श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील हेंडरसनव्हिले येथील मत्स्यालय. तिथे एका टाकीतल्या स्टिंगरे माशाची मादी थोडी जाड दिसायला लागली होती. अंगावर व्रणही होते. सोनोग्राफी केली तेव्हा आढळले, की शार्लट नावाची ही स्टिंगरे मादी गर्भवती आहे. तिच्या पोटात तीन- चार पिल्ले आहेत आणि ती पुढच्या आठवड्यात जन्म घेतील. साध्या भाषेत, शार्लट खऱ्या अर्थाने ‘एकल माता’ बनणार आहे. हे मत्स्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी अविश्वसनीय व धक्कादायक होते. कारण, अंदाजे १२-१६ वर्षे वयाची शार्लट मत्स्यालयातील टाकीमध्ये गेली आठ वर्षे एकटीच आहे. रे जातीचा नर इतक्या वर्षांत तिच्या संपर्कात आलेला नाही.
स्टिंगरे ही समुद्र किंवा जलसाठ्याच्या तळाशी राहणारी चपट्या माशांची एक प्रजाती. त्यांचे दोन्ही कल्ले शरीराच्या दोन्ही बाजूला असे विस्तारत जातात की ते कल्ले कमी अन् वल्हे अधिक वाटावेत. त्यांच्या मदतीने हे मासे पाण्यातून वेगाने वल्हवित जातात.
या प्रजातीमधील कोणी नर गेली अनेक वर्षे शार्लटच्या सोबत तिच्या टाकीमध्ये नाही. रे माशांचे दूरचे नातेवाईक म्हणता येतील अशा शार्क माशाची अवघ्या एक वर्षे वयाची दोन पिल्ले गेल्या जुलै महिन्यापासून तिथे तिच्यासोबत आहेत. केअरटेकरना शार्लटच्या अंगावर शार्कने चावा घेतल्याच्या खुणाही आढळल्या. त्यामुळे मंडळींना वाटले, दोनपैकी एका शार्क नराशी तिचा समागम झाला असावा. त्या विस्मयकारक समागमाच्या टीव्हीवर बातम्याही झाल्या. पण, तज्ज्ञांनी ती शक्यता फेटाळली. शरीर विज्ञानाच्या दृष्टीने शार्क व रे बऱ्यापैकी जवळ असले तरी समागमासाठी आवश्यक शरीररचना तसेच डीएनए या दोन्हींबाबत या दोन प्रजातींमध्ये बरीच तफावत आहे. तेव्हा प्रत्यक्षात विस्मयकारक समागम नव्हे तर हा पार्थेनोजेनेसिस प्रकारच्या प्रजननाचा प्रकार असल्याचे जॉर्जिया ॲक्वेरियमच्या केडी लॉयन्ज यांनी म्हटले.
पार्थेनोजेनेसिस किंवा अनिषेकजनन म्हणजे अलैंगिक प्रजनन. नवा जीव जन्माला येण्यासाठी यात नर व मादी एकत्र येण्याची आवश्यकता नसते किंवा ते एकत्र येत नाहीत. याच प्रक्रियेद्वारे पृथ्वीतलावरील जीवसृष्टीच्या प्रजननाची सुरुवात झाली असावी, असे मानले जाते. लैंगिक प्रजननात नराचे शुक्राणू व मादीचे अंडाणू जसे एकत्र येतात, तसे यात होत नाही. शुक्राणूंचा संबंधच येत नाही. मादीच्या अंड्यांच्या पटलात विशिष्ट बदल होतात. अंड्यातील पेशींचे विभाजन होते. एका पेशीच्या दोन पेशी होतात आणि त्यापैकी छोटी पेशी दुसऱ्या मोठ्या पेशीला जोडलेल्या अवस्थेत राहते. या पेशी मातेच्या अंडाणूतून वेगळ्या होतात आणि दुसऱ्या अंडाणूत सामावतात. त्यातून भ्रूण तयार होते. पार्थेनोजेनेसिस म्हणजे क्लोनिंग नव्हे. क्लोनिंगमध्ये नवा जीव जनुकीयदृष्ट्या हुबेहूब मातेसारखा किंवा मूळ जन्मदात्यासारखा असतो. पार्थेनोजेनेसिसद्वारे जन्मणाऱ्या भ्रूणाची जनुकीय रचना मातेपेक्षा वेगळी असते.
विज्ञानाच्या दृष्टीने पार्थेनोजेनेसिस ही दुर्मीळ, अपूर्व अशी घटना आहे. पाण्यातल्या अलगीसारख्या वनस्पतीची वाढ याच प्रकारे होते तर तारामासा व इतर काही जलचर अपृष्ठवंशीय तर विंचू, नाकतोडे, काही माशा, मधमाशा, मुंग्या इथपासून ते तीन मीटरपर्यंत लांबीच्या इंडोनेशियातील कोमोडो ड्रॅगन नावाच्या भल्यामोठ्या सरड्यांपर्यंत अनेक पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये या प्रकारे नवा जीव जन्माला येतो. मधमाशा व मुंग्यांमध्ये राणी मादी जी अफलित अंडी घालते तिच्यापासून याच प्रकारे फक्त नर जन्माला येतात. बेडकासारख्या उभयचर प्राण्याच्या काही जातींमध्ये अफलित अंड्यांना सुई टोचून अलैंगिक प्रजनन केले जाते. काहीवेळा कोंबड्यांमध्येही हा प्रयोग यशस्वी झाला आहे. सस्तन प्राण्यांमध्ये मात्र हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झालेला नाही. ससा, उंदीर आदींवर केलेल्या प्रयोगांमध्ये आढळले की, पार्थेनोजेनेसिसद्वारे प्रजनन शक्य आहे. तथापि, ते भ्रूण काही दिवसांतच मरण पावते. हे कृत्रिम प्रजननाबाबत घडते. शार्लटच्या पोटातले जीव नैसर्गिक पार्थेनोजेनेसिसद्वारे साकारले आहेत. त्यांच्याबाबत असे काही होणार नाही, अशी अपेक्षा आहे.