मेघना ढोके, संपादक, लोकमत, सखी डॉट कॉम |
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात निकराची झुंज नियोजित आहे आणि भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान म्हणतो ‘मला पालकत्व रजा द्या...’ या मुद्द्यावरून भारतीय क्रिकेट चाहतेच नव्हे, तर निवृत्त भारतीय क्रिकेटपटूही सध्या मोठा वितंडवाद करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ऑस्ट्रेलियात मालिका खेळणं ही ‘नॅशनल ड्युटी’ आहे आणि तरी भारतीय कप्तान राेहित शर्मा रजा मागतो, केवढा हा बेजबाबदारपणा !
न्यूझीलंडने याच भारतीय संघाला ३६ वर्षांनंतर मायदेशात चितपट केले, तेव्हा हेच लोक म्हणत होते की, आता या कप्तानाला घरी बसवा, याच्याकडे टेस्टचं टेम्परामेंटच उरलेलं नाही. (काही महिन्यांपूर्वी याच कप्तानासह संघाने टी-ट्वेण्टी वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा त्यांना डोक्यावर घेऊन नाचलेलं भावूकपण अजूनही सरलेलं नाहीच.) आणि आता तोच कप्तान पालकत्व रजा मागतो, तर त्याच्यावर आरोप होत आहेत की, सध्या त्याचा फॉर्म नाही म्हणून तो संधी साधून ब्रेक घेत आहे. त्याला राष्ट्रीय कर्तव्याचं भानच नाही.
अलीकडे नव्या कार्यसंस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे : कुणीही रजा मागितली की, आधी ‘नकार’ द्यायचा आणि रजा दिली, तरी घेणाऱ्याला पुरेसा अपराधगंड वाटला पाहिजे, अशा बेताने पुरेसे आढेवेढे घ्यायचे. मात्र, इथे मुद्दा फक्त तेवढाच नाही, इथे प्रश्न आहे की, मुळात दुसरं मूल होणार आहे, तर ‘बाप’ म्हणून कप्तान शर्माला सुट्टी घ्यायची गरजच काय आहे? त्याची पत्नी मुलाला जन्म देणार, तर हा घरी बसून काय करणार?
हाच प्रश्न यापूर्वी विराट कोहलीलाही विचारण्यात आला होता. त्याने दोन्ही मुलांच्या वेळी पालकत्व रजा घेतली, तेव्हाही त्याला माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनीही ट्रोल करून ठणकावलं होतं, की... जा, घरी बस, मुलाचा डायपर बदल ! अर्थात कोहली वस्ताद आहे, तो कोणत्याच टीकेला बधला नाही.
आता पुन्हा तीच चर्चा रोहित शर्माच्या संदर्भात आहे. ‘दुसऱ्या अपत्य जन्माच्यावेळी पत्नीच्या सोबत असण्यासाठी म्हणून पालकत्व रजा हवी, मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध नसेन’, असं त्यानं फार पूर्वीच बीसीसीआयला कळवलंही होतं. बीसीसीआयनं त्याची रजा मंजूर केली की नाही, हे अर्थात कळू शकलेलं नाही, पण त्यापूर्वीच वाद सुरू झाले. अनेकजण आता सुनील गावस्कर आणि धोनीचं उदाहरण देत आहेत. राेहनचा जन्म झाला, तेव्हा गावस्कर वेस्ट इंडिजमध्ये खेळत होते. धोनीच्या लेकीचा जन्म झाला, तेव्हा तो ऑस्ट्रेलियात होता. त्यांनी सुट्टी घेतली नाही, मग शर्मानेच का सुट्टी घ्यावी ? याचं उत्तर आहे, प्राधान्यक्रम.
नव्या काळात बाप होणाऱ्या काहींना वाटतं की, आपण त्या अवघड काळात पत्नीसह असावं. अपत्य प्राप्तीचं सुख अन्य अनेक गोष्टींपेक्षा मोठं वाटतं. खरंतर यात समजून घेता येऊ नये असं काही नाही. पण, आपल्या समाजात अजूनही असं मानलं जातं की, नवजात बाळ सांभाळणं हे फक्त आईचं कर्तव्य आहे. रात्र-रात्र बाळासाठी जागरणं तिनेच करायची असतात. हे काम पुरुषांचं नाही, असं मानणारा एक मोठा वर्ग आजही आहे. म्हणून तर रणबीर कपूरपासून रणवीर सिंगपर्यंत सगळ्यांना मोठ्या कौतुकानं आजही जाहीर मुलाखतीत विचारलं जातं की, तुम्ही बाळाचं डायपर बदलता का? खरंतर नवजात बाळाला दूध पाजण्यापलीकडे त्याच्यासाठीची सारी कामं नवा बाबा आईइतक्याच क्षमतेनं आणि प्रेमानं करू शकतो, पण ते कामच दुय्यम असं मानणाऱ्या समाजात आजही भारतीय संघाच्या कप्तानाने पालकत्व रजा घेणं हा टिंगलीचा विषय होणं काही आश्चर्याचं नाही. आपले आजीमाजी दिग्गज खेळाडू रोहित शर्मावर टीका करत असताना, विदेशी खेळाडू मात्र त्याच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत, हे विशेष! पालकत्व रजा घेणं हा रोहित शर्माचा हक्कच आहे, असं त्यांचं म्हणणं!
आता या वादानंतर राेहित शर्मा ऑस्ट्रेलियात पहिल्या कसोटीसाठी जाईल किंवा जाणार नाही ते कळेलच लवकर. त्याच्यावर होणारी टीका हा घरोघरच्या चालू वर्तमानाचा आरसा आहे, हे मात्र नक्की! नवजात बाळ सांभाळायचं म्हणून आईनं घरी बसणं हे तिचं कर्तव्यच असतं, त्याच बाळासाठी बाबानं काही दिवस रजा घेणं हा मात्र त्याच्यासाठी ‘बेजबाबदारपणा’ ठरतो! हे समीकरण सगळीकडेच बदलण्याची गरज आहे. क्रिकेटचं मैदान हेही त्याकरता अपवाद असता कामा नये.(meghana.dhoke@lokmat.com)