डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह
मी खूप अस्वस्थ आहे. बातम्यांचे मथळे हृदय विदीर्ण करत आहेत. 'लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या साथीदार स्त्रीला मारून टाकले, तिचे तुकडे तुकडे केले, ते तुकडे कूकरमध्ये शिजवले, कुत्र्यांना खाऊ घातले. ही ताजी घटना मुंबईच्या मीरा भाईंदर या उपनगरातली ! मनोज साने याने त्याच्या बरोबर राहणाऱ्या सरस्वती वैद्यचे तुकडे केले. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात आफताब पूनावाला नावाच्या तरुणाने दिल्लीत त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २७ वर्षीय श्रद्धा वालकरला ठार करून तिचे तुकडे तुकडे केले आणि नंतर ते तुकडे जंगलात फेकून दिले. - ही काही उदाहरणे ज्यांच्या बातम्या झाल्या. अशा नृशंस घटना हा आता अपवाद राहिलेला नाही.
मुंबईच्या ताज्या हत्याकांडाने प्रत्येक व्यक्तीला आतून हलवले आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न : माणूस इतका नृशंस कसा होऊ शकतो? जिने प्रेमापोटी विश्वास ठेवला तिचे तुकडे तुकडे कसे करू शकतो? सरस्वती अनाथ होती. तिचे छोटे- छोटे तुकडे करणाऱ्या या माणसाची मानसिकता काय असेल? ज्या कूकरमध्ये दोघांनी मिळून रोज अन्न शिजवले असेल त्याच कूकरमध्ये आपले तुकडे टाकून शिजवले जातील, असे दुस्वप्नसुद्धा त्या सरस्वतीला पडले नसेल. हा विचार मनात आला तरी थरकाप उडतो.
मनोज किंवा आफताब पूनावाला यांच्यासारख्या लोकांचे त्यांच्यासोबत राहणाऱ्या स्त्रीवर काही प्रेम वगैरे असेल हे मानायला मी तरी तयार नाही. प्रेम करणारा माणूस प्रेमिकेचे तुकडे करत नसतो. त्याच्यामागे काही वेगळाच उद्देश असतो आणि तो उद्देश केवळ वासना, शरीराची भूक हाच असणार.
मी देश-विदेशात पुष्कळ फिरलो आहे. तेथील संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न सदैव केला आहे. परदेशातल्या लिव्ह इन रिलेशनशिपची व्याख्या अगदी वेगळी आहे. तिकडे सज्ञान झाल्यावरच मुले आई- वडिलांपासून स्वतंत्र होतात. परस्परांना समजून घेण्यासाठी एकमेकांबरोबर राहणे ही तिथली लिव्ह इन रिलेशनशिपची व्याख्या आहे. एकमेकांना समजून घेता आले तर विवाहबंधनाचा विचार करता येतो नाही तर शांतपणे एकमेकांपासून स्वतंत्र होता येते; परंतु आपल्या देशात लिव्ह इन रिलेशनशिपचा उद्देशच वेगळा होऊन बसला आहे. इथे नात्याचा गैरफायदा घेऊन प्रेमाच्या जाळ्यात सेक्स आणि हिंसेचा नंगानाच केला जातो. आपल्या देशात चित्रपट व्यवसायातल्या कित्येक अभिनेत्रीसुद्धा अशा नात्यात राहिल्या आहेत. काही विभक्त झाल्या, तर अनेकींना मोठ्या ताणातून जावे लागले. पश्चिमेतील लिव्ह इन रिलेशनशिपची संकल्पना आपण स्वीकारली; पण त्यामागचे तत्त्व आपलेसे केले नाही हेच यामागचे सत्य आहे. ज्या संस्कृतीत प्रेम आणि स्नेह हा जीवनाचा आधार मानला जातो, तिथे हे असे व्हावे? जीवनसाथी एकमेकांचे पूरक मानले जातात. एकमेकांशिवाय दोघेही अपूर्ण मानले जातात. आपल्या समाजात, संस्कृतीत हे सर्वमान्य आहे.
- मी प्रेमाच्या विरोधात नाही. एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांना जीवनभर एकत्र राहण्याचा हक्क जरूर मिळाला पाहिजे; परंतु त्याची काही मर्यादाही असली पाहिजे. आपल्या देशात प्रचलित झालेल्या लिव्ह इन रिलेशनशिपचा आधार हा मन आणि विचारांपेक्षा जास्त शरीराच्या सुखांशी संबंधित आहे, म्हणून जास्त धोकादायक आहे. श्रद्धा वालकरला लग्नबंधन हवे होते म्हणून आफताबने तिला ठार मारले. त्याला केवळ शरीरभोगासाठी ती हवी होती.
ही झाली लिव इन रिलेशनशिपची गोष्ट याव्यतिरिक्तही आणखी काही मुद्दे मला महत्त्वाचे वाटतात. आरुशी हत्याकांड आपण अजून विसरलेलो नाही. एका निरागस मुलीला किती क्रूर रीतीने ठार मारले गेले! हल्ली तशाही बातम्या रोज येतात. नवऱ्याने बायकोला मारून टाकले, बायकोने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याला मारून टाकले. संपत्तीसाठी मुलाने बापाची हत्या केली, आईला मारून टाकले. नातेसंबंधात ही अशी हिंसा येते कुठून? गेल्याच आठवड्यात दिल्लीमध्ये एका २० वर्षांच्या तरुणाने अल्पवयीन मुलीची चाकूचे वार करून हत्या केली. क्रौर्याची परिसीमा अशी की त्याने दगड आपटून तिचे डोकेही ठेचून टाकले. त्याआधी अंकित नावाच्या २२ वर्षीय तरुणाने २० वर्षांच्या एका मुलीला गोळी घातली. या मारेकऱ्यांना प्रेमिक म्हटले गेले.
या लोकांना प्रेमी म्हणता येईल? हे प्रेम नाही; ही निव्वळ वासना, शरीराची भूक होय! या भुकेपासून आपल्या तरुण मुलांना वाचवणे फार गरजेचे आहे. सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे, आपल्या मुलांना हे समजावून सांगितले पाहिजे, की स्त्री केवळ एक शरीर नाही. तिलाही पुरुषाप्रमाणेच एक मन आहे. ते कोमल आहे. तिच्यात समर्पणभाव असतो. स्त्रीच्या मनाचे वर्णन करणारी कविता भट्ट यांची एक हिंदी कविता मला खूप महत्त्वाची वाटते. त्या लिहितात-
आजीवन पिया को समर्थन लिखूँगीप्रेम को अपना समर्पण लिखूँगीप्रणय निवेदन उसका था ना हमारान मुखर वासना थी, बस प्रेम प्याराउसमे अपनी श्रद्धा का कणकण लिखूँगीप्रेम को अपना समर्पण लिखूँगी....
स्त्री इतकी समर्पित असते की, प्रेमाच्या बुरख्याआड लपलेली वासना, हिंसा अनेकदा तिच्या लक्षातच येत नाही. ही राक्षसी वृत्ती संपवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे - कायद्याची आहे आणि समाजाचीही!
डॉ. विजय दर्डा (vijaydarda@lokmat.com)