- किरण अग्रवाल
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेत्यांना सत्तेत सोबती म्हणून घेतानाच भाजपने स्व पक्षातील स्थानिक नेतृत्वाचा खांदेपालट करून आगामी निवडणुकांच्यादृष्टीने जणू आपल्या घराची शाकारणी केली आहे. या नवीन सोबत्यांशी ठीकठिकाणी जुळवून घेत पक्ष पुढे न्यायचे आव्हान म्हणावे तितके सोपे नाही. एकीकडे पावसामुळे खरीप हंगामाची लगबग जोरात असताना, दुसरीकडे भाजपनेही स्थानिक महानगर व जिल्हा पातळीवरील संघटनात्मक नेतृत्व बदल करून आगामी निवडणुकांच्या मशागतीस प्रारंभ करून दिला आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर गेल्या वर्षभरात शिंदे व ठाकरे गटांचे पदाधिकारी नेमले गेले होते, त्यानंतर अलीकडेच राष्ट्रवादीतही दुभंग झाल्याने आणखी काही नवीन पदाधिकाऱ्यांची भर पडली आहे. अशात आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता भाजपनेही राज्यातील स्थानिक पातळीवरील संघटनात्मक नेतृत्वात बदल केले आहेत. यात नवीन नेतृत्वास संधी देण्याची भूमिका तर आहेच, शिवाय सर्वसमावेशक राजकारणाचे व संभाव्य उमेदवारांना त्यांच्या तयारीसाठी ''मोकळे'' करून देण्याचे संकेतही आहेत.
पश्चिम वऱ्हाडाच्याच बाबतीत बोलायचे तर, उद्याच्या विधानसभा निवडणुकीतील संभाव्य उमेदवार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे, अशा काही जणांना संपूर्ण जिल्ह्याच्या पक्ष संघटनात्मक जबाबदारीतुन काहीशी मोकळीक देत आपापल्या मतदारसंघांवर फोकस करण्याचा मार्ग नवीन निवडीतून मोकळा करून देण्यात आला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. आ. रणधीर सावरकर, आ. आकाश फुंडकर, आ. राजेंद्र पाटणी, विजय अग्रवाल अशी नावे यासंदर्भात चटकन नजरेत भरणारी आहेत.
अकोल्यातील आ. सावरकर यांच्याकडे दुसऱ्यांदा प्रदेशच्या चिटणीसपदाची जबाबदारी आल्याने स्थानिक जिल्हाध्यक्षपदासाठी शोध होताच, पण सोबत महानगराध्यक्षपदाचा खांदेपालटही केला गेल्याने विजय अग्रवाल यांच्या आगामी उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचा अर्थ निघणे गैर ठरू नये. दुसरे म्हणजे, जिल्हाध्यक्षपदी किशोर मांगटे पाटील व महानगर प्रमुखपदी जयंत मसणे यांची नियुक्ती करून ''सोशल बॅलन्स''ही साधला गेला आहे, जो जिल्ह्यातील राजकीय समीकरणांसाठी गरजेचा मानला जातो. पाटील यांनी यापूर्वी महानगरप्रमुख पद सांभाळलेले आहे, तर मसणे यांच्या सौ.नी महापौरपद भूषविलेले असल्याने त्या संपर्कातुनही पक्ष विस्ताराला मदतच होणे अपेक्षित आहे, मात्र काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीत एकमेकांना टाळी देण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता त्या संभाव्य समीकरणात भाजपचे प्राबल्य टिकवून ठेवणे मोठे कसरतीचेच ठरणार आहे.
राज्यातील तीन मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या बुलढाण्यात प्रथमच घाटाखाली व घाटावर असे दोन जिल्हाध्यक्ष दिले गेले आहेत. धक्कातंत्राचा वापर करत सचिन देशमुख (खामगाव) आणि डॉ. गणेश मान्टे (देऊळगाव राजा) या नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस म्हणून दोघांना मोठा अनुभव आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांचे धक्कातंत्र असले तरी संघटनात्मक मजबुतीच्या दृष्टीने हा बदल पक्षासाठी लाभदायीच ठरण्याचे अंदाज आहेत. पुर्वाश्रमीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी संघटनात्मक बांधणी तथा बुथ लेव्हलवर केलेले काम वाखणण्याजोगे आहे. त्यातच केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी या जिल्ह्यात लक्ष घातलेले असल्याने केंद्र सरकारची कामे सामान्यांपर्यंत पाेहोचविण्याचे प्रयत्न करावे लागतील. जिल्ह्यात सात पैकी तीन आमदार भाजपचे आहेत. 11 नगरपालिकांमध्ये सुमारे 75 नगरसेवक, तर जिल्हा परिषदेत दोन डझन संख्याबळ आहे. यामुळे भाजपचे संघटन जिल्ह्यात मजबूत आहे. जिल्ह्यातील खासदारकी व दोन आमदार शिवसेना शिंदे गटाचे असल्याने या अलीकडील स्वकियांशी जुळवून घेत जिल्ह्यात भाजप शिखरावर न्यायचा तर ते तसे सोपे नाही. दोन्ही जिल्हाध्यक्षांना त्यासाठी कसरतच करावी लागणार आहे.
वाशिम या आदिवासी व बंजारा बहुल जिल्ह्यातही भाजपाचे बऱ्यापैकी वर्चस्व आहे. अलीकडेच माजी खासदार काँग्रेसचे अनंतराव देशमुख भाजपात आल्याने या वर्चस्वात भर पडली म्हणायचे. जिल्हयातील तीन पैकी दाेन विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या हाती असून, जिल्हा परिषदेमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्वाधिक १३ जागा आहेत. त्यामुळे नव्यानेच नियुक्ती झालेल्या जिल्हाध्यक्ष श्याम बढे यांना त्यांच्या जनसंपर्काच्या बळावर त्यांचे गृहकुल असलेल्या मालेगाव- रिसोड मतदारसंघावर लक्ष देण्याबरोबरच अधिक पुढची मजल गाठून दाखवावी लागणार आहे. सुरेश लुंगे, नरेंद्र गाेलेच्छा, सुधाकर परळकर व आ. राजेंद्र पाटणी यांनी आतापर्यंत जबाबदारी सांभाळून पक्ष वाढविला, आता बढे यांना निष्ठेच्या बळावर ती संधी लाभली आहे. जिल्हा परिषदेतील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्याकडून विशेषता ग्रामीण भागात विस्ताराची अपेक्षा पक्षाला असावी. जवळपास ६ वर्ष जिल्हाध्यक्षपद भूषविलेले आ. पाटणी यांनी लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी सांभाळतानाच संघटनात्मक धाेरण उत्तमपणे राबविले. नवीन लोक पक्षाशी जोडलेत. त्यामुळे जिल्हयातील पक्षाचे संघटन मजबूत असून बढे यांना ते टिकवून ठेवण्याची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.
सारांशात, भाजपने नवीन जिल्हाध्यक्ष व महानगरप्रमुख नेमून आगामी निवडणुकांची तयारी सुरू करून दिली असून, या नवीन पदाधिकाऱ्यांपुढे निवडणुकीतील यशाच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करून स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे.