मुंबई, पुण्यासाेबतच्या सुवर्ण त्रिकोणातील समृद्ध नाशिकमध्ये महापालिकेच्या इस्पितळात टाकीतून ऑक्सिजनची गळती होते, प्राणवायूचा पुरवठा खंडित होतो अन् किड्यामुंग्यासारखे तडफडून कोविड-१९ संसर्गावर उपचार घेणाऱ्या २४ अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू होतो, हे महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाचे अपयश केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे नाही, तर सामान्यांच्या प्राणांबद्दल इतकी बेफिकिरी दाखविणे हे पापच आहे.
मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्यानुसार नाशिकच्या घटनेची चौकशी होईल, दोषींना शिक्षाही होईल. पण, गेलेले जीव परत येणार नाहीत. ही दुर्घटना काळीज गोठवणारी आहे. ज्यांनी रक्ताची माणसे गमावली त्यांचे ते अपार दु:ख वाटून घेण्याचीदेखील ही वेळ आहे. शिवाय, महामारीचा, आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी आपण अजिबात सक्षम नाही, आरोग्य व्यवस्थेची जणू चाळणी झाल्याचेही पुन्हा या घटनेने अधोरेखित केले आहे. गेल्या काही दिवसांत भंडारा, मुंबई, नागपूर आदी ठिकाणी आग व अन्य अपघात घडल्यानंतरही यंत्रणेने धडा घेऊ नये, ही दुर्घटनांची मालिका थांबू नये, हे अधिक वेदनादायी आहे. काहीही करा, पण कोरोनाच्या साखळीआधी ही अपघातांची साखळी तोडा, माणसांचे असे जीव जाणे थांबवा!