यदु जोशी, सहयोगी संपादक,लोकमत
साडेतीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्याच्या मागील बाजूस एक मोठा मंडप टाकण्यात आला. भाजप-महायुतीच्या राज्यातील विजयाच्या कारणांपैकी हा मंडपही एक कारण आहे. असे काय घडले त्या मंडपात? त्या मंडपात रोज एका मायक्रो ओबीसी समाजाची बैठक व्हायची. त्यात लहान - लहान समाजाच्या राज्यातील विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी यांना आमंत्रित केलेले असायचे. दीडएकशे असे समाजाचे धुरीण तिकडे एकेक करून आले. समोर दोन व्यक्ती बसलेल्या असायच्या, त्या व्यक्ती या समाजांच्या समस्या लिहून घ्यायच्या. ‘आम्ही नक्कीच तुमच्या समाजाच्या हिताचे निर्णय करू’ असे ते दोघे सांगायचे. पुढच्या १५-२० दिवसांत निर्णय व्हायचे, बऱ्याच लहान समाजांच्या कल्याणासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महामंडळांची स्थापना करण्याचा झालेला निर्णय हा त्या मंडपातील चर्चेचा परिपाक होता. यातून मायक्रो ओबीसी समाज भाजप - महायुतीकडे वळविण्याच्या प्रयत्नांना मोठे यश आले.
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. या जातींमध्ये आजवर ज्या जाती अधिक मागासलेल्या राहिल्या त्यांना मागासलेपणानुसार आरक्षण मिळण्याच्या आशा या निर्णयाने पल्लवित झाल्या. उपवर्गीकरणाचे समर्थन भाजप नेहमीच करत आला आहे. या निर्णयाने हिंदू दलित खुश झाले. देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत निवडणूक आचारसंहितेच्या काही तास आधी उपवर्गीकरणासाठी समिती नेमली. त्यामुळे अनुसूचित जातींमधील ५९पैकी ५८ जातींमध्ये भाजप - महायुतीविषयी अनुकूलता निर्माण झाली. या निर्णयाने या ५८ जातींचे कसे भले होणार आहे, हे नियोजनबद्ध पद्धतीने त्या - त्या समाजात पोहोचविले गेले. मात्र, त्याचा गवगवा केला गेला नाही. कारण तसे केले असते तर या निर्णयाच्या विरोधात असलेल्या समाजाने अत्यंत त्वेषाने महाविकास आघाडीला मतदान केले असते. ते टाळले गेले.
आणखी एक अत्यंत महत्त्वाचे, बिगर हिंदू दलितांमधील विशेषत: महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला मते दिली. मुस्लिमबहुल वस्त्यांमधील मतदानाची आकडेवारी घ्या, तिथेही काही अल्प प्रमाणात का होईना पण महायुतीला मते पडली, ती ‘लाडक्या बहिणीं’ची होती. बाकी सर्वच समाजाच्या लाडक्या बहिणी एकनाथभाऊ, देवाभाऊ अन् अजितदादांसाठी धावून गेल्या. ‘देणारा मुख्यमंत्री’ ही शिंदेंची प्रतिमा क्लिक झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी महायुतीच्या विजयात अमूल्य योगदान दिले. मतदाता जागृती मंच, राष्ट्रीय मतदाता मंच, प्रबोधन मंचच्या माध्यमातून थेट भाजपचा प्रचार न करता हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, कटेंगे तो बटेंगे या अंगाने मतदारांना प्रभावित करण्यात आले. ‘आपला’ मतटक्का वाढेल, याची काळजी घेतली गेली. संघ, संघ परिवार एवढे बहुतेकांना माहिती आहे. पण, संघाला अपेक्षित असलेल्या अजेंड्यावर चालणाऱ्या बऱ्याच संस्था, संघटनांचा एक ‘विचार परिवार’ आहे, त्यांचा अत्यंत कल्पकतेने उपयोग करून घेण्यात आला.
ओबीसींच्या जातजनगणनेची राहुल गांधी यांची मागणी घातक आहे. त्यामुळे ओबीसींमधील जातींचा आरक्षणचा टक्का कमी होईल, हा मुद्दा पुढे आणला गेला. धार्मिक वादात हिंदुंच्या मतांचे ध्रुवीकरण व्हावे, यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’चा वापर झालाच पण ओबीसी, मराठा आणि अन्य समाजांनी हिंदुत्त्वावर मतदान करावे, यासाठी तो उपयोगी ठरला. धार्मिकदृष्ट्या प्रभाव असलेल्या संत, महंत, प्रवचनकारांची मोठी फळी बिगर राजकीय पण हिंदुत्त्वाचे महत्त्व गावागावात सांगत होती.
आणखी काही मुद्दे
जरांगे फॅक्टर जोरात असल्याने मराठा समाजाचे अनेक नेते भाजप सोडतील, असे म्हटले जात होते. पण, देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात त्यांनी विश्वास कायम ठेवला. फडणवीस यांनी त्यांना बांधून ठेवले. देवेंद्र फडणवीस यांचा टोकाचा द्वेष केला गेला, त्यातून ते उलट मोठे झाले. त्यांना जातीत अडकवू पाहणाऱ्यांना लोकांनी सडेतोड उत्तर दिले.
भाजपने ए प्लस म्हणजे ‘आपले’ बूथ सोडून बी आणि सी कॅटेगिरीच्या बूथवरच लक्ष केंद्रित केले. तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात नेत्यांची फौज उतरविण्यात आली. काहीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे प्रभारी असलेले सी. टी. रवी फक्त पश्चिम महाराष्ट्र बघत होते, अख्ख्या पश्चिम बंगालचे प्रभारी राहिलेले कैलाश विजयवर्गीय नागपूर आणि आसपासचे मतदारसंघ बघत होते, यावरून किती ताकदवान नेत्यांना दोन - अडीच महिन्यांपासून मैदानात उतरविले होते ते लक्षात येईल. भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे दोन दिग्गज केंद्रीय मंत्री सगळी सूत्रे येथेच तळ ठोकून हलवत होते.
महाविकास आघाडी लोकसभेच्या विजयाच्या उन्मादात राहिली. २१ जिल्ह्यांमधून काँग्रेस शून्य झाली. लोकसभेचे नरेटिव्ह फेल झाले. शरद पवार यांचे जे १० आमदार जिंकले, त्यातले फक्त त्यांच्या प्रभावामुळे किती जिंकले? मोहिते - पाटील यांच्या प्रभावपट्ट्यात जिंकलेल्या जागा, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील यांचे जिंकण्याचे श्रेय त्यांचे की शरद पवारांचे, याचे उत्तर बघितले तर ‘शरद पवारांना महाराष्ट्राने नाकारले’ हेच समोर येते.
विदर्भात डीएमके दलित - मुस्लिम - कुणबी फॉर्म्युला मविआच्या बाजूला होता. यावेळी बहुजन समाजाने ‘विदर्भाचे भले व्हायचे असेल आणि होत असलेला विकास पुढे न्यायचा तर देवेंद्र फडणवीसच पाहिजेत’, हा विचार करून मतदान केले.