अधिवेशनाला येतायेता विरोधकांची गाडी पंक्चर!
By यदू जोशी | Published: December 23, 2022 11:24 AM2022-12-23T11:24:52+5:302022-12-23T11:25:26+5:30
उद्धव ठाकरे सभागृहात जात नाहीत, अजित पवार शांतशांत दिसतात! मात्र शिंदे-फडणवीसांचे ट्युनिंग उत्तम असल्याने फ्लोअर मॅनेजमेंट पक्की आहे!
यदु जोशी,
सहयोगी संपादक, लोकमत
उद्धव ठाकरे यांची रणनीती काय ते काही कळत नाही. ते नागपुरात आले, विधानभवनातही आले; पण विधान परिषदेत एक मिनिटही गेले नाहीत. मुख्यमंत्री होते तेव्हा मंत्रालयात जात नव्हते; आता आमदार आहेत तरी सभागृहात जात नाहीत. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हाच आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते; पण राजीनामा खिशातच राहिला. हरकत नाही, त्यांनी मैदान सोडले नाही हे चांगलेच केले; पण, त्या मैदानाचा ते उपयोगच करीत नाहीत. ठाकरे तर कोणतेही मैदान गाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत ना? नागपुरातील भूखंड, त्याचा मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संबंध हे प्रकरण एकदम ताजे होते अन् त्याच दिवशी ठाकरे विधानभवनात आले होते.
सभागृहात जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल करण्याची आयती संधी त्यांनी गमावली. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार हा विषय उचलतील, असे त्यांना वाटले; पण, अजितदादांनी भलत्याच विषयावर सुरुवात केली. तिकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या आवाक्याइतका प्रयत्न केला. एकनाथ खडसेंनी पॅडिंग केले; पण, मजा नही आया. ठाकरेंनी स्वत: पुढाकार घेतला नाही. नुसते हजेरी बुकावर सही करण्यासाठी विधानभवनात येऊन काय होणार? आदित्य ठाकरे यांनी मात्र कंबर कसलेली दिसते. सत्ता गेल्याचे शल्य दूर करत ते कामाला लागले आहेत. सभागृहात आणि बाहेरही हल्लाबोल करतात. लंबी रेस का घोडा ठरू शकतात पण पुढची दिशा काय असेल; माहिती नाही. सेना निघून गेलेल्या या तरुण सेनापतीने भावनिक मुद्द्यांपेक्षा सामान्यांच्या प्रश्नांना हात घातला तर बरे होईल.
अजित पवार एवढे शांत का असावेत? काही जुन्या विषयांची तर अडचण नाही ना? की अलीकडे एक गुंता सुटल्याचा हा परिणाम? ते पूर्वीसारखे बिनधास्त वाटत नाहीत. तलवार दाखवणे वेगळे आणि चालवणे वेगळे. अधिवेशनापूर्वी विरोधकांनी भरपूर हवा तयार केली होती; पण, अधिवेशनात येतायेता गाडी पंक्चर झाली. ते सरकारची कोंडी करीत असल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादीतील ताळमेळ बिघडला की काय? जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार सभागृहात जे बोलले ते ‘बिटविन द लाइन’ वाचण्यासारखे होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फ्लोअर मॅनेजमेंट बरोबर केले. तांत्रिक, कायदेशीर गुंतागुंत असलेल्या प्रश्नांवर फडणवीस यांनी स्वत: उत्तरे दिली. त्याबाबतीत त्यांचा हात कोण धरणार? गेले काही दिवस ‘शिंदे मुख्यमंत्री आहेत तर त्यांनाच सांभाळून घेऊ द्या’ असा फडणवीसांचा नवा पवित्रा असल्याची चर्चा सुरू झाली होती, त्या चर्चेला फडणवीसांनी या अधिवेशनात उभा छेद दिला. सूत्रे स्वत:कडे घेत त्यांनी विरोधकांना हतबल करणे सुरू केले आहे. शिंदे-फडणवीसांचे ट्युनिंग उत्तम दिसते. उद्धव ठाकरे-अजित पवार-बाळासाहेब थोरात यांच्यात ते दिसत नाही. ग्रामपंचायत निकालांनी भाजपचे हौसले बुलंद आहेत. ‘रामगिरी’वर रात्री आमदारांना मुख्यमंत्री शिंदे यांनी जेवण दिले; त्याआधी भाषणेही झाली. फडणवीस म्हणाले, ‘ग्रामपंचायत निकालांनी जनता आपल्यासोबत असल्याचे सिद्ध झाले आहे. विरोधकांना दोन्ही सभागृहांत हेडऑन घ्या, कोणाला घाबरायचे काहीही कारण नाही.’ त्याचा परिणाम गुरुवारी सभागृहात दिसला.
शिंदे मुख्यमंत्री असले तरी सरकारचे पालकत्व फडणवीस यांनी घेतल्याशिवाय काही खरे नाही, अशी आमदारांची भावना होती.
फडणवीस यांना ती उमजलेली दिसते. शिंदेही वाटतात तितके साधे नाहीत. एका झटक्यात ५० आमदारांना खेचणारा हा नेता आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना ते भेटले तेव्हा, हमारे मुंबई मे शेट्टी लोगों के बहोत हॉटेल और धंदे है; उनको चलने देना है की नही..? असा दम शिंदेंनी दिला. त्यांनी आणखी खूप काही सुनावले. शिवसेना फोडून शिवसेनाच तयार केल्याने शिंदेंमधील शिवसैनिक जसाच्या तसा आहे हेही यावरून दिसले. बाय द वे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याची मागणीही मागे पडलेली दिसते. राज्यपाल नागपुरात आहेत आणि विविध कार्यक्रमांना जात आहेत. विरोधकांना राज्यपाल हटावबाबत काही शब्द मिळाला आहे की राजीनाम्याचा विषय आता रेटायचा नाही असे ठरले आहे?
विदर्भाचा दबावगट कुठे गेला?
पूर्वी काँग्रेसच्या विदर्भातील आमदारांचा दबावगट असायचा. रणजित देशमुख, सतीश चतुर्वेदी पुढे असायचे. मामा किंमतकर, बी.टी. देशमुख त्यांना मुद्दे द्यायचे. नितीन राऊतही दणकून बोलायचे. विदर्भाच्या आमदारांचा धाक होता. काँग्रेस, भाजपचे आमदार विदर्भाच्या प्रश्नांवर आतून एक असायचे. त्यांची समजूत काढताना बाहेरच्यांना घाम फुटायचा. आज तो दबावगट दिसत नाही. विदर्भाच्या नागपूरकेंद्रित विकासाविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नितीन राऊत, सुनील केदार, यशोमती ठाकूर यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला आहेत. कोणी कोणाचा नेता नाही, प्रत्येक जण नेता आहे. फक्त बाईट द्यायला टाईट असतात!
जाता जाता : चंद्रपूरच्या वीजनिर्मिती प्रकल्पातील एका कामावरून मध्यंतरी भाजपचे एक मंत्री आणि भाजपचे विदर्भातीलच एक बडे नेते यांच्यात जोरदार काटाकाटी झाली. दोघांचाही इंटरेस्ट होता म्हणतात. प्रकरण मग फडणवीसांच्या कोर्टात गेले. त्यांनी निकाल कोणाच्या बाजूने दिला ते कळले नाही; पण, प्रकरण शांत झाले.