भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने एक नवाच विक्रम नोंदविला आहे. त्याने सलग तीन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात धडक मारली. सिंगापूर ओपनमध्ये त्याने अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावले. त्यानंतर इंडोनेशिया ओपनच्या अंतिम सामन्यात पोहोचून तो जिंकला. आता रविवारी (दि. २५) आॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये त्याने आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता चेन लॉग याचा सरळ सेटमध्ये पराभव करीत हा विक्रम नोंदविला आहे. अत्यंत वेगवान खेळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या इनडोअर क्रीडाप्रकारात सातत्य टिकविण्याचे मोठे आव्हान असते. त्यामुळेच जगभरात चालणाऱ्या चॅम्पियन्स स्पर्धेच्या सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारण्याचा विक्रम महत्त्वपूर्ण ठरतो. जगभरातील केवळ पाचच खेळाडूंनी हा विक्रम आजवर केला आहे. त्यात किदाम्बी श्रीकांत याचा समावेश झाला आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची पूर्वी फार मोठी कामगिरी नव्हती. मात्र अलीकडच्या काळात या क्रीडाप्रकारात अनेक चमकते तारे उदयास येत आहेत. आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन्स स्पर्धा जिंकणारा श्रीकांत हा पहिलाच भारतीय पुरुष खेळाडू आहे. यापूर्वी हा विक्रम भारताची आघाडीची महिला खेळाडू सायना नेहवाल हिने केला आहे. सायनाने ही स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. श्रीकांत याने आणखी एक विक्रम केला आहे. त्याने आजवर चार स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामध्ये चायना ओपन, इंडिया, इंडोनेशिया आणि आता आॅस्ट्रेलियन ओपन या स्पर्धांचा समावेश आहे. तेवीस वर्षीय श्रीकांत याचा रविवारच्या अंतिम सामन्यातील खेळ फारच बिनचूक होता. त्याची पहिली सर्व्हिस शॉर्ट पडली आणि पहिल्या घासाला खडा लागावा असे वाटले; पण संपूर्ण सामन्यात त्याने अशा प्रकारची एकही चूक केली नाही. दोन्ही सरळ सेट जिंकताना संपूर्ण सामन्यावर त्याची पकड होती. तो अत्यंत दमदार खेळ करीत होता. भारतीय तरुणांना योग्य प्रशिक्षण आणि जागतिक स्पर्धांना तोंड देण्याचे धैर्य दिले तर ते किती उत्तम खेळ करू शकतात, याचीच ही प्रचिती आहे. सायना नेहवाल किंवा पी. व्ही. सिंधू यांचा खेळ पाहताना जसा आत्मविश्वास दिसतो, तसाच किंबहुना अधिक दमदार खेळ करण्यातील आत्मविश्वास श्रीकांत याचा अंतिम सामना पाहताना पदोपदी जाणवत होता. त्याचे अभिनंदन जरूर करायला हवेच; त्याचबरोबर त्याच्याकडून अधिक अपेक्षाही ठेवायला हरकत नाही; कारण श्रीकांत याचा एक ‘सुपर’ दबदबा आता निर्माण झाला आहे.
श्रीकांतचा ‘सुपर’ दबदबा
By admin | Published: June 27, 2017 12:41 AM