अरविंद कुमार सिंह, ज्येष्ठ पत्रकार
सरदार पटेल यांची जयंती किंवा पुण्यतिथी आली की त्यांचे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाते कसे होते याचे अनेक किस्से कानावर पडू लागतात. त्यातले काही निव्वळ बंडलबाजी आणि काही जाणूनबुजून पसरवलेल्या अफवा असतात. परंतु, सरदार पटेल आणि नेहरू यांच्यामध्ये एक अनोखे गाढ असे नाते होते हेच वास्तव आहे. असे नाते आजच्या राजकीय नेत्यांमध्ये क्वचितच पाहायला मिळू शकते.
नेहरू यांची गांधीजी आणि सरदार पटेल यांच्याशी पहिली भेट १९१६ मध्ये लखनऊच्या काँग्रेस अधिवेशनात झाली होती. या अधिवेशनाला लोकमान्य टिळकांसह त्यावेळचे सगळे दिग्गज नेते हजर होते. काँग्रेसमधील एकतेचा एक नवा कालखंड त्यावेळी समोर आला. तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत दोघांमधील नाते कायम होते. सरदार पटेल यांच्यापेक्षा नेहरू १४ वर्षांनी लहान होते. पटेल यांच्या मनात नेहरूंबद्दल अपार स्नेह होता. म्हणूनच ७ मार्च १९३७ ला गुजरात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात असा मुद्दा पुढे आला की, पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रांतीय निवडणूक प्रचारासाठी गुजरातमध्ये बोलावले जावे. तेव्हा पटेल यांनी त्याला हरकत घेतली. ते म्हणाले, आम्ही त्यांना गुजरातमध्ये मतांची भीक मागण्यासाठी बोलावणार नाही. ती लाजिरवाणी गोष्ट होईल. निवडणुकीत गुजरात विजयी होईल आणि काँग्रेसबद्दल आपला विश्वास व्यक्त करील तेव्हा आपण नेहरूंना मन:पूर्वक बोलवू, फुलांनी स्वागत करू.
१९४९ साली पटेल यांनी पंडित नेहरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहिले. या पत्रात ते लिहितात ‘काही स्वार्थप्रेरित लोकांनी आपल्या दोघांविषयी भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला असून, काही भोळसट लोक त्यावर विश्वासही ठेवतात; परंतु वास्तवात आपण आजीवन सहकारी आणि बंधुत्वाच्या नात्याने काम करत आलो. काळाच्या गरजेनुसार आपण एकमेकांचे दृष्टिकोन लक्षात घेऊन आपल्यात बदल केले, एकमेकांच्या मतांचा कायम आदर केला.’ नेहरूंनी दिल्लीत २० सप्टेंबर १९६३ रोजी सरदार पटेल यांचा पुतळा उभा केला आणि त्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते केले.