मैदान में पसीना बहाओगे, तो जंग में खून नहीं बहाना पडेगा..’ किंवा ‘पसीना बहाओ, खून बचाओ..’ अशी प्रसिद्ध वाक्यं सैनिकांच्या बाबतीत वापरली जातात. त्यांच्या खडतर ट्रेनिंग कॅम्पमध्येही ही वाक्यं ठळक अक्षरात लिहिलेली असतात. याचा अर्थ, सैनिकांनी जर जास्तीतजास्त मेहनत घेतली, मैदानात कठोर ट्रेनिंग घेताना घाम गाळला, तर ते भविष्यातील सर्व खडतर प्रसंगांचा ते यशस्वी मुकाबला करू शकतील आणि त्यांना रक्त सांडावं लागणार नाही. यासाठीच जगातल्या प्रत्येक सैन्यासाठीचं प्रशिक्षण शारीरिक, मानसिक दृष्टीनं अतिशय खडतर असतं. ज्या देशाचं सैन्य असं ‘तयार’ असतं, त्यांच्या विजयाची शक्यताही मोठी असते. त्यामुळेच जगातल्या सर्वच सैनिकांच्या सेवेचा कालावधी कमी असतो, म्हणजे त्यांना अतिशय तरुणपणी नियुक्ती दिली जाते आणि त्या तुलनेत त्यांची निवृत्तीही लवकर होते. कारण ‘म्हाताऱ्या’ सैनिकांचा प्रत्यक्ष मैदानात लढण्यासाठी फारसा उपयोग नाही. आपले सैनिकही सक्षम आणि तरुण राहावेत यासाठी अमेरिकन सैन्यानं पुढचं पाऊल उचललं आहे.
‘यूएस मिलिटरी स्पेशल ऑपरेशन्स कमांड’नं (SOCOM) आपले सैनिक तरुण राहाण्यासाठी एक खास औषधच (गोळी) तयार केली आहे. ही गोळी घेतल्यानंतर सैनिक लवकर ‘म्हातारे’ तर होणार नाहीतच, पण युद्धात किंवा मदतकार्यात जखमी झाले तर त्यांच्या जखमाही खूप लवकर भरतील! त्यामुळे सैनिकांची शारीरिक, मानसिक क्षमताही मोठ्या प्रमाणात वाढेल.
अमेरिकन आर्मीनं ‘मेट्रो इंटरनॅशनल बायोकेम’ या एका खासगी प्रयोगशाळेशी करार केला असून, त्यांनी हे औषध तयार केलं आहे. प्राण्यांवर त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, त्यांच्या क्षमतेत आणि ‘तारुण्या’त वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. माणसांवरही हे औषध तितकंच लागू पडेल, असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. पुढील वर्षापासून या औषधाची ‘क्लिनिकल ट्रायल’ सुरू होईल आणि प्रत्यक्ष माणसांवर त्याचे प्रयोग केले जातील.
‘ब्रेकिंग डिफेन्स’च्या वृत्तानुसार या औषधामुळे कुठल्याही दुखापतीमुळे होणारा शरीराचा दाह कमी प्रमाणात होईल, सूज कमी येईल आणि मज्जासंस्थांचे ‘वृद्धत्व’ कमी होईल. पेशी ‘तरुण’ राहतील. या औषधाच्या निर्माणातील एक प्रमुख संशोधक लिसा सँडर्स म्हणतात, हा प्रयोग यशस्वी होईल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे अमेरिकन सैन्य कायम तरुण आणि ताजंतवानं राहील. अमेरिकन आर्मीचे प्रवक्ता टीम हॉकिन्स म्हणतात, माणसामध्ये मुळातच ज्या शारीरिक क्षमता नसतात, नाहीत, त्या निर्माण करणं किंवा वाढवणं हे आमचं ध्येय नाही. वयानुसार तुमची शारीरिक, मानसिक क्षमता कमी होत जाते, या घसरणीला बांध घालणं हे आमचं प्रमुख ध्येय आहे. त्यामुळे आमचं सैन्य कधीही, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहील. ‘मिशन’साठी सज्ज राहील आणि इतरांना भारी ठरेल.
अर्थात खास सैनिकांसाठी हे औषध तयार करण्यात आलं असलं, तरी सर्वसामान्य माणसांसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यादृष्टीनंही अमेरिकन आर्मी विचार करीत आहे. युद्धात अनेक वेळा मोठा रक्तपात होतो, त्यात सैनिक मोठ्या प्रमाणात बळी पडतात. या औषधांमुळे सैनिकांची क्षमता वाढेल आणि त्यांचं मृत्युमुखी पडण्याचं प्रमाणही कमी होईल, असं मानलं जात आहे.
अमेरिकेच्या या संशोधनामुळे इतर देशांना मात्र धक्का बसला आहे. अमेरिकन सैन्य आपल्यावर भारी पडू नये यासाठी इतर देशांनीही आतापासूनच विचार सुरू केला आहे; आणि त्यासाठीच्या प्रयत्नाला ते लागले आहेत. कोणताही सामना तुल्यबळांमध्येच व्हावा, कमजोर संघांवर वार करून त्यांना हरवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आम्हीही आमचं सैन्यबळ अधिक ‘बलवान’ करण्यासाठी प्रयत्न करू, असं काही देशांतील मुत्सद्यांचं म्हणणं आहे.
वैद्यकीय संशोधनातलं हे एक मोठं पाऊल ठरेल आणि सर्वांसाठीच त्याचा उपयोग होईल, लाेकांचं नुसतं आयुष्यच वाढणार नाही, तर ते अधिक निरोगी, तरुण राहतील, असा विश्वास अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या औषधांमुळे माणसाचं आयुष्यमान वाढेल, पण त्यामुळे लोकसंख्येचा समतोल बिघडेल, ‘वृद्ध तरुणांची’ संख्या जगभर वाढत जाईल, अशीही भीती काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी आतापासूनच प्रयत्न केले नाहीत, तर भविष्यात मोठा अनावस्था प्रसंग तयार होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नैसर्गिक अन्नघटकांपासून निर्मितीवार्धक्याला रोखून धरणाऱ्या या औषधामुळे शरीरातील निकोटिनामान एडेनिन डायन्यूक्लिओटाइड या द्रव्याची मात्रा वाढेल आणि चयापचय क्रियेतही विलक्षण सुधारणा होईल. मुख्यत: नैसर्गिक अन्नघटकांपासून ते काढले जाते. त्यात मोठ्या प्रमाणात औषधी गुण आणि पोषक तत्त्व आहेत. त्यामुळे त्याचे दीर्घकालीन विधायक परिणाम दिसून येतील, असं संशोधकांचं म्हणणं आहे.