प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
विद्यार्थीदशेपासून मला राजकारणाची आवड होती. वयाच्या १८व्या वर्षापासून मी राजकारणाच्या अगदी जवळ आहे. विद्यार्थी सेनेपासून मी राजकारणाला सुरुवात केली. पण राजकारणात नसतो तर एक यशस्वी उद्योजक झालो असतो. किंबहुना आजही मी एक यशस्वी उद्योजक आहे. राजकारण आणि व्यवसाय हे दोन्ही आपापल्या जागी. या दोन्हींची गल्लत करत नाही. त्यामुळेच मी यशस्वी राजकारणी आणि उद्योजकही आहे.
अर्धे जग पाहून झाले
मला युरोप फिरायला आवडते. कुटुंबासमवेत युरोपातील अनेक देश फिरलोय. युरोपमध्ये आजही २०० ते ३०० वर्षांच्या आठवणी त्यांनी जतन केल्या आहेत. युरोपातील स्वच्छता मनात भरते. अर्धे जग मी कुटुंबासमवेत बघितले आहे. प्रत्येक वर्षी किमान दोन ठिकाणांना तरी मी निश्चित भेट देतो. फिरणे हा माझा छंद आहे.
स्वित्झर्लंड कशाला? काश्मीर चांगले आहे...
काश्मीरला जायला खूप आवडते. स्वित्झर्लंडला कशाला जायला हवे काश्मीर काही कमी नाही, असे मला वाटते. इतर देशांनी पर्यटनाची परंपरा जपलेली आहे. परंतु आपल्या देशाने पर्यटनाला हवे तसे महत्त्व दिलेले नाही. काश्मीर ज्या पद्धतीने विकसित होणे अपेक्षित होते, तसे झालेले नाही. भारत-पाकिस्तान वादाचा फटका काश्मीरच्या विकासाला बसला.
शर्ट, पँट अन् जॅकेट
मी साधे रेमंडचेच कपडे घालतो. जॅकेट आणि पॅन्ट शिऊन घेतो. बॉस या ब्रॅन्डचे रेडिमेड शर्ट घालतो. कारण ते मला व्यवस्थित होतात. बाकी इतर कपड्यांची फारशी आवड नाही.
...आणि व्यायाम कमी झाला
शरीराला व्यायामाची गरज आहे. मी दररोज सकाळी व्यायाम करतो. किंबहुना व्यायाम माझा छंद आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे व्यायामाला पूर्ण वेळ देऊ शकलेलो नाही. परंतु, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करतो.
शब्दांकन : अजित मांडके