- अनिल गुंजाळ
''हात हातात घेऊनी दहा हिरे, जरा आहा आरशाकडे,
अकरावा दिसेल कोहिनूर, जरा पाहा स्वत:कडे ''
मार्च-एप्रिल २०२२ मधील माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) म्हणजे शालेय शिक्षणातील पहिला टप्पा होय. यावर्षी सुमारे २३ हजार शाळांमधील १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून, एकूण ९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी खूप आहे. परंतु, मुलांना मिळालेले गुण कमी आहेत. पुढील काही दिवसांत दहावीचा निकाल लागेल. या निकालाची पालक विद्यार्थी उत्सुकतेने आनंदाने, तर काहीशा तणावात वाट पाहात आहेत. दहावीची परीक्षा म्हणजे सर्वस्व नसून, मुलांमधील जन्मजात गुण, दहावीला मिळालेले टक्के याचा विचार करून मुलांचे पुढील भविष्य उज्ज्वल करावे. यासाठी पालक, शिक्षक, समुपदेशक या सर्वांनी विद्यार्थ्यांना मदत करणे गरजेचे आहे.
दहावीची परीक्षा ६०० गुणांची आहे. मुलांचा निकाल बेस्ट ऑफ फाईव्ह अर्थात पाच विषयांच्या सर्वोत्तम गुणांचा विचार करून त्यांची निकालाची टक्केवारी जाहीर केली जाते. दहावीचा ऑनलाईन निकाल मिळाल्यानंतर पालकांनी मुलांवर चिडू नये, एवढेच कमी का जास्त का नाही, अभ्यास का केला नाही, असे प्रश्न विचारू नये. निकालाचा सकारात्मकतेने स्वीकार करावा, मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आपणास याबाबत काही शंका असल्यास उत्तरपत्रिकांची छायाप्रत घेता येते. तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येतो व आपल्या शंकांचे निरसन करून घेता येते.
मुलांच्या निकालाची तुलना करू नका
प्रत्येक मुलाची क्षमता, विषयांची आवड, त्यामधील गती वेगवेगळी असते. तसेच परीक्षेच्या कालावधीमधील वर्षे, घरातील ताण, केलेला अभ्यास, परीक्षा काळातील प्रसंग, मुलांची मानसिक स्थिती, घरातील वातावरण याचा परिणाम अभ्यासावर होऊन निकालातील गुण कमी-जास्त होऊ शकतात. त्यामुळे पालकांनी व स्वतः मुलांनी आपल्या निकालाची नातेवाईकांच्या व मित्र-मैत्रिणींच्या निकालाची तुलना करू नये.
अनुत्तीर्ण ही संधी समजून मुलांना प्रेरणा देणे....
दहावीच्या निकालात चार ते पाच टक्के विद्यार्थी विविध कारणांमुळे अनुत्तीर्ण होतात, याचा अर्थ ते हुशार नाहीत, त्यांना काही येत नाही, असा होत नाही. विद्यार्थी आजारी असेल, मनस्थिती योग्य नसेल, अंतर्गत गुणांच्या परीक्षा द्यायच्या राहिल्या असतील किंवा एखाद्या विषयातील संकल्पना समजल्या नसतील विशेषत: इंग्रजी किंवा गणित विषय येत नसतील, तर विद्यार्थी या विषयात अनुत्तीर्ण होऊ शकतो. पण, परंतु मुलांनी निराश न होता या निकालाचा स्वीकार करून पुन्हा जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.
दहावीनंतर शाखा प्रवेश व करिअरच्या संधी
पालक व विद्यार्थी मित्रांनो, करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. अनेक विद्याशाखांमध्ये प्रवेश घेता येतो. दहावीच्या परीक्षेचा निकाल तुमची आवड, शारीरिक क्षमता, तुमचे छंद, आर्थिक परिस्थिती याचा विचार करून तुम्ही शाखा निवडल्यास यशस्वी होणारच, याची खात्री बाळगणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांसह दहावीनंतर डिप्लोमा इंजिनिअरिंग, आयटीआय सर्टिफिकेट कोर्सेस, आरोग्य व तंत्रज्ञानामधील विविध अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्हाला स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडता येते. दहावीच्या मार्कांकडे न पाहता वैयक्तिक गुणांकडे पाहिल्यास आयुष्यातील चांगले करिअर निवडणे शक्य आहे. त्यामुळे करिअर उत्तम होते आणि आयुष्य आनंदी होण्यास मदत होते.
(लेखक - माजी सहाय्यक आयुक्त, परीक्षा परिषद, पुणे)