डॉ. शैलेंद्र देवळाणकर, आंतरराष्ट्रीय घडामाेडींचे अभ्यासक
मुद्द्याची गोष्ट: मागील सहा महिन्यांपासून बांगलादेशात नागरिक उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदाेलन करीत आहेत. बांगलादेशमध्ये जे घडले ते अरब स्प्रिंगप्रमाणे बांगलादेश स्प्रिंग म्हणजेच नागरिकांची शासनविराेधी प्रतिक्रांती हाेती का? असा प्रश्न निर्माण हाेताे. नागरिकांचा राेष शेख हसीना आणि त्यांची धाेरणे, तसेच सरकारच्या विराेधात हाेता. मात्र, अरब स्प्रिंगनंतर आखाती देशात लाेकशाही पद्धतीचे शासन प्रस्थापित हाेऊन लाेकांचे प्रश्न सुटले असे नाही, तर घराणेशाही, अस्थिरता आली आणि अराजक निर्माण झाले. त्यामुळे बांगलादेशातील अस्थिरतेमुळे भारतासमाेरील आव्हाने वाढणार आहेत.
बांगलादेशची उदारमतवादी इस्लामिक देश अशी मागील काही वर्षांपासून ओळख निर्माण झाली आहे. शेख हसीना यांच्या काळात आर्थिक विकास माेठ्या प्रमाणात झाला. जीडीपी ५ ते ६ टक्क्यांवर पाेहाेचला. देशाचे उत्पादन आणि निर्यातीमध्येही वाढ झाली. मात्र, या विकासाचे लाभ सर्वसामान्यांना मिळाले का? हा प्रश्न उपस्थित हाेताे. सुमारे ७० ते ८० लाख बांगलादेशी नागरिक सहा महिन्यांपासून रस्त्यावर उतरले हाेते. हे सर्वजण भारतविराेधी तसेच केवळ धार्मिक मूलतत्त्ववादी विचाराने प्रभावित हाेते असे नाही. शेख हसीना यांनी देशाबाहेर पलायन केल्यानंतरही आंदाेलन सुरू आहे. त्याचा अर्थ असा आहे, की आर्थिक विकासाची फळे सर्वसामान्यांपर्यंत पाेहाेचलेली नाहीत. गरिबी, बेराेजगारी माेठ्या प्रमाणात आहे.
सरकारविराेधी आंदाेलन शांततेच्या मार्गाने थांबविण्याऐवजी शेख हसीना यांनी आंदाेलकांना रझाकार, दहशतवादी म्हणून हिणवले. त्यामुळे असंताेष वाढत गेला. नागरिकांनी कायदा हातात घेतला आणि आंदाेलन तीव्र हाेत गेले. नागरिकांचा राेष राजघराण्याविराेधात असल्याचे दिसून येते. बांगलादेशात दाेन घराणी राजकारणात सक्रिय आहेत. त्यामध्ये एक शेख हसीना यांचे वडील मुजिबूर रहमान हे बांगलादेश स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख हाेते, तर खालिदा झिया यांचे पती माजी लष्करप्रमुख हाेते. शेख हसीना यांचा १५ वर्षांचा कार्यकाळ हा भारतासाठी चांगला असला, तरी त्यांच्या शासनाची दिशा ही हुकूमशाहीकडे वाटचाल करीत हाेती. गेल्या दाेन निवडणुकांमध्ये विराेधकांचा सहभाग नाही. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी बांगलादेश नॅशनल पार्टी या मुख्य विराेधी पक्षावर बंदी आणून नेत्या खालिदा झिया यांना तुरुंगात टाकले. ‘जमात-ए-इस्लामी’वर बंदी घातली. सर्वसामान्य आंदाेलकांवर गोळीबार करण्याचा आदेश लष्कराला दिला. मात्र, लष्कराने तो धुडकावून लावला. आंदाेलन चिघळले आणि परिणामी शेख हसीना यांना पायउतार व्हावे लागले.
भारतविरोध हा हिंदूंविरोधात बदलू नये- बांगलादेशात मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेले आंदाेलन व्यापक कटाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तान, आयएसआय यांच्यासह चीन, अमेरिकेने आंदाेलकांना समर्थन दिले असण्याची शक्यता आहे.- भारतीय वस्तूंवर बहिष्कार, आरक्षण आणि असहकार चळवळीच्या माध्यमातून सुरू होते. अल्पसंख्याक आणि हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. भारतविरोध हा हिंदूविरोध होऊ नये.
शेख हसीनांनंतर पुढे काय? - बांगलादेशाच्या राज्यघटनेनुसार शेख हसीना यांच्यानंतर तीन महिन्यांपर्यंत काळजीवाहू सरकार चालविले जाऊ शकते. त्यानंतर निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.- लष्करप्रमुखांनी निवडणुका घेतल्यावर बांगलादेश नॅशनल पार्टी सत्तेवर येणार आणि त्यांच्या सरकारमध्ये जमात-ए-इस्लामी आणि तहरिक-ए-तालिबान असणार आणि इतर धार्मिक मूलतत्त्ववादी गट असणार आणि त्यांचा शासनावर प्रभाव राहण्याची शक्यता आहे.- शेख हसिनांना भारत राजाश्रय देणार का, हे मोठे आव्हान आहे.
सीमेवरील गस्त वाढवावी लागणार- भारताच्या पश्चिमेकडे पाकिस्तान आहे. दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी सीमेवर कुंपण घालण्यात आले आहे. त्याप्रमाणे पूर्वेकडे बांगलादेशाला लागून चार हजार किमीची सीमारेषा आहे. - मूलतत्त्ववादी गटाचा प्रभाव वाढला तर पाक पुरस्कृत संघटनेचे दहशतवादी भारतात घुसू शकतात. - बनावट नोटा आणि अमलीपदार्थांची तस्करी वाढू शकते. या प्रकारांमुळे भारताची चिंता वाढणार आहे.