला’ दोन वर्षं वडिलांनी गावोगावी मैफली करत फिरवले आणि पैसे गोळा केले. मैफल जिंकणे म्हणजे काय हे न समजण्याच्या वयातील शिवपुत्र कोमकली यांचे गाणे ऐकायला गावोगावचे रसिक तुफान गर्दी करतच, पण त्यावेळचे बुजुर्ग कलाकारही तिथे हजेरी लावत. लिंगायत संप्रदायाचे मुख्य गुरू शांतीवीर स्वामी यांनी असेच एकदा हे गाणे ऐकले आणि उत्स्फूर्तपणे ते म्हणाले, हा तर गंधर्वच आहे! शिवपुत्र कोमकलीला आता रसिक कुमार गंधर्व संबोधू लागले!
- साक्षात गंधर्व असा हा ‘गायक’ दहाव्या वर्षी मुंबईत देवधर मास्तरांच्या गायन क्लासमध्ये संगीताचे शिक्षण घेण्यासाठी आला! संगीत हा त्या मुलाचा ध्यास होता. गळ्यात पक्का स्वर, त्याच्या सोबतीला कानावर पडणारा प्रत्येक स्वर टिपकागदासारखे शोषून घेणारी तीव्र बुद्धी, त्यामुळे गळ्यावर चढत गेलेले सुरीले गाणे आणि ते सभेत मांडण्याचा आत्मविश्वास.
मैफलीचा कलाकार म्हणून आणखी काय ऐवज हवा? गरज होती ती या गुणांना जरा धार देण्याची आणि शास्त्राची ओळख करून घेण्याची, इतकेच! देवधर मास्तरांनी या मुलाला इतर विद्यार्थ्यांंपासून दूरच राखले. कुमार यांना मिळणारे खास शिक्षण आणि कमालीचे वात्सल्य हे उज्ज्वल भविष्याची हमी देणारे होते! पण बघता बघता ते काळवंडत गेले. आधी मैफलीचा कलाकार म्हणून लौकिकाची गार छाया माथ्यावर येत असताना झालेली क्षयाची बाधा, त्यामुळे संसारात सुरू झालेली ओढगस्त आणि पाठोपाठ प्रिय पत्नी भानुमती यांचा धक्कादायक, अकाली मृत्यू. सगळेच अगदी विपरित. म्युन्सिपाल्टीच्या गरिबांसाठी सुरू केलेल्या टीबी हॉस्पिटलमध्ये नाव बदलून काढलेल्या जीवघेण्या एकाकी क्षणांनी पुढे जन्म दिला तो एका अतिशय व्याकूळ बंदिशीला..
‘दरस बिन नीरस सब लागेरी समुझ कछु नाहि परो मोहे री,करम सब सार मुरक बन लागेतरस मन ध्यान करे आली री.’
आयुष्य असे क्रूर फटकारे मारत असताना त्यांना एका गोष्टीची लख्ख जाणीव झाली. कोणती? कुमार मायनस म्युझिक इज झिरो! हे त्यांचेच शब्द! मग वाट्याला आलेल्या या वेदनांशी स्वरांचे असलेले नाते हा कलाकार आजमावून बघू लागला. बकाल हॉस्पिटलमधून दिसणारा पाऊस, वसंताचा बहर, उन्हाचा कहर त्याला अविरत चालणाऱ्या जीवनचक्राची ओळख करून देत होता. हा काळ होता प्रयोगशील, सगळे सत्व पणाला लावत स्वरांना नवी झळाळी देणाऱ्या नव्या कुमार गंधर्व यांच्या जन्माचा!
या नव्याने जन्माला आलेल्या पंडित कुमार गंधर्व यांनी असोशीने केलेले संगीतातील अनेक प्रयोग आणि रचलेल्या अनेक बंदिशी हे कलाकार म्हणून त्यांच्यामध्ये असलेली प्रयोगशील अस्वस्थता व्यक्त करणारे आहेत. माळव्याची लोकगीते, वेरूळमधील भव्य उदात्त शिल्प, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गांधीजी आणि कबीर, सूरदास, मीरा, तुकाराम अशी संत परंपरा. या प्रत्येक गोष्टीमधून त्यांना राग स्वरूप दिसत गेले. त्यात अंतर्भूत असलेले संगीत कानावर पडत गेले.
‘कोणतीही साधना पूर्ण झाल्यावर जे स्वरूप सामोरे येते ते स्वर’, यावर विश्वास असलेल्या कुमारजींनी एक बंदिश लिहिली आहे. जगण्यातील प्रत्येक उत्कट क्षणाला संगीत रूपात बघणारा हा असा कलाकार शतकातून एकच का निर्माण होतो?..
वंदना अत्रे (vratre@gmail.com)