शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

‘ते’ लोक विरोधात आहेत? - मारून टाका त्यांना!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 5:19 AM

लेबनॉनमध्ये काय घडलं? सेलफोन वाजले, थरथरले आणि धडाधड स्फोटांचा धमाका उडाला! हे काय चाललंय? माणसं मारण्याची नवी तंत्रं? नवे कारखाने?

निळू दामले, ज्येष्ठ पत्रकार

लेबनॉनमध्ये लागोपाठ दोन दिवस पेजर्स आणि वॉकीटॉकीसारख्या बिनतारी साधनांचे स्फोट झाले. त्यात ३२ माणसं मृत्युमुखी पडली, ३१५० माणसं जखमी झाली. साधनं हाताळताना कोणाचे हात जळले, कोणाचे चेहरे जळले. पहिल्या दिवशी स्फोटात मरण पावलेल्यांच्या मयतासाठी दुसऱ्या दिवशी गोळा झालेल्या लोकांच्या हातातल्या साधनांचा स्फोट झाला.

जगभर या बातमीमुळं माणसं हादरली आहेत. माणसं मारण्याचं हे नवं तंत्र आपल्याला कुठं नेणार अशी चिंता आता लोकांना लागलीय. पेजर, सेलफोन, रेडिओ, टीव्ही, वॉकीटॉकी इत्यादी सर्रास वापरातली साधनं अशा रितीनं जर वापरली जाणार असतील तर लोकांचं जगणंच कठीण होणार आहे.

लेबनॉनमध्ये काय घडलं? लोकांच्या हातातले सेलफोन वाजले, थरथरले, स्फोट झाले. यंत्रामध्ये वीस-पंचवीस ग्रॅम स्फोटकं ठेवलेली होती. फोन-वॉकीटॉकी दुसऱ्या व्यक्तीशी कनेक्ट झाल्यावर साधनातला डिटोनेटर सक्रिय झाला, स्फोट झाला. ही साधनं तैवान, हंगेरी या ठिकाणच्या कंपन्यांतून आयात केलेली होती. कंपनीनं किंवा कुणी तिसऱ्या संस्थेनं या साधनांत काही ग्रॅम स्फोटक डकवलं होतं. इस्त्रायलनं हे घडवून आणलं, असा आरोप होतोय आणि इस्त्रायलनं आरोपाचा इन्कार केलेला नाही.

मुंबईत दहशतवाद्यांनी हेच तंत्र वापरून स्फोट केले होते. इमारतीच्या बाहेर एक सायकल उभी केली होती. सायकलला एक जेवणाचा डबा लटकवला होता. डब्यात एक सेलफोनसारखं काहीतरी साधन होतं. सेलफोन, पेजर, रेडिओ, वॉकीटॉकी इत्यादी साधनं बिनतारी संदेशवहनानं काम करतात. तारेविना रेडिओ लहरी साधनांत पोहोचतात. विशिष्ट लहर पोहोचल्यावर डिटोनेटर सक्रिय करण्याचा मंत्र साधनात बसवलेला असतो. सायकलवरच्या डब्याचा कोणाला संशय यायचं काहीच कारण नव्हतं. आदल्या रात्री कधीतरी सायकल आणि डबा ठेवला गेला. दुसऱ्या दिवशी ऐन गर्दीच्या वेळी दुरून कोणीतरी फोन केला. धडाम.

...याचा अर्थ आता कोणतंही बिनतारी साधन विकत घ्यायचं असेल तर त्याची तपासणी करणं आलं. रेल्वेस्थानक, विमानतळ, जिथे जाल तिथे तुमचे सेलफोन उघडा, त्यात स्फोटकाची तपासणी करा. एक नवं लचांड. हे झालं बिनतारी हिंसा तंत्र. असंच आणखी एक रासायनिक युद्धतंत्र  रशियानं  विकसित केलंय. रशियात हे तंत्र वापरणारा एक स्वतंत्र विभागच पुतीन यांनी उभारलाय. माणसाला विकलांग करण्यापासून ते मारण्यापर्यंत अनेक गोष्टी करू शकणारं रसायन. रशियन हस्तकांनी एक घातक रसायन नेवाल्नीच्या कपड्यांवर फवारलं होतं. नेवाल्नी हा पुतीनचा विरोधक. जर्मनीत त्याच्यावर तातडीनं उपचार झाले नसते तर तो मेलाच असता.

रशियन हस्तक घातक रसायनांच्या कुप्या घेऊन जगभर फिरतात, कुठल्याही देशात जाऊन तिथल्या विरोधकांचा काटा काढतात. स्क्रिपाल या डबल एजंटवर डीओडरंट फवारून त्याला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला, इंग्लंडमध्ये जाऊन. आपल्यापैकी कितीतरी लोक दररोज अत्तर, डीओडरंट आपल्या अंगावर फवारतात. लग्नात अत्तरदाणीतून सुगंधी द्रव फवारले जाते. मनगटावर, कपड्यांवर अत्तर लावण्याची प्रथा अजूनही आहे. अत्तराचा फाया कानात ठेवतात. फासायचं आणि फवारायचं अत्तर, त्यात रशियन रसायन मिसळलं की काम झालं. एखादं लग्न, एखादा समारंभ यात हे लक्ष्य करता येतं किंवा एखादं हॉटेल लक्ष्य करून तिथं फवारणीची व्यवस्था करता येते. इंग्लंडमध्ये एका माणसाला मारण्यासाठी कॉफीमध्ये रसायनाचे दोन थेंब टाकले होते. फाऊंटन पेनात ते रसायन भरलेलं होतं, पेन झटकून कॉफीत थेंब टाकण्यात आले.

एकेकाळी विषप्रयोग केवळ पौराणिक कथांमध्ये किंवा रहस्य कथांमध्ये वाचायला मिळत असत. रशियानं ही पुराणं आता वास्तवात आणलीत.

लेबनॉनमध्ये हेझबुल्लाच्या लोकांना मारण्यासाठी इस्त्रायलनं स्फोटकानं भरलेली साधनं वापरली. हेझबुल्ला या इराणी हस्तक संघटनेचा वावर लेबनॉनमध्ये असल्यामुळे इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यात पंचवीस वर्षांपासून मारामारी आहे. गाझात इस्त्रायलनं चालवलेल्या उत्पाताची प्रतिक्रिया म्हणून लेबनॉनमधून इस्त्रायलवर रॉकेटं सोडली जातात. त्याची प्रतिक्रिया म्हणून इस्त्रायलनं लढाईला हे नवं वळण दिल्याची चर्चा आहे.

शस्त्रांचा वापर जगभर इतका होतोय की, शस्त्र निर्मिती हा जगातला पहिल्या नंबरचा उद्योग होऊ पाहतोय. हमखास खप होणारा माल. कुणीही उठावं, या उद्योगात पैसे गुंतवावेत. त्यासाठीचं तंत्रज्ञान काय, कुठेही मिळतं! जगभर घरगुती ते शहरव्यापी कारखान्यांपर्यंत शस्त्रनिर्मितीचे उद्योग पसरलेत. सेलफोन आणि वॉकीटॉकी आता कोणीही अगदी घरातही तयार करू शकतो. त्यात दोन चमचे स्फोटक घालणं अगदीच सोपं. विका स्फोटक फोन. घरोघरी हे असे उद्योग निघू लागल्यावर कोणता कायदा आणि कोणतं सरकार या उद्योगावर लक्ष ठेवू शकणार?

शस्त्रं आणि नीतीमत्ता यांच्यातलं नातं पार तुटलेलं आहे. कुणाला दुसऱ्या धर्माचा द्वेष आहे. कुणाला दुसऱ्या जातीचा द्वेष आहे. कुणाला दुसऱ्या देशाचा द्वेष आहे. कुणाला भाषेचाही द्वेष आहे. मारून टाका त्या माणसांना. मारण्याचा अधिकार कुणी दिला? असा प्रश्न विचारू नका. तुम्ही जसे इतरांना मारणार तसेच इतरही तुम्हाला मारण्याच्या प्रयत्नात असणार या शक्यतेचाही विचार करू नका. मारत सुटा. बिनतारी युद्ध, बिनतारी हिंसा. भयानक आहे हे..