विजय बाविस्कर , समूह संपादक, लोकमत|
आपण २६ जानेवारी, १५ ऑगस्ट हे दोन दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे करतो. देशभक्तीपर गाणी ऐकतो. राष्ट्रध्वजाला सलाम करतो. मात्र आपली हीच भावना दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहात राष्ट्रगीत लागल्यानंतर उभे राहण्यासाठीही कंटाळा का करते? स्वातंत्र्य मिळाले म्हणजे नेमके आपण काय मिळवले? वाटेल तसे बोलण्याचे वागण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे का ? ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या उक्तीप्रमाणे वृत्तीने आपण कोणाबद्दलही, कधीही, कुठेही, काहीही बोलू शकतो...? हे स्वातंत्र्य आपल्याला अपेक्षित आहे का..? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात सान-थोरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
आपण देशासाठी काय करत आहोत? अलीकडच्या काही वर्षांत सोशल मीडिया नावाचे भूत आपल्या मानगुटीवर बसले आहे. आपल्या हाती मोबाइल आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारखी आयुधं आहेत. याचा अर्थ मनात आलेली प्रत्येक भावना कोणताही मागचा पुढचा विचार न करता या माध्यमांद्वारे आपण जगभरात पसरवतो. हे करत असताना आपण द्वेष, तिरस्कार पसरवत आहोत याचेतरी भान आपल्याला असते का?
गावागावात भाईचारा होता, सामंजस्य होते... लोक एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जात असत... परस्परांच्या सुखदुःखात सहभागी होत... आता हे वातावरण आपल्या आजूबाजूला शिल्लक उरले आहे का..? पुण्या-मुंबईसारख्या महानगरांमध्ये ३०-४० मजल्यांच्या टॉवरमधून एका मजल्यावर पार्टी चालू असते, तर दुसऱ्या मजल्यावर कोणाचे तरी निधन झालेले असते... अशावेळी पार्टी करणाऱ्यांना थांबावेसे वाटत नाही ... इतक्या आमच्या संवेदना बोथट झाल्या आहेत का..?
या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचत आहेत. एकीकडे तरुण पिढी उद्यमी बनत आहे. तंत्रज्ञानावर स्वार होत ही तरुणाई वेगवेगळे व्यवसाय शोधत आहे. त्याचवेळी भरकटलेली तरुण पिढीदेखील याच देशात आपल्या अवतीभवती आहे. ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण केले पाहिजे, असे म्हणणारे बहुसंख्य नेते ९०% राजकारण आणि १० टक्के सुद्धा समाजकारण करताना दिसत नाहीत. एकमेकांचे पाय ओढणे, तरुण पिढीला पैशांचे आमिष दाखवून नको त्या गोष्टी करायला लावणारे राजकारणीही आपल्या आजूबाजूलाच आहेत. आजचा दिवस आपला असे म्हणत प्रत्येक जण स्वतःच्या ताटात जेवढे ओढून घेता येईल तेवढे ओढून घेण्याच्या मागे लागला आहे.
महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी या गोष्टी आम्हाला निवडणुकीपुरत्या महत्त्वाच्या वाटतात. रुपयाचे अवमूल्यन किंवा मोठ्या प्रमाणावर तरुण हुशार पिढी देश सोडून जाणे हा विषय गंभीर चर्चेचा आहे, असे आम्हाला वाटत नाही. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव, देश, अन् धर्मा पायी प्राण घेतले हाती...या ओळी कवितेत वाचायला छान वाटतात. मात्र प्रत्यक्षात आम्ही तसे जगतो का? हा प्रश्न स्वतःला भारतीय आणि स्वतंत्र समजणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मनाला विचारला पाहिजे. वंदे भारत ट्रेन असो किंवा स्टेशनवर पिण्याच्या पाण्याचा वॉटर फिल्टर असो, आजही त्या ठिकाणी स्टीलचा ग्लास साखळीला ठेवावा लागतो... पान, तंबाखू, गुटखा खाऊन रस्त्यावर पिचकारी मारण्यात आम्ही स्वतःला ग्रेट समजतो.सिग्नल मोडणे, कोणाला धडक देऊन सुसाट निघून जाणे, दारू पिऊन गाडी चालवणे ही आमची स्वातंत्र्याची व्याख्या होणार असेल... तर कशालाच काही अर्थ उरणार नाही... स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. आमच्या सोयीनुसार ‘कधी कधी भारत माझा देश आहे’ असे म्हणून आम्ही प्रत्येक गोष्ट सोयीनुसार वागायची ठरवली असेल तर अशा स्वातंत्र्याची अपेक्षा आपल्या पूर्वजांनी केली होती का..? हा प्रश्न आपण आपल्या मनाला आजच्या निमित्ताने विचारूया... प्रजासत्ताकदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!!