अरविंद पानगडिया, प्रोफेसर, कोलंबिया विद्यापीठ‘कोविड-१९’नंतरचे भारतातले जीवन कसे असेल, आपण पूर्वीप्रमाणे कामाला लागू की साथीचे काही मूलगामी परिणाम आपल्या जीवनक्रमावर कायम राहतील, घराबाहेरचा वावर, विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर काही आणखी निर्बंध कायम राहतील का? राहतील असे ज्यांना वाटते त्यांचे म्हणणे साथीनंतरच्या जगात मुख्यत: घरून काम करण्यावर भर राहील. शाळा कॉलेजात न जाता ऑनलाइन शिकविण्याचा पर्याय अधिक स्वीकारला जाईल. डॉक्टर्स टेलिमेडिसिनच्या माध्यमातून निदान करतील, औषधी सुचवितील... वैगेरे!कोरोनाच्या महामारीमुळे काय बदल होऊ शकतात याबाबतचे हे सारे अंदाज माझ्या मते जरा अतिरंजिततेकडे झुकणारे आहेत. मनुष्यजातीवर जेव्हा एखादी आपत्ती येऊन आदळते तेव्हा एकत्रितपणे सर्व सामर्थ्य वापरून तिचा प्रतिकार करणे हीच स्वाभाविक प्रतिक्रिया असते. या आपत्तीमुळे जे नुकसान होईल ते भरून काढण्यासाठी तातडीने कामाला लागणे. मोडकळीला आलेल्या व्यवस्था पुन्हा उभ्या करणे, भविष्यात त्याच प्रकारचे संकट पुन्हा ओढवले तर प्रतिकाराचा विचार-तयारी करणे आणि लवकरात लवकर पुन्हा आपले आपत्तीपूर्व आयुष्य सुरू करण्यासाठी धडपडणे, हीच आजवरच्या जगाची रीत राहिलेली आहे.२००५ साली अमेरिकेवर ‘कॅटरिना’ चक्रीवादळाने आघात केला. तिसऱ्या श्रेणीतले ते वादळ होते. ताशी १०५ कि.मी. वेगाचे वारे वाहिले. अमेरिकेतील लुइझियानामधील न्यू ऑर्लियन्स शहरातील रहिवाशांवर हे वादळ अकस्मात जाऊन आदळले. पन्नासहून अधिक ठिकाणी शहराचे संरक्षक कवच वादळाने भेदले. परिणामी ८० टक्के नागरिक पुरात सापडले. वीज, दूरध्वनी यंत्रणा कोलमडली, सेल फोनही बंद पडले. शहरातल्या महत्त्वाच्या आणीबाणी सेवा ठप्प झाल्या. या सगळ्या गदारोळात १८०० लोकांना प्राण गमवावा लागला. १०० महापद्म डॉलर्सच्या मालमत्तेची हानी झाली. पण एवढी उलथापालथ घडविलेल्या या वादळानंतर शहर सोडून न जाता शहरवासीय ते पुन्हा उभे करण्यासाठी पुढे सरसावले. फेडरल सरकारच्या मदतीने शहरातील संरक्षण यंत्रणा १४ महापद्म डॉलर्स खर्चून बसविण्यात आली. भविष्यातील पूर रोखण्यासाठी दरवाजे निर्माण केले गेले. आणीबाणीच्या काळात वापरायच्या संपर्क यंत्रणा पूर्ववत झाल्या. वैद्यकीय, पोलीस आणि अग्निशमन व्यवस्था कार्यरत केली गेली. पुन्हा ‘कॅटरिना’सारखे चक्रीवादळ आले तर ज्यांना शहराबाहेर पडणे शक्य होणार नाही त्यांच्यासाठी स्थलांतराची व्यवस्था करण्यात आली. नंतर सारे पूर्ववत झाले. शहराला यानंतरही वादळाचे तडाखे बसले; पण ‘कॅटरिना’इतके नुकसान झाले नाही.मुद्दाम लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे २१ सालच्या सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत ‘इडा’ वादळ आले. ते चौथ्या श्रेणीतले होते. वाऱ्याचा वेग ताशी १५० किमी होता. मात्र, संरक्षण यंत्रणांनी चोख काम बजावले. न्यू ऑर्लियन्सच्या रहिवाशांचे रक्षण झाले. वीज आणि संपर्क व्यवस्था थोडी गडबडली; पण पूर्ण कोलमडली नाही. संपूर्ण परगण्यात केवळ ३३ लोकांना प्राण गमवावा लागला. ९/११ च्या हल्ल्याला अमेरिकेचा प्रतिसादही असाच होता. असे हल्ले पुन्हा होतील या भीतीच्या दडपणाखाली न राहता या देशाने संरक्षण व्यवस्था वाढविली. विमानतळांवर तपासण्या पक्क्या केल्या. जनजीवन पूर्ववत झाले. पुन्हा तसा हल्ला झाला नाही.आपल्याकडचे ओरिसातले उदाहरण न्यू ऑर्लियन्ससारखेच आहे. १९९० साली आलेल्या महावादळाने १०,००० हून अधिक बळी घेतले होते. राज्याने स्थलांतराची परिणामकारक यंत्रणा उभी केली. जनजीवन पूर्वपदावर आणले. २०१३ साली ‘फायलीन’ वादळ आले. ताशी १४० किमी वेगाचे वारे वाहिले; पण नवीन पटनाईक सरकारने जीवितहानी किमान व्हावी याची काळजी घेतली होती. बळींची संख्या २३ राहिली. २००१ साली भूजमध्ये झालेला भूकंप किंवा मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला आठवा. संकटांना माणसे कशी प्रतिसाद देतात, पुन्हा कशी उभी राहतात याची ही दोन उदाहरणे.‘कोविड-१९’ ही मानवजातीवर गेल्या १०० वर्षांत आलेली सर्वांत भीषण आपत्ती आहे, हे खरेच! अभूतपूर्व अशी जीवित आणि वित्तहानी या साथीने झाली तरी मनुष्य जात साथ ओसरताच पुन्हा सामान्य जगण्याचा प्रयत्न करू लागली असेच दिसते आहे. मास्क, पीपीई किटस्, व्हेंटिलेटर्स आणि लसमात्रा याबाबतीत आता सगळेच सज्ज असतील; पण त्यापलीकडे जाऊन जीवनशैलीही बदलेल. उत्पादनशीलता वाढेल. जणू अशी कोणती साथ आलीच नव्हती असे चित्र उभे राहील. हे बदल एरवीही झालेच असते, त्या बदलांना कोविडने वेग दिला, हे मात्र नक्की.आम्ही कोलंबिया विद्यापीठात या सत्रात पुन्हा वर्गात आलो, हा अनुभव फारच बोलका आणि भविष्य कसे असेल याची दिशा दर्शविणारा आहे. आमच्या विद्यापीठात विद्यार्थी, शिक्षक मास्क घालतात. सर्वांचे लसीकरण झाले आहे. ५-जी नेटवर्कमधून आपण ३ डी प्रतिमा पाठवू शकलो तरी वर्गात जाऊन शिकण्या- शिकविण्याची पारंपरिक व्यवस्थाच प्रभावी राहील हे मला पटले आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरी एकाच वर्गात शिकणारा आणि शिकविणारा समोरासमोर येण्यातून जे साधते त्याला पर्याय देता येईल असे वाटत नाही.
कोरोनानंतरचे आपले आयुष्य कसे असेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 8:31 AM