मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी
मी ईडीचा किंवा सीबीआयचा अधिकारी आहे. तुमच्या एका प्रकरणात तुमच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. तुमच्या कागदपत्रांचा वापर करून तुमच्या नावे परदेशात हजारो कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तुमचे बँक खाते वापरले गेले आहे. तेव्हा मला बँक खात्याचे तपशील द्या... ऑनलाइन पासवर्ड, ओटीपी सांगा, असे सांगत गेल्या काही दिवसांत अनेक लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक कशी करतात, त्याची कार्यपद्धती देणारी ही माहिती. अनोळखी नंबरवरून फोन येतो. फोन करणारी व्यक्ती सांगते. तुमचे एक कुरियर आले आहे. त्यात अमली पदार्थ सापडले आहेत. त्यामुळे आम्ही हे प्रकरण नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोकडे (एनसीबी) सोपवत आहोत. फोन होल्ड करा. मी एनसीबीच्या अधिकाऱ्याकडे फोन वळवत आहे.
- एनसीबीचा तोतया अधिकारी : तुम्ही केलेला गुन्हा गंभीर आहे. हा फोन सुरू ठेवा आणि स्काईप कॉलवर किंवा व्हाॅट्सॲप व्हिडीओ कॉलवर या. तुमचा जबाब मला नोंदवायचा आहे. - फोन आलेली व्यक्ती : घाबरून. स्काईप किंवा व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलवर येते. पण अधिकारी असल्याची बतावणी करणारा माणूस स्वतःचा कॅमेरा सुरू करत नाही. तो केवळ तुमच्या या कॉलचे रेकॉर्डिंग करतो. त्याची ओळख पटावी म्हणून तो त्याच्या अधिकारी असलेल्या आयकार्डचा फोटो तुमच्याशी शेअर करतो.- अधिकारी : तुमच्यावर केवळ अमली पदार्थाचा गुन्हा नाही तर आमच्या संगणकीय सिस्टीममध्ये तुम्ही परदेशात काही कोटींचे व्यवहार केल्याचे दिसत आहे. त्यानंतर एका प्रथितयश राजकारण्याचा फोटो पाठवला जातो. याला तुम्ही ओळखता का?- फोन आलेली व्यक्ती : व्यक्तिशः ओळख नाही. पण ही व्यक्ती प्रसिद्ध राजकीय नेता असल्यामुळे मला माहीत आहे. - अधिकारी : याने तुमच्या कागदपत्रांचा वापर करून परदेशात शेकडो कोटी रुपये पाठवले आहेत. तुमच्या नावावर परदेशात अनेक कंपन्यादेखील उघडल्या आहेत. या राजकीय व्यक्तीची आम्ही माहिती काढतच आहोत. पण तुम्ही आता या प्रकरणातदेखील सहआरोपी झाला आहात. - फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) अहो साहेब, मला हे काहीही माहिती नाही. - अधिकारी : तुमच्या बँक खात्याचा नंबर सांगा. आम्हाला तपासायचे आहे की तुम्हाला या व्यवहारातून काही कमिशन मिळाले आहे की नाही.- फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) - बँक खात्याचा नंबर देते. - अधिकारी : एक ओटीपी आला असेल तुमच्या क्रमांकावर...- फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) - हो.- अधिकारी : मला तो ओटीपी सांगा. - फोन आलेली व्यक्ती : (घाबरून) तो ओटीपी देते. - अधिकारी : मी तुमच्या खात्याचे तपशील तपासून परत फोन करेन. तोवर शहर सोडून कुठेही जायचे नाही. एक-दोन दिवसात आम्ही घरी येऊन तुमचा सविस्तर जबाब नोंदवून घेऊ.
एवढ्या संवादानंतर फोन कट होतो. स्काइप किंवा व्हॉट्सॲपवर शेअर केलेल्या त्या अधिकाऱ्याचे फोटो किंवा आयकार्ड दोन्ही डिलीट होते.
दहा मिनिटांनंतर फोन आलेल्या व्यक्तीला एसएमएस यायला सुरुवात होते आणि बघता बघता त्याच्या बँक खात्यातील सर्व रक्कम तुमच्या डोळ्यादेखत रिकामी होताना दिसते.