..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

By विजय दर्डा | Published: November 25, 2024 07:17 AM2024-11-25T07:17:32+5:302024-11-25T07:18:44+5:30

बाबूजींच्या काळात राजकारणात पक्ष आणि विचार वेगवेगळे असले, ‘मतभेद’ असले, तरी ‘मनभेद’ नव्हते! आज त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी राज्यातल्या बदलत्या राजकीय संस्कृतीची थोडी चर्चा !

Special Editorial - Politics of the 1970s-90s and Current Politics of Maharashtra and India | ..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना

डाॅ. विजय दर्डा , चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, 
लोकमत समूह

आज माझे बाबूजी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जवाहरलालजी दर्डा यांची सत्ताविसावी पुण्यतिथी असताना महाराष्ट्रात राजकारण शिगेला पोहोचले आहे. निवडणुका झाल्या आहेत आणि लवकरच सरकारही स्थापन होईल. बाबूजींना जो काळ लाभला, त्यावेळचे राजकारण पुष्कळच स्वच्छ होते. परंतु आजची परिस्थिती सारेच जाणतात. म्हणून आज या स्तंभात थोडी या विषयावर चर्चा. 

मला समज आली तेव्हा आजूबाजूला राजकारणाचा वावर होताच. वर्षानुवर्षे दमन झालेल्या या देशाला मजबूत करून जगभरात नावारूपाला आणण्याचा विचार त्यावेळी राजकारण्यांच्या मनात घोळत असे. साधनसामग्री पुरेशी नव्हती तरी स्वप्ने मोठी पाहिली जात. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महान लोकांनी उराशी बाळगलेले स्वप्न बाबूजींच्या मनातही वास करून होते. बाबूजी त्याबद्दल आम्हाला वारंवार सांगत असत. सामान्य माणसाच्या हलाखीबद्दलची वेदना त्यांच्या बोलण्यातून डोकावत असे. मी आणि माझा भाऊ राजेंद्र; आम्ही दोघांनी देशातील मूळ परिस्थिती समजून घ्यावी, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आम्हाला भारतीय रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाने बरीच वर्षे प्रवास करायला लावला. आम्ही दोघा भावांनी राजकारणात जावे, असे मात्र त्यांना वाटत नसे.

१९६२ ची गोष्ट आहे, वसंतराव नाईक यांनी त्यांना विचारले होते, मुलांना राजकारणापासून दूर का ठेवत आहात? त्यावर बाबूजींचे उत्तर होते; ‘आमचा काळ वेगळा होता. यापुढे राजकारणात जाती, धर्म आणि ईर्षा बोकाळलेली असेल. दोन्ही मुलांमध्ये त्यामुळे नैराश्य यावे, अन्य समाजाविषयी त्यांच्या मनात द्वेष यावा असे मला वाटत नाही. दोन्ही भाऊ राजकारणापासून दूर राहिलेलेच बरे.’ नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. १९९८ साली बाळासाहेब ठाकरे नागपूरमधील आमच्या ‘यवतमाळ हाऊस’ या घरी आले होते. मला म्हणाले, मी तुला राज्यसभेवर पाठवू इच्छितो. त्यावर माझी आई म्हणाली, राज्यसभेत जायचे असेल तर आधी सोनिया गांधींशी बोल! मी सोनियाजींना भेटलो. त्या म्हणाल्या, ‘बघते’. दरम्यान, अपक्ष म्हणून माझे निवडणूक लढवणे निश्चित झाले होते. मी निवडूनही आलो. सर्व पक्षांची मते मला मिळाली. आभार मानण्यासाठी मी अटलबिहारी वाजपेयींकडे गेलो. तर ते मला म्हणाले, ‘वेळ येईल तेव्हा तुझ्या वरिष्ठ नेत्यांशी मैत्री करून घे.’

नेमके तेच घडले. सोनिया गांधी मला भेटू इच्छितात, असा निरोप माधवराव शिंदे यांनी एकेदिवशी दिला. मी त्यांना भेटलो आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने मला राज्यसभेत आणखी दोन कार्यकाळ दिले. राजेंद्रही राजकारणात अचानक आले. माधवराव शिंदे आणि ए. आर. अंतुले यांच्यासारख्या नेत्यांना राजेंद्र यांनी औरंगाबादमधून (आताचे छत्रपती संभाजीनगर) निवडणूक लढवावी, असे वाटत होते. कारण ते खूपच लोकप्रिय होते. राजेंद्र निवडून आले आणि पहिल्याच कार्यकाळात मंत्रीही झाले. नंतरच्या दोन कार्यकाळातही ते मंत्रिमंडळात होते. राजकारणात आम्हा दोघांचा प्रवेश अकस्मात झाला खरा, पण आम्ही वास्तवात राजकारण केले नाही. बाबूजींच्या शिकवणुकीनुसार  लोककल्याणाच्या कामात झोकून दिले. बाबूजींच्या काळात राजकारणात पक्ष आणि विचार वेगळे असले तरी एकमेकांबद्दल  मनभेद नव्हता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी एकमेकांवर पातळी सोडून हल्ले केले, त्यात परस्परांच्या कुटुंबालाही ओढले. हे सारे पाहताना माझ्या मनात येत होते, राजकारण इतक्या खालच्या स्तरावर का उतरते आहे?

विरोधी उमेदवाराच्या प्रचारसभेत अटल बिहारी वाजपेयी यांना पोहचविण्यासाठी बाबूजींनी मोटार उपलब्ध करून दिल्याची आठवण मी याआधी याच स्तंभात लिहिली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या गोविंदराव बुचकेंची मोटार प्रचारादरम्यान नादुरुस्त झाली, तेव्हाही बाबूजींनी अशीच मदत केली होती. आज एखाद्या नेत्याकडून आपण अशी अपेक्षा करू शकतो का? आज मी किंवा राजेंद्र काँग्रेसमध्ये असलो तरी बाबूजींच्या शिकवणुकीप्रमाणे सर्व पक्षांच्या नेत्यांशी आमचे मधुर संबंध आहेत. सभागृहात चर्चेच्या वेळी विरोधी पक्षाच्या खासदारांशी तिखट मतभेद झाले, तरी काही वेळाने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आम्ही बरोबर चहा घ्यायचो. बाबूजी म्हणायचे, आपल्या विचारांशी पक्के राहा परंतु दुसऱ्याच्या विचारांचाही सन्मान करा. विचारांमधले वेगळेपण नव्या विचारांना जन्म देत असते. म्हणून दुसऱ्याचे ऐकून घेतले पाहिजे. आज कोण दुसऱ्याचे ऐकून घेतो? वेगळे मत मांडणाऱ्याला देशद्रोही ठरविणाऱ्यांची संख्याही कमी नाही.

या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मला बाबूजींकडून ऐकलेला एक प्रसंग आठवला. अटलबिहारी वाजपेयी सभागृहात जवाहरलाल नेहरूंवर जोरदार हल्ले करत. परंतु सेंट्रल हॉलमध्ये भेट झाली, पंडित नेहरू त्यांना न विसरता शाबासकी देत. ‘आपण खूप छान बोललात’ असे म्हणत. वाजपेयीही त्यांचा आदर करत. १९७७ साली परराष्ट्रमंत्री झाल्यानंतर वाजपेयींच्या निदर्शनास आले, की साऊथ ब्लॉकमधली नेहरू यांची तसबीर गायब आहे. त्यांनी तातडीने ती तसबीर होती तिथे परत लागेल, अशी व्यवस्था केली. हा आदरभाव कुठे गेला? या निवडणुकीत झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनी मला फार व्यथित केले. आपला महाराष्ट्र हा असा होता? सर्वच राजकीय पक्षांना माझे आवाहन आहे, की जय-पराजय विसरून परस्परांना सन्मान द्या. 

यवतमाळच्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बाबूजी पराभूत झाले होते. जांबुवंतराव धोटे यांचा एक प्रकारे तो राजकीय उदय होता. धोटे यांच्या विजयाची मिरवणूक गांधी चौकात आली तेव्हा बाबूजींनी तेथे जाऊन धोटे यांना पुष्पहार घातला आणि अभिनंदन केले. महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर आज अशा सौजन्यशील राजकारणाची गरज आहे. ..त्या काळाची फार आठवण येते.

Web Title: Special Editorial - Politics of the 1970s-90s and Current Politics of Maharashtra and India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.