शठे शाठ्यं समाचरेत्!
By रवी टाले | Published: June 14, 2019 10:00 PM
दुसºयांदा राज्यशकट सांभाळल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानसंदर्भात संकेत देत आहेत. सर्वप्रथम शपथविधी समारंभात ‘सार्क’ऐवजी, ‘बिमस्टेक’च्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना ...
दुसºयांदा राज्यशकट सांभाळल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने पाकिस्तानसंदर्भात संकेत देत आहेत. सर्वप्रथम शपथविधी समारंभात ‘सार्क’ऐवजी, ‘बिमस्टेक’च्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांना निमंत्रित करून त्यांनी पहिला संकेत दिला होता. पाकिस्तान ‘सार्क’चा सदस्य आहे; मात्र ‘बिमस्टेक’चा सदस्य नाही. पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि मालदिव वगळता सार्कचे उर्वरित सर्व सदस्य ‘बिमस्टेक’चेही सदस्य आहेत. अशा प्रकारे शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधी समारंभासाठी आमंत्रण देण्याचा स्वत:च पाडलेला पायंडा निभवतानाच, पाकिस्तानला खड्यासारखे वगळून, मोदींना त्यांना जो संदेश द्यायचा होता तो अगदी व्यवस्थित दिला. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी, नरेंद्र मोदी यांचे निवडणुकीतील विजयासाठी अभिनंदन करण्यासाठी, दूरध्वनीद्वारा संपर्क केला असतानाही, दहशतवाद आणि वाटाघाटी एकाच वेळी शक्य नसल्याचे स्पष्ट करून मोदींनी पाकिस्तानला योग्य तो संदेश दिला होता. त्यानंतर शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच एससीओच्या शिखर परिषदेस उपस्थित राहण्यासाठी किरगिझस्तानची राजधानी बिश्केकला जाण्यासाठी पाकिस्तानने आपला हवाई मार्ग खुला केल्यावरही, वळसा घेऊन जाणे पसंत करून, मोदींनी पाकिस्तानला आणखी एक मोठा संकेत दिला. एससीओ शिखर परिषदेच्या उद्घाटन समारोहात तर त्यांनी इम्रान खान यांच्याकडे असे काही दुर्लक्ष केले की जणू इम्रान खान तिथे उपस्थितच नाहीत!मोदी दुसºयांदा पंतप्रधान पदावर आरुढ झाल्यापासून पाकिस्तान भारताशी वाटाघाटी सुरू करण्यासाठी जणू काही तडफडत आहे. मोदींनी मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादास आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत वाटाघाटी सुरू होणार नाहीत, अशी ठाम भूमिका घेतली आहे. एससीओ शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला, पाकिस्तानचा खास मित्र असलेल्या चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यानही मोदींनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला. भारत आणि पाकिस्तानदरम्यान कटू प्रसंग निर्माण होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. भूतकाळात अनेकदा असे प्रसंग उद्भवले होते. चारदा उभय देश रणभूमीवरही एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यापैकी १९७१ च्या युद्धात तर पाकिस्तानची शकलेही झाली; परंतु प्रत्येक कटू प्रसंगानंतर उभय देश वाटाघाटींच्या मेजावर आले. त्याचा भारताला काहीही लाभ झाला नाही. यावेळी मात्र भारत अत्यंत ठाम आहे. त्यामागचे कारण सुस्पष्ट आहे. पाकिस्तान सध्या भयंकर आर्थिक संकटात सापडला आहे. हाती भीकेचा कटोरा घेऊन दारोदार फिरण्याची वेळ पाकिस्तानवर आली आहे; मात्र चीन आणि काही प्रमाणात सौदी अरेबिया व संयुक्त अरब अमिराती वगळता इतर एकही देश पाकिस्तानच्या मदतीला येण्यास तयार नाही. त्यातही चीन निव्वळ स्वार्थ डोळ्यासमोर ठेवूनच मदत करतो. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मदतीसाठी अत्यंत कठोर अटी लादल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या मासोळीसारखी झाली आहे. पाकिस्तानला ठेचण्याची हीच उत्तम संधी आहे. पाकिस्तानात सध्या महागाई प्रचंड वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे प्रचंड वेगाने अवमूल्यन होत आहे. विदेशी गुंतवणूक ठप्प झाली आहे. उत्पन्नाचे सर्वच स्रोत आटले आहेत. विदेशी चलनाच्या गंगाजळीने तळ गाठला आहे. अवघे सात अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन पाकिस्तानकडे शिल्लक आहे. एवढी रक्कम तर भारतात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत खर्ची पडली. पाकिस्तानपासून विलग झालेल्या बांगलादेशाकडेही आज ३३ अब्ज डॉलर्सचा विदेशी चलन साठा आहे. परिस्थिती एवढी बिकट झाली आहे, की पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानी लष्करावर स्वत:च्या अर्थसंकल्पात कपात करण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर आर्थिक मदतरूपी प्राणवायू न मिळाल्यास पाकिस्तानात बंडाळी उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीत भारताने शेजारधर्म पाळून पाकिस्तानला मदत करायला हवी, अशी भूमिका भारतातील काही विद्वान मांडत आहेत; मात्र शत्रू अडचणीत असतानाच त्याचा काटा काढायला हवा, असे शास्त्र सांगते. दानवीर कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतून बसलेले असतानाच त्याच्यावर हल्ला चढविण्यास साक्षात भगवान श्रीकृष्णानेच अर्जुनाला सांगितले होते. सापाला कितीही दूध पाजले तरी तो दंश करतोच! भारताने पाकिस्तानरूपी सापास दूध जरी नव्हे तरी गेली ७० वर्षे स्वत:च्या हिश्शाचे पाणी पाजले आहे. त्यानंतरही तो सतत भारतास दंश करत असतोच! स्थिर आणि मजबूत शेजारी कोणत्याही देशाच्या विकासासाठी पुरक ठरतो, हे खरे आहे; मात्र भारताचा हा शेजारी ७० वर्षात कधी स्वत: तर स्थिर झालाच नाही, उलट भारतात अस्थैर्य माजविण्याचेच त्याचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यामुळे मजबूत नव्हे, तर मजबूर पाकिस्तानच भारताच्या हिताचा आहे, याची खुणगाठ आपण आता तरी बांधली पाहिजे. बांगलादेशच्या निर्मितीपूर्वी भारतीय लष्कराला पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही आघाड्यांवर सजग रहावे लागत असे. बांगलादेश निर्मितीनंतर भारताची पूर्व आघाडीवरील डोकेदुखी जवळपास संपुष्टात आली. आजही पाकिस्तानातील बलुचीस्तान, सिंध आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांमधील बहुसंख्य लोकांना स्वातंत्र्य हवे आहे. आर्थिकदृष्ट्या कोलमडलेला पाकिस्तान जर अजूनही काश्मीर व पंजाबमधील फुटीरतावाद्यांना मदत करत असेल, काश्मिरात दहशतवाद प्रायोजित करीत असेल, तर जगातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी पाकिस्तानातील फुटीरतावाद्यांना मदत करणे शक्य नाही का? ‘शठे शाठ्यं समाचरेत्’ (जशास तसे) ही विदूरनीती आहे. पाकिस्तान हा देश निव्वळ भारतद्वेष या एकमेव भूमिकेतून जन्माला आला आहे. त्या भूमिकेस सोडचिठ्ठी दिल्यास त्या देशाचे अस्तित्वच धोक्यात येईल, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज पाकिस्तान वाटाघाटींसाठी कितीही विनवणी करीत असला तरी, उद्या परिस्थितीत जराशी सुधारणा होताच, तो फणा काढायला अजिबात मागेपुढे बघणार नाही. त्यामुळे संधी आहे तर त्याचा फणा ठेचणे हेच धोरण योग्य ठरते. सुदैवाने मोदी सरकारची वाटचाल त्याच दिशेने होताना दिसत आहे.पाकिस्तानला वाटाघाटी सुरू करण्याची फारच घाई झाली आहे असे दिसते. त्यामुळे भारताने आपल्या अटींवर वाटाघाटीची तयारी दर्शवली पाहिजे. पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण छावण्या बंद करण्यासोबतच, दाऊद इब्राहीम, हाफिज सईद आणि मसूद अजहरसारख्या दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करणे, ही वाटाघाटींसाठीची प्राथमिक अट असली पाहिजे. पाकिस्तानची वाटाघाटींची इच्छा कितपत प्रामाणिक आहे, हे त्यावरून स्पष्ट होईल. जर पाकिस्तान त्यासाठी तयार होणार नसेल तर वाटाघाटींना काही अर्थ नाही. त्या परिस्थितीत ‘शठे शाठ्यं समाचरेत्’ या नीतीचा अवलंब करून पाकिस्तानला अधिकाधिक कमजोर करणे हीच भारताची प्राथमिकता असायला हवी!