- डाॅ. विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
प्रकाशाने न्हाऊन निघणाऱ्या दिवाळीची रात्र आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाने भरलेली होती. भेटायला येणाऱ्यांची रीघ लागलेली होती. सर्वांचे तोंड गोड केले जात होते. मुले हुंदडत होती. फटाक्यांची आतषबाजी होत असताना आवाज घुमत होते. दूर असलेले आप्तजन, मित्र व्हर्च्युअल शुभेच्छा देत होते. त्यादिवशी रात्री उशिरापर्यंत मीही हा आनंद लुटला. ही आपली संस्कृती आहे आणि वारसाही. जीवन अशा प्रसंगांनीच तर साजरे होत असते.
परंतु, रात्र उलटल्यानंतर मनात आले, आपण किती नशीबवान आहोत, आपल्या घरी-दारी दिवाळी साजरी होत आहे! मात्र जिथे फटाक्यांच्या जागी बॉम्ब फुटत आहेत, तिथल्या कोट्यवधी लोकांचा जरा विचार करा. तेथे मृत्यूचे तांडव चाललेले आहे. तरुण कवी अरमान आनंद यांच्या कवितेतल्या काही ओळी मला आठवल्या. ‘युक्रेनच्या नावे लढताना’ असे त्या कवितेचे शीर्षक आहे. या कवितेचा अनुवाद असा-
नुकताच शेतातून भाज्या घेऊन आला, तेवढ्यात इंग्रजी भाषेतील मॅन्युअल आणि सोबत एक बंदूक त्याच्या हातात दिली गेली. तुला देशासाठी लढायचे आहे, असे सांगण्यात आले.
आतापर्यंत देशाचे पोट भरायचे होते, आता लढायचे आहे. तो खूप वेळ बंदूक उलटीपालटी करून पाहत राहिला. त्याच्या लक्षात आले की, बंदूक वापरून कधीही आपण शेती करू शकत नाही. त्याची गर्भवती पत्नी दरवाजाला टेकून उभी त्याला दुरून पाहत राहिली. त्याने बंदूक बाजूला ठेवली, मग कुऱ्हाड उचलली. तो आपल्या पत्नीजवळ गेला, तिला जवळ घेऊन म्हणाला, मुलांना सांग त्यांच्या बापाने बंदूकवाल्यांवर कुऱ्हाड चालवली होती. जिथे माझे प्रेत पडेल, तिथे एक चेरीचे झाड लावा.
रशिया आणि युक्रेनची लढाई, तसेच हमास, हिजबुल्ला यांच्याबरोबर इस्त्रायलच्या संघर्षात हजारो लोकांचा जीव गेला आहे. कित्येक या युद्धात घायाळ झाले, दहा लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झाले. ज्यांचा या युद्धाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता, त्यांना त्याची झळ बसली. खरेतर, ते शांततेने जगू पाहणारे लोक होते. आपल्या मुलांना शिकवून त्यांचे भविष्य घडवण्याची त्यांची इच्छा होती. त्यांना पोटभर जेवण आणि प्यायला स्वच्छ पाणी हवे होते. सध्या एकट्या युक्रेनमध्ये जवळपास १४ लाख लोकांना पिण्याचे पाणी मिळेनासे झाले आहे. प्रत्येक क्षणाला त्यांच्या कानावर मृत्यूचे तांडव घडवणाऱ्या बॉम्बस्फोटांचे आवाज पडतात. आपल्या मुलाच्या चिंधड्या उडताना आईला पाहावे लागते. क्षणात नवरा समोर मरून पडतो. मुले अनाथ होतात. शेवटी युद्ध का होते?, आपण शांततेने जगू शकत नाही का? गेल्या २०० वर्षांत ३ कोटी ७० लाख लोक युद्धात मारले गेले. संयुक्त राष्ट्रांनी दिलेली ही आकडेवारी वाचून मन विषण्ण होते.यात सामान्य नागरिक आणि युद्धानंतर भूक, तसेच आजारपणामुळे मरणाऱ्यांची संख्या समाविष्ट नाही.
सध्या आफ्रिकी देश आणि मध्यपूर्वेतील अनेक देशांतही अंतर्गत लढाया चालू आहेत. अफगाणिस्तानचे युद्ध, तर आपण पाहिलेच आणि त्यानंतर झालेली अफगाणिस्तानची दुर्दशाही पाहत आहोत. तेथे आयुष्य नरक झाले आहे. चार दशकांहून जास्त काळ झाला, आपण काश्मीरला रक्तरंजीत होताना पाहत आहोत. अशा परिस्थितीत ‘कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा’, असे कोणी कसे म्हणू शकेल?
वीसपेक्षा जास्त प्रदेश युद्धग्रस्त आहेत आणि तिथे जे गट लढत आहेत, त्यांना वास्तवात लढवले जात आहे. याचे कारण जगातील शक्तिमान देश त्या ठिकाणी आपल्या पसंतीची सत्ता आणू इच्छितात. जेणेकरून तेथे सैन्याचे तळ उभे करून तिथल्या साधनसामग्रीची लूट करता येईल. मी कुठल्याही देशाचे नाव घेणार नाही, पण हे नक्की की, युद्ध लढणाऱ्यांना पैशांपासून हत्यारांपर्यंत मदत केली जात आहे. काही संघटना, तर इतक्या मजबूत आहेत की, त्या ज्या देशात आहेत, त्या देशाच्या सैन्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त ताकदवान आहेत. जगातील शस्त्रास्त्रांचे सौदागर कायमच कुठे ना कुठे युद्ध चालू राहिले पाहिजे, या खटपटीत असतात. शस्त्रास्त्रे विकली गेली पाहिजेत, म्हणून दहशतवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणावर ते शस्त्रास्त्रे पोहचवतात. जग खड्ड्यात गेले, तरी त्यांना फिकीर नसते.
दारुगोळ्याचे हे कारखाने बंद होऊ शकत नाहीत का ? शस्त्रास्त्रे नसतील, तर युद्धही होणार नाही, परंतु शस्त्रास्त्रांची स्पर्धा लागली आहे. आता तर बुद्ध, महावीर आणि गांधींचा देशही शस्त्रास्त्रे तयार करत आहे. शस्त्रास्त्रे शांततेसाठी आहेत, असे म्हटले जाते. पण, शेवटी ते आहे तर शस्त्रच. एकूणच फार अजब परिस्थिती आहे. संयुक्त राष्ट्रांसारखी संस्था निरुपयोगी झाली आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ चा पुरस्कार करणारी आपली संस्कृती आहे. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी शांततेचा मंत्र दिला; आता पंतप्रधान नरेंद्र मोदी शांततेसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. परंतु, मृत्यूचे थैमान चालू असताना प्रत्येकजण आपापली डफली वाजवून आपापला राग आळवण्यात मग्न आहे. जागतिक शांततेच्या, सौहार्दाच्या गप्पा कितीका होईनात, वास्तव हेच आहे की, भयावह युद्धात कोणालाही अंधाराच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत. युद्धात अडकलेले लोक ईद कशी साजरी करतील? दिवाळी आणि ख्रिसमस ?