शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
3
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
4
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
6
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
7
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
8
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
9
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
10
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
11
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
12
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
13
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
14
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
15
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
16
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
17
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
18
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
19
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
20
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले

अत्यंत संताप आणणारे विदारक अन् भयानक वास्तव; १० हजार वर्षांत असले राजकारणी झाले नाहीत

By अतुल कुलकर्णी | Published: September 09, 2024 6:17 AM

आता ही सहनशीलता मुंबई चालवणाऱ्या कोकणातल्या चाकरमान्यांनी सोडून दिली पाहिजे. राजकारण्यांना मतदानाला जाण्यापूर्वी जाब विचारला पाहिजे.

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. एक मुलगा दुपारीच घरी येतो. आईला सांगतो, मी नोकरी सोडून दिली. आई काळजीने म्हणते, बाबा रे, आपल्या घरात तू एकटाच कमावणारा... अशी कशी नोकरी सोडून दिली..? आता आपण करणार काय..? घर कसे चालवणार..? मुलगा म्हणतो, आई, गणपतीला कोकणात जायला बॉसने सुट्टी दिली नाही. म्हणून मी नोकरी सोडून दिली. त्या क्षणाला आई म्हणते, गेला उडत तुझा तो बॉस... समजतो काय स्वतःला..? गणपतीला जायला सुट्टी देत नाही म्हणजे काय..? बरं कैलं नोकरी सोडून दिली. अशा ७६ नोकऱ्या मिळतील.... कथेचे तात्पर्य असे की, मुंबईत राहणाऱ्या चाकरमानी माणसाला गौरी-गणपतीसाठी कोकणात जायचेच असते. त्यासाठी भले ते नोकरी सोडून देतील, पण कोकणात जातील म्हणजे जातील. आपल्या परिसरावर, आपल्या गावावर आणि गौरी-गणपतीवर विलक्षण प्रेम करणारा हा फणसासारखा माणूस..! मिळेल त्या वाहनाने हालअपेष्टा सहन करत १५ ते २० तास प्रवास करत, आपल्या गावी जातो. श्रद्धेने गौरी-गणपतीची पूजा करतो... आणि पुन्हा त्याच हालअपेष्टा सहन करत महामुंबईत परत येतो. प्रसंगी नोकरीवर पाणी सोडणारा हा चाकरमानी माणूस, रेल्वे, एसटी महामंडळ, खड्ड्यांनी भरलेला रस्ता... याविषयी मात्र तितक्या तीव्रतेने बोलत नाही, कारण त्याची सहनशक्ती टोकाची आहे. याचाच गैरफायदा आजपर्यंत सगळे राजकारणी घेत आले आहेत. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दरवर्षी प्रचंड गर्दी असते, हे माहीत असूनही अनेक सरकारे आली आणि गेली, मात्र, कोणत्याही सरकारला मुंबई-गोवा महामार्ग गेल्या बारा वर्षांत नीट करता आलेला नाही. या काळात जास्तीच्या रेल्वे गाड्या सोडाव्या, असे रेल्वे प्रशासनाला वाटले नाही. एसटी महामंडळ याचे कसलेही नियोजन करत नाही, उलट कोकणी माणसाच्या याच मजबुरीचा फायदा घेऊन कामगार संघटना स्वतःच्या पगारवाढीसाठी संप पुकारतात. कोकणात जायची वेळ झाली की मंत्री, अधिकारी मुंबई- गोवा महामार्गाची पाहणी करतात. यंदाच्या गणपतीला सगळ्यांना गुळगुळीत रस्त्यावरून जाता येईल, अशी घासून घासून गुळगुळीत झालेली आश्वासने देतात. शेवटी मात्र ओबडधोबड रस्त्यावरून राजकारण्यांच्या सात पिढ्यांचा उद्धार करत, मनातल्या मनात चरफडत हा सहनशील चाकरमानी गौरी गणपतीसाठी गावी जातो..! कोकणातले काही नेते स्वतःच खासगी बस चालवतात, त्या बसचे भाडे पाचपट सहापट करतात. ही अशी अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारी गोष्ट दरवर्षी घडते, मात्र, कोणत्याही शासनकर्त्याला यावर काही उपाय करावा, असे आजपर्यंत वाटलेले नाही.

ज्या मुंबईतून कोट्यवधीचा कर केंद्र सरकारला मिळतो, त्या केंद्राचे रेल्वे खाते या कालावधीत जास्तीच्या गाड्या सोडण्याचे नियोजन करत नाही. काही मंत्री, नेते आपल्या मतदारसंघापुरते रेल्वे सोडल्याचे कौतुक करून तर काही राजकारणी दोन-चार बसची व्यवस्था करून स्वतःची पाठ थोपटून घेतात. मात्र, मेंढरे कोंबावी, तशी माणसं याच रेल्वे गाड्यातून दाटीवाटीने समजून घेत प्रवास करतात. एकमेकांना वर्षानुवर्ष हे होत असताना या गोष्टीचे कोणालाच कसे काही वाटत नाही.? एखाद्या वेळी गौरी-गणपतीच्या काळात जर निवडणुका जाहीर झाल्या, तर हेच राजकारणी कोकणात जाण्यासाठी स्वखर्चाने विमानाची सोय करतील.

चाकरमान्यांना त्यांच्या घरून गाडी पाठवून स्टेशनवर, विमानतळावर नेतील. त्यांच्या गावात, त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडतील, मात्र, असे कधीच होत नाही. गणपती, दसरा, दिवाळी या काळात कधी निवडणुका आल्याचे आजपर्यंत घडले नाही. तसे झालेच तर या लोकांची बडदास्त कशी ठेवायची? हा प्रश्न कायम राजकारणी लोकांना भेडसावेल. याही वर्षी मुंबई ते कुडाळ ९ तासांच्या प्रवासाला २० तास लागले. मुंबई ते माणगाव हा ३ तासांचा प्रवास १२ तासांहून जास्त झाला. इंदापूर ते माणगाव दरम्यान ८ किलोमीटर वाहनांच्या रांगा होत्या. या भागातील महामार्गाची दुरुस्ती करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही प्रशासनाने काहीच केले नाही. गुरुवारी रात्री ९ वाजता मुंबईहून कोकणाच्या विविध तालुक्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या शुक्रवारी संध्याकाळपर्यंत राजापूर तालुक्यापर्यंतही पोहोचल्या नव्हत्या. संगमेश्वरजवळही वाहनांची बेफाम कोंडी होती ती कधी दूर होईल, लोकांना मोकळा रस्ता कधी मिळेल, याच्या कसल्याही सूचना कोणीही देत नव्हते. काही वाहन चालक चुकीच्या मार्गाने गाड्या पुढे नेण्याचा प्रयत्न करत होते. त्यातून वाहन चालकांमध्ये, प्रवाशांमध्ये रस्त्यावर भांडणे होत होती, मात्र, या संपूर्ण परिसरात पोलिस औषधालाही नव्हते. हे अत्यंत संताप आणणारे विदारक आणि भयानक वास्तव आहे.

मात्र आता ही सहनशीलता मुंबई चालवणाऱ्या कोकणातल्या चाकरमान्यांनी सोडून दिली पाहिजे. राजकारण्यांना मतदानाला जाण्यापूर्वी जाब विचारला पाहिजे. बारा वर्षे मुंबई-गोवा महामार्ग का होत नाही? पुढच्या एक वर्षात झाला नाही, तर तुमचे राजीनामे आधीच आम्हाला देऊन ठेवा, असाच खणखणीत इशारा कधीतरी दिला पाहिजे, मुंबईत आम्ही कष्ट करतो, म्हणून हे महानगर धावते हे विसरू नका, असे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. आम्हाला असे गृहीत धरू नका. पुढच्या वर्षापर्यंत कोकणात जाण्यासाठीच्या सोयीसुविधा झाल्या नाहीत, तर आमच्या सोबत आम्ही ज्या अवस्थेत प्रवास करतो, त्याच अवस्थेत तुम्हाला कोंबून घेऊन जाऊ, असे कधीतरी प्रशासन चालवणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि राजकारणी लोकांना सांगितले पाहिजे, किंबहुना, असा प्रवास त्यांना घडवला पाहिजे... तर आणि तरच कोकणात जाण्याचा मार्ग सुकर होईल. आचार्य अत्रे आज जिवंत असते, तर "दहा हजार वर्षांत असले राजकारणी झाले नाहीत" असा मथळा त्यांनी दिला असता...

टॅग्स :konkanकोकणGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024