आमीन चौहान, राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित प्रयोगशील शिक्षक
गेली पावणेदोन वर्षे बंद असणाऱ्या शाळांमध्ये मुलांचा विशेषत: चिमुकल्यांचा किलबिलाट टप्प्याटप्प्याने का असेना, पुन्हा सुरू होऊ लागला आहे. शाळा सुरू होणार असल्या, तरी तत्काळ अभ्यास सुरू व्हायला नको, असं जाणकारांचं मत आहे. अनेक प्रयोगशील शिक्षकसुद्धा या विचाराचे समर्थक आहेत. कारण, शाळेसाठी आधी मुलांची मानसिकता तयार करायला हवी. शाळेत येण्याची, वर्गात बसण्याची, शिक्षण घेण्याची, शिस्तीत वागण्याची आणि वेळापत्रकाचं, शिक्षकांच्या सूचनांचं पालन करण्याची सवय मुलांना लावायला हवी. यापूर्वी मुलांनी कधीच एवढ्या दीर्घ सुट्या अनुभवलेल्या नाहीत. अनेक मुलं तर पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवतील. घरी राहून मुलांची शिस्त बिघडली आहे.
झोपण्याचं, उठण्याचं, जेवणाचं वेळापत्रक बिघडलं आहे. त्यांची शिकण्याची गती बरीचशी मंदावली आहे. वाचन आणि लेखनासोबतच त्यांच्या आकलनाच्या गतीतही कमालीची घट झाली आहे. या सर्व बाबी रुळावर येण्यासाठी काही काळ लागेल. तो त्यांना द्यायलाच हवा. त्यासाठी शाळा सुरू होताच लगेच अभ्यासाची घाई नको. परीक्षा तर नकोच नको.
वर्गात व शाळेत किमान दोन आठवडे तरी गाणी, गप्पा आणि गोष्टींचा आनंद महोत्सव हवा. शिक्षकांनी मुलांच्या या गप्पांमध्ये सहभागी व्हायला हवं. कारण, त्यांची मोठी भूमिका या नव्यानं सुरू होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेत असणार आहे. वर्गात आणि शाळेत मुलांचा हा आनंदोत्सव सुरू करण्याची, तो टिकेल असं वातावरण तयार करण्याची आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्याची जबाबदारी शाळांनी घ्यायला हवी.
इतक्या प्रदीर्घ काळाने शाळेत येणाऱ्या मुलांना त्यांच्या मित्रांना भेटू द्या. त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारू द्या. मनमोकळं बोलू द्या. मुलांना थोडं हलकं होऊ द्या. गाणी-गप्पा आणि गोष्टींची धम्माल वर्गात होऊन जाऊ द्या. त्यांना पुस्तकं चाळायला, वाचायला द्या. पदार्थ बनवायची कृती सांगू द्या. प्राणी, पक्षी, वाहने, शास्त्रज्ञ, खेळाडू, संत, थोर समाजसुधारक, देशभक्त यांच्या माहितीसह चित्रांचा संग्रह करायला सुचवा. कात्रण वही बनवायला सहकार्य करा. शालेय परिसरात किल्ला बनवू द्या. कागदापासून विविध वस्तू तयार करून घ्या. गाणी गाऊ द्या. विविध विषयांवर माहिती लिहू द्या. वाद्य वाजवू द्या. वाद्य ऐकू द्या. संगीताचा आनंद घेऊ द्या. मेंदी काढणं, कोन बनविणं ही कामंही करू द्या.
गेले अनेक दिवस शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बदलली आहे. यापूर्वी सुरू झालेल्या शाळांमधील मुलांची उपस्थिती रोडावली आहे. अनेक विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात उपस्थित राहण्याची इच्छाच नाही. तेव्हा विद्यार्थ्यांना पूर्ववत शैक्षणिक प्रवाहात आणण्याकरिता त्यांना आवडेल, रुचेल, पचेल असे हलकेफुलके आनंददायी उपक्रम शाळेत घ्यावेत. खेळण्या-बागडण्याचा हा आनंद महोत्सव शाळा-शाळांमध्ये राबविला जावा. विद्यार्थ्यांचे गट करून गटांना विद्यार्थ्यांना आवडेल अशी नावे द्या. दररोज एक इनडोअर व एक आउटडोअर उपक्रम घ्या. सुलेखन, संगीत खुर्ची, अंताक्षरी, लिंबू चमचा, एक मिनीट स्पर्धा, दोरीवरच्या उड्या, संदेश पोहचविणे, रंग भरण, पोत्याची शर्यत, बेडूक उडी, बटाटा शर्यत, कोडे ओळखा, सुईदोरा, शुभेच्छा कार्ड बनवणे, स्लो सायकलिंग, अनुभव कथन, कथा कथन, कविता वाचन व गायन, धावणे, मनोरंजक प्रश्नमंजूषा, वेशभूषा, नाट्यीकरण, नकला, क्रिकेट, एकपात्री प्रयोग, फुगडी असे अनेक खेळ, स्पर्धा बाल महोत्सवांतर्गत घ्याव्यात. स्पर्धांमधील विजेत्या मुलांना बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढवा.
मुलांच्या शाळेत जाण्याची तयारी पालकांनी सुद्धा करायला हवी. मुलांना जरुरीच्या वस्तूंची तयारी तर आलीच. शिवाय, मुलांना शाळेसाठी वेळेवर उठण्याची, शिस्त व वेळापत्रक पाळण्याची सवय लागावी म्हणून शाळा सुरू होण्यापूर्वी त्यांना याबाबींची जाणीव करून द्यायला हवी. शाळेत राहावं कसं? वागावं कसं? याचं प्रशिक्षण घरी द्यायला हवं. आवश्यक त्या सूचना द्यायला हव्यात. त्यांचं पालन करायला सांगायला हवं. मुलं एकदा नॉर्मल झाली की, मग हळूहळू त्यांना अभ्यासाकडे वळवायला हवं. मुलांना शाळा एकदाची सरावाची झाली की, त्यांना स्वाध्याय, गृहकार्य, सराव व मगच अभ्यासाला लावायला हवं.