बुधवारी सायंकाळी भारतीय क्षितिजावर सूर्य मावळत असताना कोट्यवधी भारतीयांचे डोळे चंद्रावर खिळलेले होते. प्रग्यान रोव्हर पोटाशी घेऊन विक्रम लँडर वेग कमी-कमी करीत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ हळूहळू पृष्ठभागाकडे जात असताना देशवासीयांनी श्वास रोखून धरला होता. ६ वाजून तीन मिनिटांनी विक्रमचे पाय तिथल्या जमिनीला टेकले. विक्रम व प्रग्यान हे दोन्ही लाडके भाचे चंदामामाच्या मांडीवर विसावले. नवा इतिहास लिहिला गेला. आकाशात मावळतीला किरमिझी रंगाची तर जगाच्या आसमंतात भारतीय यशाची उधळण झाली. देशभर जल्लोष सुरू झाला. जुना सोव्हिएत रशिया, अमेरिका व चीन या देशांकडून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग आणि त्यातील काही मोहिमा चंद्राच्या दक्षिण गोलार्धात यशस्वी झाल्या असल्या तरी अंधारलेल्या दक्षिण ध्रुवाजवळ आपले यान अलगद उतरविणारा भारत हा जगातला पहिला देश बनला. २३ ऑगस्ट २०२३ ही तारीख सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली. पुन्हा एकदा जगाचा दादा बनू पाहणाऱ्या रशियाने जवळपास पाच दशकांनंतर आखलेली लुना मोहीम तीन दिवसांपूर्वीच अपयशी ठरली. चंद्रयान-३ शी स्पर्धा करणारे लुना जमिनीवर कोसळले. या पार्श्वभूमीवर भारताचे हे यश मोठे आहे.
या सोनेरी दिवसाची तुलना, चोपन्न वर्षांपूर्वी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाय ठेवला त्या २० जुलै १९६९ या दिवसाशी करावी लागेल. हे यश भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, चंद्रयान मोहिमेसाठी झटणारे असंख्य शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ तसेच त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सरकारचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यवधी भारतीयांचेही. अपयशानंतर मिळालेल्या यशाचे मोल काही वेगळेच असते. पंधरा वर्षांपूर्वी बालदिनी, १४ नोव्हेंबर २००८ ला चंद्रयान-१ मोहीम यशस्वी ठरली होती. अर्थात तिच्यात सॉफ्ट लँडिंग नव्हते. परंतु, चार वर्षांपूर्वी चंद्रयान-२ मोहीम अपयशी ठरली. अंतराळ विज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीचा असा अखेरचा टप्पा त्यावेळी विक्रमला पार करता आला नाही. त्या अपयशातून शास्त्रज्ञांनी धडा घेतला. चुका शोधल्या, त्या दुरुस्त केल्या आणि नव्या उमेदीने नव्या माेहिमेची रचना केली. आजचे यश म्हणजे आधीचे अपयश पाठीवर टाकून गेल्या चार वर्षांत इस्रोच्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांनी केलेल्या परिश्रमाला लगडलेली ऐतिहासिक गोड फळे आहेत. हे यश अनेक दृष्टींनी खूप मोठे आहे. चाळीस वर्षांपूर्वी स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा अंतराळात गेले व तिथून त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी बोलताना भारताचे वर्णन ‘सारे जहां से अच्छा...’ असे केले. तरी भरमसाठ लोकसंख्येचा भारत दैन्य, दारिद्र्य, भूक, निरक्षरता, अनारोग्य अशा भौतिक समस्यांनी ग्रस्त होता व आजही काही प्रमाणात आहे.
साठच्या दशकात तेव्हाचे सोव्हिएत युनियन व अमेरिका हे दोन देश अनुक्रमे लुना व अपोलो या नावाने चंद्रावर कासव, श्वान व माणूस पाठविण्याची स्पर्धा करीत असताना भारत भुकेच्या समस्येशी झगडत होता. अर्धपोटी झोपणाऱ्या कोट्यवधी भारतीयांसाठी अमेरिकेतून मिलाे नावाचा गहू आयात करावा लागत होता. तो तिथे जनावरांना खाऊ घातला जायचा. तेव्हा बहुसंख्य लोक पोटापाण्याच्या प्रश्नांशी झगडत असताना अंतराळ मोहिमांसारखे खर्चिक प्रकल्प हाती घेणे परवडणारे नव्हते. आताही अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अंतराळ मोहिमा नगण्य खर्चाच्या आहेत. त्यामुळेच साधारणपणे ३ लाख ८५ हजार किलोमीटर अंतरावरील चंद्राकडे पोहाेचण्यासाठी अन्य देशांच्या यानांना चार-पाच दिवसच लागतात. आपण मात्र अधिक दिवस लागले तरी चालतील; पण इंधन व खर्चात कपात करतो. हॉलिवूडमधील एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीला जितका खर्च येतो त्यापेक्षा कमी खर्चात भारताची चंद्र किंवा मंगळावरील अंतरिक्ष मोहीम यशस्वी होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्या पंतप्रधानांनी अंतराळाचा वेध घेणे थांबविले नाही. देशवासीयांनी त्यांना तितकीच हिमतीने साथ दिली. त्या बळावर भारतीय वैज्ञानिकांनी मिळविलेले यशाचे वर्णन करण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. अर्थात, चंद्रयान-३ चे यश ही एका प्रदीर्घ यशोगाथेची सुरुवात आहे. लवकरच दूरच्या ग्रहांकडे जाताना चंद्र हा विसावा किंवा तळ असेल.
स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या भारताच्या अमृतकाळात भविष्यातील अशा यशाचे असंख्य अमृतकुंभ प्रतिभा व परिश्रमाची प्रतीक्षा करीत आहेत. विक्रमपासून वेगळे होणारे प्रग्यान रोव्हर पुढचे काही दिवस आतापर्यंत जिथे कुणी पोहोचलेले नाही अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या परिसरात रांगत राहील. तिथली खनिज संपत्ती, पाण्याची उपलब्धता व त्या टापूतील भूकंपांच्या कारणांचा अभ्यास करील. त्यातून नवे निष्कर्ष पुढे येतील. त्या आधारे भारताची मानवी अंतराळ मोहीम आकार घेईल. चंद्रयानाच्या यशाने भविष्यातील खोल अंतराळातील मोहिमांचा जणू दरवाजा उघडला गेला आहे. भावी पिढ्या त्यातून असे आणखी सोनेरी क्षण भारतीयांच्या वाट्याला आणतील, हे नक्की.