- डॉ. गोविंद काळे‘नंदनवन’ पंचाक्षरी शब्द़ या शब्दाचे कुतूहल अजूनही संपलेले नाही. काश्मीर भारताचे नंदनवन आहे हे शालेय जीवनात अनेक शिक्षकांनी ऐकवलेले वाक्य़ सौंदर्याची परिसीमा म्हणजे नंदनवन असे एका विद्वानाने बालपणी ऐकवले होते़ सीमा कळण्याचे वय नव्हते तेव्हा परिसीमा कशी कळणार? तरुण वयात आमच्या एका मित्राने महाराष्ट्राच्या क्रिकेट टीममध्ये आपले सिलेक्शन होणार असल्याचे ऐकवले तेव्हा सर्वांनी हा तर मूर्खाच्या नंदनवनात वावरतो आहे, असे म्हटले़ मूर्खांचेही नंदनवन असते तर? शेजारच्या पाटील काकांनी जुना वाडा नेस्तनाबूत करून भला मोठा बंगला, सर्व सुखसोयींनी सुसज्ज असा बांधला़ चार मुलांसाठी चार स्वतंत्र खोल्या़ ऐश्वर्याचे प्रदर्शन तर बंगल्यात जागोजागी़ बंगल्याचे नाव होते नंदनवन. पाटीलसाहेब फार भाग्यवान माणूस असे सारेच गाववाले म्हणत़ पुढे मुलांची लग्ने झाली, सुना आल्या़ कधी न बोलणारे शांत नंदनवन बडबडू लागले़ रोज सुनांचे भांडणतंटे़ गावभर बभ्रा झाला. पाटील साहेबांनी तर धसकाच घेतला. त्यातच त्यांचे देहावसान झाले. नंदनवनाचे सारे गणित चुकले. आयुष्यातील गणिते चुकण्यासाठीच असतात तर?आद्य शंकराचार्यांनी नंदनवनचे गणित कायमचेच सोडवून टाकल्याचा प्रत्यय आला.‘संपूर्णं जगदेव नन्दनवनं सर्वेऽपि कल्पद्रुमागांगं वारि समस्तवारिनिवह: पुण्या: समस्ता: क्रिया:।वाच: प्राकृत संस्कृता: श्रुतिशिरो वाराणसी मेदिनीसर्वावस्थितरस्य वस्तुविषया दृष्टे परब्रह्मणि॥ज्याला परब्रह्मरूपाचा साक्षात्कार झाला त्याला सर्व जगच नंदनवनासारखे दिसते़ सर्वच वृक्ष कल्पवृक्षासारखे होतात. जगातील सारे जलाशय त्याला गंगोदक बनतात व त्याची सर्व कर्मे ही पुण्यकारकच होतात़ त्याचे बोलणे संस्कृत असो अथवा प्राकृत, ते उपनिषदांसारखे बोधप्रद असते़ संपूर्ण पृथ्वी ही त्याची वाराणसी म्हणजे मुक्तिक्षेत्र असते व तो कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याची ती अवस्था समाधिस्थिती अथवा ब्रह्मस्वरूपी एकरूप होऊन राहणेच होय.आचार्यांची ही प्रचिती सामान्य जीवाला कशी आणि कधी येणार? कोणते मठ आणि पीठ हा अद्वैताचा साक्षात्कार घडविणार? तरुणाईला हा नंदनवनाचा अर्थ आकलनात आला तर विश्वकल्याण दूर नाही. क्षणाक्षणाला कालबाह्य होणाऱ्या असंख्य गोष्टींचे निरुपायाने का होईना आपण मूक साक्षीदार असतो. संस्कारी बालवयात हा श्लोक भेटला तर जगाकडे बघण्याची दृष्टी आमूलाग्र बदलून जाईल. आचार्य भटाब्राह्मणांचे, छत्रपती मराठ्यांचे, फुले माळ्यांचे आणि आंबेडकर दलितांचे हे सवतेसुभे जन्मालाच आले नसते. प्रश्न आहे तो पण परंतुचा. विश्वाचे नंदनवन ह्या कल्पनेलाच मनोभावे नमस्कार.
अध्यात्म - नंदनवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:13 AM