शरीर, मन आणि बुद्धी यावरचं नियंत्रण सुटलं की एखादी व्यक्ती कशी वागू-लिहू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा ‘डोळे दीपवून टाकणारे श्रीश्रींचे जनसंपर्क प्रदर्शन’ हा लेख! (लोकमत दिनांक १८ मार्च) केंद्रीय मंत्रिमंडळातील अर्धा डझन मंत्री आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोध विसरून यमुनातीरावर एकत्र आले, ही या लेखाची सुरुवात आहे. मुळात जगातील लोकांनी आपापसातील वाद, संघर्ष, भांडणं आणि विरोध विसरून एकत्र यावे आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना साथ द्यावी, हीच तर आर्ट आॅफ लिव्हिंगची व सांस्कृतिक महोत्सव आयोजनामागची भूमिका आहे. महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले व समारोप राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाला. त्यामुळे ‘या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दांडगा जनसंपर्क बाळगणारे मोठे स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी अधोरेखित केले आहे’, असे श्री. सरदेसाई यांचे म्हणणे आहे. वस्तुत: ज्या जागतिक महोत्सवाला जगातील १५५ देशांतील कलाकार, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, बॅँकींग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी तीन दिवस उपस्थिती दर्शवितात यात श्रीश्रींच्या ठायी असलेली अध्यात्मिक ताकद अधोरेखित होते, जनसंपर्क नव्हे! दुसरा मुद्दा स्वयंघोषितपणाचा. जेव्हा जगातील अमेरिका, रशिया, चीन, जपान, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सुरिनाम, नेपाळ यासारख्या देशातील करोडो जनता श्रीश्रींना अध्यात्मिक गुरू मानते, ‘यूएसए’सारखा देश आपला नवा ध्वज गुरूजींना सन्मानाप्रित्यर्थ भेट म्हणून देतो तेव्हा अध्यात्मिक गुरू हे संबोधन त्यामध्ये अनुस्यूतच असते.या महोत्सवाचे आयोजन ‘डोळे दीपवून टाकणारेच’ असायला हवे होते. दुसरे म्हणजे अशा प्रकारचे आयोजन, जे आजपर्यंत कोणत्याही देशात झाले नाही, ते आपल्या देशात होऊ शकते, असा एक संदेशही जगाच्या पातळीवर गेला. जागतिक दर्जाचा हा कार्यक्रम डोळे दीपवून टाकणारा न करता अगदीच साधासुधा व्हायला हवा होता आणि त्यात गडबड गोंधळ झाला असता म्हणजे ‘सगळं छान झालं असतं’, असंच सरदेसाई यांना अपेक्षित होते की काय न कळे !राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला निर्णय आणि त्याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त यात विसंगती होती. लवादाने पाच कोटींची रक्कम ‘दंड’ म्हणून नव्हे, तर यमुना नदीच्या स्वच्छताकामी वापरावी, असा आदेश दिला होता व तो गुरूजींना मान्य होता. एखाद्या कार्यक्रमासाठी जेव्हां जागतिक दर्जाचे अनेक नेते उपस्थित राहणार असतात, तेव्हां शेवटच्या क्षणी तो रद्द करणे अतोनात त्रासदायक ठरु शकते आणि ज्या जागतिक शांततेसाठी आणि ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश जगात पोहोचविण्यासाठी हा महोत्सव होत होता, त्याच देशात ही राजकारण प्रेरीत अशांतता निर्माण होणे हे जगाच्या पातळीवर भारताच्या प्रतिमेला छेद देणारे नव्हते का? आपण कारागृहात जाणे पसंत करू, असे गुरूजींनी म्हणणे हा कोडगेपणा कसा आणि या वक्तव्याची तुलना दुसऱ्या गुन्ह्यातील दंड न भरणाऱ्या नागरिकांशी करणे हा सरदेसाई यांच्या मनाचा कोतेपणा नाही का?राजकारण हे समाजाच्या विविध क्षेत्रांसाठी सर्वस्पर्शी असायलाच हवे. त्यामुळे श्रीश्री इतकी वर्षे निर्माण करून ठेवलेल्या राजकीय संबंधांचा फायदा करून घेताना दिसत आहेत, असे म्हणणे तद्दन गैरलागू आहे. ‘या कार्यक्रमाचे थेट प्रसारण १५० देशांमध्ये झाले, याचा अर्थ भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध वाढत आहेत’, असा काढायचा आणि त्याचे श्रेय श्रीश्रींना देताना मात्र ‘वैचारिक दरिद्रता’ दाखवायची हा विरोधाभास म्हणायला हवा.या महोत्सवातून ‘सौम्य हिंदू शक्तीचा’ उदय होत असल्याचे सरदेसाई यांना जाणवले, हा आणखी एक विनोद! मुळात कोणतीही जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाकडे पाहाण्याची शिकवण गुरूजींनी दिली आहे व त्यामुळेच आखातातील शेख, पाकिस्तानातील ८० कलाकार, मौलवी या कार्यक्रमाला उपस्थित होते. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविला जाऊ शकेल असा कार्यक्रम एकहाती आयोजित करायचा असेल तर त्याला ‘अध्यात्मिक बळ’ असावंच लागतं. या पार्श्वभूमीवर श्रीश्री ‘बेन्टलेत’ बसून मुलाखती देतात, पहिल्या वर्गाने प्रवास करतात की ‘आलिशान आश्रमा’त राहतात हे मुद्दे चर्चेचे होऊच शकत नाहीत. सामान्य राहिले म्हणजे तीच माणसं सत्य, खरी आणि प्रामाणिक असं जर सरदेसाई यांचं संशोधन असेल, तर मग मात्र त्यांच्या विचारांचं कौतुक करावं, तितकं थोडंच !‘एखादा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठ्या बुद्धिमत्तेची आवश्यकता भासत नाही’, हे सरदेसाई यांचे म्हणणे म्हणजे त्यांच्याच बुद्धीची दिवाळखोरी म्हणावी लागेल. सरकारने अध्यात्मिक मित्रांवर कृपा का करावी आणि त्यांना विशेष सोयी-सुविधा का पुरवाव्यात, असा प्रश्न जर सरदेसाई यांना पडला असेल तर मग सरकारने नेमके काय करावे? देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांना सोयी-सुविधा द्याव्यात की, समाजात फूट पाडणाऱ्या आणि अशांतता पसरविणाऱ्यांवर कृपा करावी? - संतोष कापडणेमहाराष्ट्र समन्वयकआर्ट आॅफ लिव्हिंग ब्युरो आॅफ कम्युनिकेशन्स
श्रीश्रींची ‘अध्यात्मिक’ ताकद अधोरेखित झाली!
By admin | Published: March 22, 2016 2:57 AM