यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत |
विधानसभा निवडणुकीचे कल सकाळी १०-११ ला समजू लागतात, साधारणत: अंदाज येतो की राज्यात कोणाची सत्ता येणार आहे, पण काही वेळा असे घडते की दुपारी १२ नंतर भलतेच निकाल येऊ लागतात, सायंकाळ होता होता चित्र पार बदलून जाते. हरियाणात मतमोजणी सुरू झाली तसे काँग्रेसने मिठाई वाटप सुरू केले, ढोलताशे वाजू लागले. सूर्य कलू लागला तशी काँग्रेसही पराभवाकडे कलली होती. ‘काँग्रेसच जिंकणार हे मी आधीच सांगितले होते’ वगैरे फुशारक्या सकाळी मारणाऱ्या विश्लेषकांचे चेहरे सायंकाळी बघण्यासारखे झाले होते. यावेळी महाराष्ट्रात अशी घाई कोणी करू नका, एवढीच धोक्याची सूचना आहे. कारण, घासून, काँटे की टक्कर असलेल्या टफ लढती होत आहेत, काहीही होऊ शकते, अशी स्थिती आहे. शे-सव्वाशेहून अधिक मतदारसंघांचा फैसला एक हजार ते पाच हजाराच्या मताधिक्याने होईल, असे वाटत आहे. असे का? कारण, बंडखोरी मोठ्या प्रमाणात आहे, अपक्षांचे पेव फुटले आहे. चिल्लर वाटणाऱ्या उमेदवारांनी बड्याबड्यांची गणिते बिघडवणे सुरू केले आहे. म्हणायला एकीकडे तीन पक्ष विरुद्ध तीन पक्ष आहेत, ते एकत्रितपणे लढताहेत हे दिसायला दिसते, पण अनेक मतदारसंघांमध्ये सहा पक्ष जणू स्वबळावरच लढत आहेत. दोन्हीकडे मित्रपक्षांनी प्रत्यक्ष वा छुपी बंडखोरी करत विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. कोणाचे डील टेबलावरचे आहे, कोणाचे टेबलाखालचे आहे. काही दिग्गज उमेदवारांना पराभवाची भीती वाटत आहे. वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्या काही नेत्यांची विकेट पडू शकते. मतदारांच्या मनात काय आहे याचा अंदाज येत नसल्याने राजकारणातील अनेक सरदार अस्वस्थ आहेत. आपापल्या पक्षात महाराष्ट्राची जबाबदारी शिरावर घेण्याची अपेक्षा असलेले पाच-सात नेते त्यांच्या वा मुला-मुलींच्या मतदारसंघात अडकून पडले आहेत. पाच-सात बड्या नेत्यांची आपला मुलगा, मुलगी यांना जिंकवताना फेफे उडते आहे. आपल्या पिल्लांना वाचवण्याची धडपड करणारे नेते पक्षापेक्षा वारसदारांसाठी फिरफिर फिरत आहेत. लोकशाहीच्या दरबारात आपली पुढची पिढी बसविण्यासाठी धडपडणाऱ्या सरदारांची झोप उडाली आहे. प्रस्थापितांना विस्थापित होण्याची भीती आहे. काही ठिकाणी महाराष्ट्राचे राजकारण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात आहे. कुठे घराणेशाहीचे बुरुज ढासळतील, कुठे घराणेशाहीचा लेप निघून नवीन लागेल.
कोणीही आले तरी मुख्यमंत्र्यांच्या हॉटसिटसाठी वाद अटळ आहे. अजित पवार सोडले तर इतर पाच पक्षांचे पाच नेते मुख्यमंत्री होण्यास कमालीचे इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये चार-पाच, भाजप, शिंदेसेना व उद्धव सेनेत प्रत्येकी एक तर शरद पवार गटात दोन जण रेसमध्ये आहेत. निवडणुकीचे महात्म्य २३ नोव्हेंबरला निकालाने संपणार नाही. खरी निवडणूक २३ पासून सुरू होईल. राज्याच्या राजकारणातले घमासान निकालानंतरही काही दिवस चालेल. दोन्ही बाजूंना बहुमत मिळाले नाही तर कालचे शत्रू उद्याचे मित्र अन् कालचे मित्र उद्याचे शत्रू होऊ शकतील. निकालाआधीच अनिश्चिततांचा घोडा निघाला आहे. निकालानंतर तो कोणत्या धन्याजवळ थांबेल हे सांगता येत नाही. महायुतीने आघाडी घेेतल्याचे चित्र मतदानाच्या पाच-सहा दिवस आधी जरा बदलताना दिसते मात्र, महायुती दीडशेपार जाणार, असा दावा दिल्लीहून आलेले भाजपचे दिग्गज नेते करत आहेत. भाजपमध्ये सेंटर स्टेजला देवेंद्र फडणवीस आहेत, निकालानंतरही तेच राहतील. पाच महिन्यांत त्यांनी पक्षातले, युतीतले अनेक खड्डे बुजवले, त्यातून विजयाचा खड्डेमुक्त रस्ता तयार होईल, असे त्यांना आणि दिल्लीला वाटते आहे.
नड्डा का दिसेनात? भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्रातील प्रचारात फारसे दिसत नाहीत. नाही म्हणता बुधवारी ते एक सभा, एक संमेलन करून गेले. भाजपचे अध्यक्ष म्हणून तसेही नड्डा एक्झिट मोडवर आहेत, लवकरच नवीन अध्यक्ष येतील. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘रा.स्व.संघाची भाजपला आता गरज राहिलेली नाही’ या आशयाच्या त्यांच्या एका वाक्याने संघ परिवारात नाराजी पसरली होती. त्यांना यावेळी प्रचारात फारसे न उतरविण्यामागे ती नाराजी तर नाही ना अशी शंका घेतली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या टप्प्यात वाशिम वगैरेमध्ये ज्या सभा झाल्या, त्यांना चांगला प्रतिसाद नव्हता, त्यावरून पक्षांतर्गत बरीच आरडाओरड झाली म्हणतात. स्वत:ला खूप मोठे समजणाऱ्या एका पक्ष प्रदेश पदाधिकाऱ्याला बरेच खडसावले गेले आणि त्याच्याकडून योगींच्या सभांची जबाबदारी काढून घेतली... मग पुढच्या सभा मोठ्या झाल्या.
बटेंगे तो कटेंगे... ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ हे भाजपच्या प्रचारातले मुख्य मुद्दे दिसत आहेत. धार्मिक ध्रुवीकरणाकडे नेणाऱ्या या मुद्द्यांचा फायदा होईल, असे म्हटले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध दर्शविला आहे, पंकजा मुंडे यांनीही असहमती दर्शविली. भाजपचे लोक सांगतात, ‘बटेंगे’चा अजेंडा संघाकडून आला आहे. सगळ्यात हुशारीने प्रचार एकनाथ शिंदे करत आहेत. प्रचारात भाजपचे मुद्दे ते वापरत नाहीत, त्यांची आपली लाईन आहे. देणारे सरकार, लाडक्या बहिणी वगैरे... उद्धव ठाकरे सोडून ते कोणालाही डिवचत नाहीत. शिंदे शोर न करणारे शेर आहेत. स्ट्राईक रेट वाढविण्यासाठी खालून-वरून कायकाय करता येईल, एवढेच ते पाहत आहेत. (yadu.joshi@lokmat.com)