सुधीर लंके, निवासी संपादक, लोकमत, अहमदनगर
न्यूज चॅनेलची इलेक्शन व्हॅन गावाच्या पारावर उभी आहे. रिपोर्टर गावातील दोन समूहांना सोबत घेऊन या निवडणुकीत काय होणार?- अशी चर्चा घडवून आणतो आहे, असे वातावरण गेल्या तीन-चार पंचवार्षिक निवडणुकांमध्ये दिसले; मात्र आता गावखेड्यांतील तरुण पोरेच मोबाइल हातात पकडून लोकांना विचारत आहेत ‘भाऊ बोला, आपल्या गावात हवा कोणाची?’
नोएडा अथवा मुंबईतील स्टुडिओत बसलेले न्यूज अँकर निवडणुकीची काय बातमी सांगतात, याची प्रतीक्षा करायला लोक तयार नाहीत. गावांमध्ये होणाऱ्या सभा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धोतर, टोपी, फेटा घातलेले बुजुर्ग बाबा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या महिलांची रिल्स सोशल मीडियामध्ये तुफान चालत आहेत. आमच्या गावात आम्ही कुणाला साथ देणार? याचे उत्तर हे लोक जाहीरपणे देताना दिसतात. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये लोक माध्यमांसमोर उघडपणे बोलत नसत; पण आता गावातील लोक ‘गेल्या पाच वर्षांत आमचा खासदार आम्ही पाहिलाच नाही’ असे उघडपणे सांगू लागले आहेत. यापूर्वी राजकीय पक्षांचे सोशल मीडिया सेल वॉररूम तयार करून आपणाला हवे ते व्हिडीओज, भाषणे, मीम्स लोकांपर्यंत पोहोचत होते. आता उलटे झाले आहे. लोकच आपणाला हवे ते रिल्स, व्हिडीओ तयार करीत आहेत. हा एक मोठा बदल या निवडणुकीत दिसतो आहे. गावोगावी अनेक तरुणांनी स्वतःची यू-ट्यूब चॅनेल्स तयार केली आहेत. त्यांची नावेही भन्नाट आहेत. ‘आपली बातमी’, अनेक तरुणांनी स्वतःच्या नावानेच यू-ट्यूब चॅनेल्स सुरू केली आहेत. ज्या तरुणांना गावात कुणी ओळखत नाहीत अथवा रूढ अर्थाने जे पत्रकार नाहीत ते आता यू-ट्यूबर झाले आहेत. निवडणूक प्रचारसभेसाठी पाच हजार लोक (पैसे, पोटपाणी, गाडीघोडे देऊन) जमवायचे म्हटले तरी उमेदवाराला लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्या तुलनेने अगदीच अत्यल्प खर्चात यू-ट्यूबच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते. उमेदवारांनी आपले बजेट यू-ट्यूबर्सकडे वळविले आहे. काही यू-ट्यूबर पेड न्यूजसुद्धा चालवतात.
इंडोनेशियात यावर्षी झालेली राष्ट्रपतींची निवडणूक ‘टिक टॉक इलेक्शन’ म्हणून ओळखली गेली. पाकिस्तानने सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ‘एक्स’ म्हणजे पूर्वीचे ‘ट्विटर’ बॅन केले होते. भारतातही या निवडणुकीत सोशल मीडियाने सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान निर्माण केलेले दिसते. भाजपने गत दोन निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला. या निवडणुकीत काँग्रेसही सोशल मीडियाचा वापर करण्यात आघाडीवर आहे. सोशल मीडिया आपणावरही उलटू शकतो, याचा अनुभव भाजप या निवडणुकीत प्रकर्षाने घेत असावा.
या सर्व बाबी राजकीय पक्षांसमोर भविष्यात आव्हान बनवून राहतील. कारण या अनियंत्रित सोशल मीडियातून लाखो मतदारांकडून कोणत्या कल्पना पुढे येतील, याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही.
निवडणूक प्रचारासाठी तरुणांनी तयार केलेल्या एका व्हिडीओत मुन्नाभाई सर्किटला विचारतो, ‘ए सर्किट अपने बापू के देश में क्या हो रहा है?’ त्यावर सर्किट म्हणतो, ‘देश मे भक्तों की संख्या बढ रही है!’... अशा भन्नाट कल्पना सोशल मीडियावर लढवल्या जात आहेत. प्रस्थापित उमेदवारांनी सोशल मीडियाचा धसका अधिक घेतला आहे. हा मीडिया मॅनेज करणे आपल्या हाताबाहेर आहे, याचा अंदाज त्यांना आला आहे. नेत्याचे यू-ट्यूबवर भाषण ऐकतानाच त्याच्याखाली ‘हे भाषण पसंत आहे की नाही’ हे सांगणाऱ्या शेकडो प्रतिक्रिया लगेच पडतात. लोक सर्वच नेत्यांना ट्रोल करीत आहेत. हा मीडिया आपली टप्पर वाजवत आहे, याची जाणीव नेत्यांनाही झालेली दिसते. काही पत्रकार आपल्या बाजूने उभे करता येतील; मात्र कोट्यवधी लोकांच्या हातात जो मीडिया आहे तो आपल्या बाजूने कसा करायचा?- हा पेच सर्वच पक्षांसमोर आहे व भविष्यातही तो राहील! सोशल मीडिया जबाबदारीने व लोकशाही मार्गाने वापरला गेला, तर तो सत्ताधीशांना जाब विचारत राहील, असे दिसते.