झिरपणे हा जसा पाण्याचा, विचारांचा गुणधर्म, तसा तो सत्तेचाही असतो. सत्ताही झिरपते तशी ती खालून वर अशी शिडीदेखील चढते, तर यावेळी मराठवाड्यातील तीन जिल्हा सहकारी बँकांच्या निवडणुकीत ती झिरपली. जे मुंबईमध्ये तेच या तिन्ही ठिकाणी घडले. फरक इतकाच की या तिन्ही बँकांच्या निवडणुकांचा बाज वेगळा असला तरी सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली.
भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव ही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. विशेष म्हणजे शिवसेना- राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पॅनलप्रमुख बागडे होते. या दोन्ही पक्षांचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे मंत्री आणि सतीश चव्हाण आणि अंबादास दानवे हे दोन आमदार निवडून आले; परंतु पॅनलचे नेतृत्व करणारे हरिभाऊ बागडे यांचा पराभव झाला. पॅनलचा विजय अपेक्षित असला तरी बागडेंचा पराभव अनपेक्षित आहे. त्यामुळे एका अर्थाने बँकांवर सेनेचे वर्चस्व असल्याचे म्हणावे लागेल. बागडेंच्या पराभवामुळे जिल्हा बँकेच्या राजकारणात अब्दुल सत्तार व्यापणार, हे स्पष्टच आहे. सतीश चव्हाण यांना या राजकारणात स्वारस्य नाही आणि अंबादास दानवे पुढील लोकसभा निवडणुकीवर नजर ठेवत येथे खेळी खेळणार. संदीपान भुमरे यांचे व्यक्तिमत्त्व संयत राजकारणाचे राहिलेले असल्याने अप्रत्यक्षपणे बँकेचा रिमोट सत्तार यांच्या हाती पडण्याची शक्यता आहे.
सगळे निवडून येताना फक्त बागडेंचाच पराभव का होतो, हा कळीचा प्रश्न; पण त्यावर कोणी बोलायला तयार नाही. बँक आणि जिल्ह्याच्या राजकारणात बागडे हे वजनदार समजले जातात. ते निवडून आले असते, तर नियंत्रण आपसूक त्यांच्याकडेच राहणार होते. कारण सुरेश पाटलांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्याकडे अध्यक्षपद देण्यात आणि निवडणुकीपूर्वीच नितीन यांनाच भावी अध्यक्ष म्हणून घोषित करणारे बागडेच होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना पॅनलमधूनच दगाफटका झाला का, अशी शंका पुढे येते. ज्या बिगर शेती मतदारसंघात ते पराभूत झाले, त्यात त्यांना सर्वांत कमी मते मिळाली. अविनाश देशमुख, अभिषेक जैस्वाल हे त्यांच्यापुढे नवखे; पण त्यांना जास्त मते मिळाली. या गोष्टी पचणी पडणाऱ्या नाहीत. राजकारणातील त्यांचे परंपरागत विरोधक काँग्रेसचे माजी आ. कल्याण काळे यांनी मात्र येथे शक्तिप्रदर्शन केले. त्यांचे बंधू आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे विजयी झाले. विधानसभेत पराभव झाला असला तरी विरोधक म्हणून आपली ताकद काळेंनी या निमित्ताने दाखवून दिली.
परभणीत सुरेश वरपूडकर गटाने बँक ताब्यात घेत भाजपचे रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलचा पराभव केला. येथे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून प्रारंभी घोळ घातला आणि बोर्डीकरांसोबत घरोबा केला; पण भाजपच्या पॅनलला बहुमत मिळू शकले नाही. या निवडणुकीत हाणामारीही झाली. सोनपेठ गटात बोर्डीकरांचे बंधू गंगाधर आणि जि.प.चे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या गटांत हाणामारी झाली. शेवटी एका मताने बोर्डीकरांचा पराभव झाला. बाबाजानी दुर्राणी हे भाजप गोटात गेल्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत येण्याची शक्यता दिसत होती.
बीड मध्यवर्ती बँकेची निवडणूक गाजली ती पंकजा मुंडे यांच्या पॅनलच्या माघारीमुळे. निवडणूक न लढण्याचा त्यांचा निर्णय केवळ ‘झाकली मूठ सव्वालाखाची’ या म्हणीची आठवण करून देणारा होता. क आणि ड गटातील सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना निवडणूक लढता येणार नाही, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आणि याचे त्यांनी राजकीय भांडवल केले. वस्तुत: या निर्णयाने त्याचवेळी औरंगाबाद जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम होऊन, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द ठरली; पण पंकजा यांनी याचा राजकीय अर्थ लावत निवडणुकीवर बहिष्कारच टाकला. वास्तविक निवडणूक झाली असती तरी निकाल फारसे वेगळे दिसले नसते आणि नेमकी हीच बाब स्पष्ट झाल्याने त्यांनी माघारीची संधी साधली. यानिमित्ताने २० वर्षांनंतर बँकेवरचे भाजपचे वर्चस्व संपुष्टात आले आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पकड घट्ट केली.
-सुधीर महाजन