विनय र. र., विज्ञान अभ्यासक
जेव्हा रात्री घरात तुम्ही एकटे / एकट्या असता, अंधार दाटून आलेला असतो, लांबच्या किड्यांची किरकिर ऐकू येते... मध्येच एखादे उनाड वटवाघूळ पंख फडफडत जाते किंवा एखादे घुबड घुंकार भरते तेव्हा एकटेपणाची जाणीव भीतीकडे सरकायला लागते. तेव्हा खरेतर तुम्ही एकटे/एकट्या नसता! तुमचे घर ‘आपले’ मानणारे काही जीव घरात वावरत असतात. काही तुम्हाला आवडतात त्यांना तुम्ही पाळीव प्राणी म्हणता, ते तुमच्या स्वेच्छेने ठेवलेले असतात. काही तुम्हाला आवडत नाहीत ते अपाळीव प्राणीसुद्धा तुमच्या घरात असतातच. तुमच्या सोबत! जसे की ढेकूण!
अख्ख्या फ्रान्समध्ये आणि विशेषत: पॅरिसमध्ये ढेकणांनी धुमाकूळ घातल्या असल्याच्या बातम्या अद्याप थांबायचे नाव घेत नाहीत. हा ढेकूण आपल्याला काही तसा नवा नाही म्हणा! सगळ्याच मानवजातीशी ढेकणांचे रक्ताचे नाते; पण हेही खरे, की तुम्ही झोपल्याशिवाय काही ढेकूण बाहेर पडू शकत नाही. तुम्ही रात्री छान झोपलात की तुमच्या उच्छवासातला कार्बनडायऑक्साइड, तुमच्या अंगातली उब आणि तुमच्या शरीराचा वास याचा वेध घेत बरोबर ढेकूण मंडळी तुमच्याकडे येतात. मध्यरात्रीनंतर ढेकणांना माणसाचे रक्त प्यायला फार आवडते! ढेकणांना उडता येत नाही, फार लांबही चालता येत नाही. ढेकूण अतिशय चपळ आणि बुजरा प्राणी आहे. कुठल्याही सापटीत तो सहजपणे सामावून जातो. ढेकूण उंदरासारखे काहीही सटरफटर खात नाही. ते फक्त रक्त पितात.
डासाप्रमाणे मलेरिया, फायलेरिया, हत्तीपाय, डेंग्यू असले कुठलेही रोग तो आणत नाही. कारण तुमचे रक्त पितांना तो फक्त त्याची सोंड आत टाकतो आणि तोंड खुपसून पाच एक मिनिटात रक्त पिऊन निघूनसुद्धा जातो. मग तुम्हाला तिथे खाज येते आणि लालसर पुळी येते तो भाग वेगळा. ढेकणांचे जीवनध्येयच फक्त माणसांचे रक्त पिणे हे आहे.
अगदी जन्मापासून ढेकूण माणसांचे रक्त पितो. सदतीस दिवसात वयात येतो, त्या आधी पाच वेळा कात टाकतो. अर्थात थोडी शी सुद्धा करतो, त्यामुळे ढेकूण कुठे असेल याचा थांगपत्ता तुम्हाला लागतो. पूर्वी म्हणे काही वैदक ढेकूण पाळत आणि साप चावल्याची केस आली की त्या जागी विषारी रक्त प्यायला ढेकूण सोडत. अर्थात त्यासाठी ढेकूण शेकड्याने कामाला लावायला हवेत. पूर्वी दुसऱ्या महायुद्धानंतर डीडीटीच्या प्रभावामुळे कोट्यवधी ढेकूण मेले; पण त्यातून जे शिल्लक राहिले ते आता कुठल्याही औषधाला जुमानत नाहीत.
जागतिक तापमान वाढीमुळे आता ढेकूणही पुन्हा वाढायला लागले आहेत. मादी ढेकूण दिवसाला एक ते सात अंडी घालते. बाहेरच्या तापमानाप्रमाणे ते प्रमाण बदलते तसे ढेकणाचे पिल्लू सहा ते नऊ दिवसांनी बाहेर येते. ३७ दिवसांनी मोठे होते, वयात येते आणि आपला संसार करायला लागते. तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले की ढेकूण मरतात.
घरात ढेकूण नको असतील तर सतत स्वच्छता करायला हवी. हवे तर तुमच्या गादीला एक वेगळे कव्हर करा, ज्याच्यामुळे ढेकूण आतल्या आत उपाशी राहतील. अर्थात ढेकूण एक वर्ष उपाशी राहिले तरी जिवंत राहू शकतात; पण ढेकणांचे आयुष्य जेमतेम ४०० दिवसांचे असते, हेही खरे!
- तर अशा या ढेकणांनी फ्रान्सला बेजार करून सोडले आहे. त्यात पॅरिस ऑलिम्पिक तोंडावर आलेले, त्यामुळे तर सरकारची पळापळ फारच जास्त आहे. मेट्रो आणि सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना, हॉटेलात मुक्काम करताना, जुन्या गाद्या किंवा फर्निचर विकत घेताना नागरिकांनी काय काय काळजी घ्यावी यासाठी फतवे काढण्याची वेळ सरकारवर आली आहे. आता तर ढेकणांनी फ्रान्सची हद्द ओलांडून शेजारच्या देशात प्रवेश केल्याच्या बातम्या आहेत, आणि अमेरिकेत न्यूयॉर्क, शिकागो, फिलाडेल्फिया ही तीन शहरे त्यांनी आपल्या विळख्यात घ्यायला सुरुवात केली आहे म्हणतात!- म्हणजे पाहा! पाहा!