थेट जिभेला चटके देण्याचा नवा बिझनेस जोरात होणार

By अतुल कुलकर्णी | Published: September 22, 2024 08:34 AM2024-09-22T08:34:29+5:302024-09-22T08:35:15+5:30

महाराष्ट्रातल्या राजकारणात तसा फारसा उद्योग नसणाऱ्या काही राजकीय नेत्यांनी नवीन बिझनेस सुरू केला आहे..!

Special artilce on Maharashtra political leaders are criticizing each other in low language | थेट जिभेला चटके देण्याचा नवा बिझनेस जोरात होणार

थेट जिभेला चटके देण्याचा नवा बिझनेस जोरात होणार

महाराष्ट्रातल्या राजकारणात तसा फारसा उद्योग नसणाऱ्या काही राजकीय नेत्यांनी नवीन बिझनेस सुरू केला आहे..! त्यांच्याकडे जिभेला चटके देऊन मिळतील. जीभ छाटून मिळेल. शिवाय कोणत्या नेत्याला, कोणत्या शेलक्या शब्दात हसडून काढायचे याचे वर्गही काही नेत्यांनी सुरू केले आहेत. सध्या हा धंदा जोरात आहे. त्यामुळे अनेकांना या नव्या बिझनेसमध्ये भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळेल, असे वाटू लागले आहे. जे लोक अशा नेत्यांवर श्रद्धा ठेवतात, मनापासून विश्वास ठेवतात, त्यांनी स्वतःच्या मुलांना अशा नेत्यांकडे विशेष क्लास घेण्याची विनंती केली पाहिजे. म्हणजे त्यांची मुलेही भविष्यात अशीच वेगवेगळ्या धंद्यात प्राविण्य मिळवतील. भविष्यात अशी गुणवान आणि विद्वान रत्न राजकारणात जन्माला येऊ शकतात, याची संत तुकोबारायांना आधीच कल्पना आली असावी.

म्हणूनच त्यांनी -
‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने 
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू,
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन,
शब्द वाटू धन जन लोका...
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव,
शब्देंचि गौरव पूजा करू...’

असा अभंग लिहून ठेवला असावा. तुकोबारायांच्या या अभंगावर विश्वास ठेवून आजकालचे नेते शब्दांचीच शस्त्र करत आहेत. अशी शस्त्र जनतेत मोफत वाटत आहेत. तुकोबारायांनी शब्दांना देव माना, शब्दांची गौरवाने पूजा करा, असे सांगितले होते. आजचे नेते तुकोबारायांच्या या अभंगाचा अर्थ त्यांच्या सोयीने, त्यांना हवा तसा उत्तमरितीने काढत आहेत, हे महाराष्ट्रातील संत परंपरेचा वारसा सांगणाऱ्या जनतेच्या ध्यानात आलेच असेल. 

शिंदेसेनेचे आ. संजय गायकवाड म्हणाले, ‘राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्या नेत्याला अकरा लाखांचे बक्षीस देऊ..!’ तर भाजपचे खा. अनिल बोंडे म्हणाले, ‘जीभ छाटण्यापेक्षा जिभेला चटके दिले पाहिजेत..!‘ आम्हालाही बोलता येते. मात्र आम्ही संयम ठेवतो, असे सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी, ‘धरणात पाणी नाही तर मी काय धरणात xxx का..?’ असा सवाल केला होता. नंतर त्यांनी त्याचे पापक्षालन केले. मात्र, आताचे नेते असले पापक्षालन करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. ते बिनधास्त बोलतात. नितेश राणे हिंदूंसोबतच  व्यवहार करण्याचा सल्ला देतात. विजय वडेट्टीवार माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत शहीद करकरेंच्या बलिदानावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. यशोमती ठाकूर नेत्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची मागणी करतात.

 मात्र, हे सगळे नेते संत तुकोबारायांच्या -
‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास,
कठीण वज्रास भेदूं ऐसे,
भले तरि देऊं कासेची लंगोटी,
नाठाळाचे माथी हाणू काठी...’
या ओळी विसरतात. स्वतःच्या कमरेची लंगोट डोक्याला नेसून फिरणाऱ्या वाचाळ आणि नाठाळ नेत्यांच्या माथ्यावर काठी हाणण्यासाठी जनता आतूर झाल्याची आठवण करून दिली पाहिजे, असे काहींना वाटते. मात्र, ज्यांनी वाटेल ते कसे बोलायचे याचे काढलेले क्लासेस ऐन भरात असताना ते बंद करावेत, असे कोणालाही वाटणार नाही. संजय गायकवाड यांनी जीभ कशी छाटायची, अनिल बोंडे यांनी एकच एक मुद्दा घेऊन वाटेल ते कसे बोलायचे, नितेश राणे यांनी शाब्दीक धमक्या कशा द्यायच्या, असे क्लासेस सुरू केले तर..?
अब्राहम लिंकन यांनी त्यांच्या गुरूजींना त्याकाळी पत्र लिहिले होते. खरंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या सध्याच्या काही प्रमुख नेत्यांची प्रतिक्रिया घेऊनच पत्र लिहायला हवे होते. आता या नेत्यांनी निवडणुकीच्या आधी वेगवेगळे क्लासेस सुरू केले आहेत तर त्यांनी मुलांना काही गोष्टी आवर्जून शिकवल्या पाहिजेत. वेगवेगळ्या भाषेत तार स्वरात बोलणाऱ्या नेत्यांनो, तुम्ही आता राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी क्लासेस घेतले पाहिजेत. तुमच्या क्लासेसमध्ये -
दुःख दाबून हसत राहण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. स्वतः रडत बसण्यापेक्षा दुसऱ्यांना कसे अश्रू ढाळायला लावायचे, हे आधी शिकवा. धमाल कमाई कशी करावी? ताकद आणि उपद्रव मूल्य वापरून उगाच संकोच न करता, कोण काय म्हणेल याचा विचार न करता, धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी परतावून लावत, आपलाच जयजयकार करणारी फौज कशी उभी करायची हे शिकवा..! घोटाळ्यांमधून ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय आणखी मोठे घोटाळे कसे करता येतील? हेही शिकवा. मानव जातीवर उदात्त श्रद्धा बाळगण्याचे दिवस कधीच इतिहासजमा झाले आहेत, हे आवर्जून सांगा..! गुंडांना घाबरण्यापेक्षा त्यांच्याशी दोस्ती कशी करायची? उगाच लायब्ररीत जाऊन पुस्तके वाचण्यापेक्षा शब्दांचे बाण सटासट कसे चालवायचे? वाटेल त्या शब्दात ‘भ’ची बाराखडी कशी व कुठे वापरायची हे देखील तुम्ही शिकवा. त्यात तुम्ही पीएच. डी. केलेली आहे. या विषयातले तुमचे प्रचंड ज्ञान उभा महाराष्ट्र गेले काही दिवस पाहत आहे, अनुभवत आहे..!

तेव्हा वेळ वाया घालवू नका. तुमच्या पक्षातले जे नेते सभ्यपणे बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनादेखील त्याचा काहीही उपयोग नाही हे समजावून सांगा. जुन्या-जाणत्या राजकारण्यांच्या मुलाबाळांनाही तुमच्यासारखे बोलायला शिकवा. महाराष्ट्र वेगाने या क्षेत्रात कशी गती मिळवत आहे हे जगाला कळेल... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!     - तुमचाच बाबूराव

Web Title: Special artilce on Maharashtra political leaders are criticizing each other in low language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.