शीला झुनझुनवाला
साधारण १९३४ सालची गोष्ट. जवाहरलालजी श्रीमती कमला नेहरूंसोबत शांतिनिकेतनला पोहोचले. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या देखरेखीखाली चालणारी ही शाळा पाहून त्यांनी ठरवलं की आपल्या मुलीला योग्य शिक्षण आणि संस्कार देण्यासाठी शांतिनिकेतनपेक्षा दुसरी चांगली शाळा असूच शकत नाही.त्यांनी बराच विचार केला. कारण इंदिराजी लहानपणापासूनच अतिशय लाडात वाढल्या होत्या आणि ‘शांतिनिकेतन’मधलं आयुष्य खूपच खडतर होतं. तिथे मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी जीवन जगायला शिकवलं जायचं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ही शाळा पूर्णपणे भारतीय वातावरणात सुरू केली होती.
रवींद्रनाथ टागोर यांची शिक्षणाला कायमच प्राथमिकता होती. चार भिंतीआडच्या चाकोरीबद्ध शिक्षणाला त्यांनी मुक्त केलं आणि हे शिक्षण खुल्या, मोकळ्या वातावरणात नेलं. जीवनाचं शिक्षण देणं हाच त्यांचा त्यामागे प्रमुख हेतू होता. त्यासाठी त्यांनी अविरत कष्ट घेतले. त्यांनी चाकोरीबद्ध शिक्षणाला फाटा तर दिलाच, पण हे शिक्षण निसर्गाच्या सान्निध्यात आणून कला, क्रीडा, संस्कृतीच्या माध्यमातून त्याला आणखी अनोखं रूप दिलं.
इंदिरा गांधी यांना याच शाळेत जीवनाचं शिक्षण द्यायचं आणि त्यांना मोठं करायचं, जेणेकरून त्यांना जीवनाची सगळी अंगं समजतील, हे पंडित नेहरू यांचं ध्येय होतं. आयुष्य कसं असतं आणि कसं जगावं लागतं हे कळलं तर इंदिरा गांधी यांना पुढच्या काळात त्याचा उपयोग होईल अशा दूरदृष्टीनं त्यांनी इंदिराजींना या शाळेत टाकण्याचा निर्णय घेतला होता.
तिथलं जीवन हुबेहुब गुरुकुलासारखं होतं. इंदिराजींच्या कुटुंबीयांना प्रश्न पडला होता की, इंदिराजी तिथलं खडतर जीवन कसं सहन करू शकतील? पण शेवटी जवाहरलालजींचीच इच्छा पूर्ण झाली. स्वत: इंदिरा गांधींनाही ‘शांतिनिकेतन’ खूपच आवडलं. वडिलांप्रमाणेच त्यांनाही आयुष्यातील कठीण प्रसंगांना कसं तोंड द्यायचं हे जाणून घ्यायचं होतं.
१९३४ मध्ये इंदिरा गांधी शांतिनिकेतनमध्ये पोहोचल्या. तिथे सर्व काही आपलं आपणच करायचं होतं. तिथलं जीवन अतिशय खडतर होतं. नियमाप्रमाणे वागायची सक्ती होती. शिस्त खूप कडक होती. कितीही गरम होत असलं तरीही विद्यार्थी राहत असलेल्या खोल्यांमध्ये पंखे नव्हते, सर्व अभ्यास कंदिलाच्या उजेडात करावा लागत होता.
विद्यार्थ्यांनी दररोज सकाळी अंघोळ करताना स्वत:चे कपडे स्वत:नेच धुवावेत, असा नियम होता. स्वयंपाकघरापासून ते प्रत्येक कामात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. प्रत्येक कामासाठी विद्यार्थ्यांची ड्यूटी लावलेली होती, पण विशेष म्हणजे सर्वांमध्ये स्नेह होता. प्रत्येकाचं एकमेकांवर मनापासून प्रेम होतं. देशाच्या स्वातंत्र्याचा धडा तिथे मिळत होता. कुठल्याही कठीण कामाचा अनुभव नसलेल्या इंदिराजींनी शांतिनिकेतनच्या खडतर जीवनाशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच त्या तिथल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये अग्रेसर मानल्या जाऊ लागल्या. शरीर नाजूक, कोमल असलं तरी मुलींमध्येही किती कणखरपणा आणि धैर्य असतं हे प्रत्येकाला समजलं. शांतिनिकेतनमधील आयुष्याच्या त्या कालखंडाबद्दल इंदिरा गांधींनी स्वतः अनेकदा म्हटलं आहे, ‘मी तिथेच भारत पाहिला, शिकला, समजून घेतला आणि अनुभवला!..’